पुरंदर तालुका धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा खजिना

पुरंदर तालुका धार्मिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळांचा खजिना

नितीन राऊत

जेजुरी (पुरंदर): महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा सासवडपासून केवळ 17 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणारा श्री खंडोबा देवाचे मंदिर आहे. देवाच्या यात्रा व कुलाधर्म, कुलाचार व देवदर्शनाच्या निमित्ताने दरवर्षी 50 लाखांपर्यंत भाविक येथे येत असतात.

जेजुरी गड, जुनागड, कडेपठार मंदिर, ऐतिहासिक चिंचेची बाग, गौतमेश्वर मंदिर, होळकर व पेशवे तलाव या तलावातील बल्लाळेश्वर मंदिर ही प्रेक्षणीय स्थळे जेजुरीत आहेत. जेजुरी गडावर बारा वर्षांपूर्वी उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज व शहाजीराजे यांच्या भेटीचे समूहशिल्प ही पर्यटनस्थळे आहेत. पर्यटकांना निवासासाठी उत्तम हॉटेल्स तसेच जेवणासाठी ढाबे मोठ्या प्रमाणात आहेत. पुरंदर पर्यटनच्या दृष्टीने मध्यवर्ती आणि मुक्कामाचे ठिकाण जेजुरी हे आहे.

जेजुरी परिसरात नाझरे धरण, हेमाडपंथीय व विशेष आकर्षण असणारी पांडेश्वर व भुलेश्वराची शिवालये आहेत. भुलेश्वरच्या मंदिराची सुबक व कलाकृतीची रचना पर्यटकांना भुरळ पडणारी आहे. वाल्हे येथील वाल्मिक ऋषींची समाधी तेथूनच जवळ असणारे वीर धरण, भिवडीतील क्रांतिवीर उमाजी नाईक स्मारक,जेजुरीतील हुतात्मा हरी मकाजी नाईक, सोनोरीचा मल्हार गड, सासवडमधील सरदारांचे वाडे, खानवडी येथील महात्मा फुले यांचे स्मारक हीदेखील पर्यटनासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत.

पुरंदर किल्ल्यावर संभाजीराजे यांचे जन्मस्थळ, सुप्रसिद्ध प्रती बालाजी मंदिर, महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा श्री खंडोबा व कडेपठार मंदिर, श्री दत्ताचे प्रसिद्ध मंदिर असणारे नारायणपूर, सासवड येथील संत सोपानकाका मंदिर, शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे भुलेश्वर व पांडेश्वर मंदिर याच बरोबर अनेक शिवालये ही पुरंदरमधील पर्यटनस्थळे आहेत.

या स्थळांना भेट देण्यासाठी रेल्वेने जेजुरीत येता येते. तसेच पुण्यापासून 36 किलोमीटरवर पुरंदर किल्ला, 50 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचे श्री खंडोबा मंदिर आहे. संपूर्ण पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळे पाहाण्यासाठी दोन दिवस लागत असून, जेजुरीपासून 17 किलोमीटर अंतरावर अष्टविनायकातील पहिला गणपती मोरगाव येथे असून, मयूरेश्वराचे दर्शन या सहलीत होऊ शकते.

आद्यक्रांतिकारक उमाजीराजे नाईकांचे जन्मगाव तालुक्यात जेजुरीच्या श्री खंडोबा गडाच्या मध्याशी पायरीमार्गावर आद्यक्रांतिकारक
उमाजीराजे नाईक यांचा भव्य पुतळा आहे. भिवडी या त्यांच्या जन्मगावी स्मारक आहे. ब्रिटिश काळात नाईक यांनी ब्रिटिश सरकारविरोधात पहिले बंड केले. ते खंडोबाचे निस्सीम भक्त होते. कडेपठारगडावर त्यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला. ब्रिटिशांनी त्यांना पकडून पुण्यातील खडकमाळ येथे फाशी दिले. दरवर्षी उमाजीराजे यांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त रामोशी बांधव जेजुरीगडावर त्यांना अभिवादन करतात. शासनाकडून भिवडी येथे जयंती साजरी होते. नाईक यांचा गडावरील पुतळा, भिवडी येथील स्मारक पर्यटन केंद्र झाले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news