Punjab election : ‘आप’चे सीमोल्लंघन!

Punjab election : ‘आप’चे सीमोल्लंघन!

पंजाबात (Punjab election) आपची जणू सुनामी आली होती. त्यात काँग्रेस पक्ष वाहून गेला. काँग्रेसचा भ्रष्ट कारभार आणि त्या पक्षातील अंतर्गत बजबजपुरीला पंजाबचा मतदार अक्षरशः उबगला होता. या पार्श्वभूमीवर, केजरीवाल यांनी दिल्लीसारखेच प्रभावी सरकार आम्ही पंजाबातही देऊ, अशी घातलेली साद पंजाबी मतदारांना भावली. त्यांच्या आपने सत्तारूढ काँग्रेससह अकाली दल, भाजप आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब लोक काँग्रेस पक्ष अशा सगळ्यांना नेस्तनाबूत केले.

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पंजाब वगळता उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या चार राज्यांवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. तथापि, बोलबाला सुरू झालाय तो केजरीवाल यांच्या दिल्ली प्रारूपाचा. याचे कारण आपने पंजाबमध्ये (Punjab election) काँग्रेसला भुईसपाट करून मिळवलेले लखलखीत यश. स्वच्छ प्रतिमा असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीने (आप) आपण काँग्रेसला पर्याय बनू शकतो, असे स्पष्ट संकेत आपल्या लक्षवेधी कामगिरीद्वारे दिले आहेत. पंजाबात आपची जणू सुनामी आली होती. त्यात काँग्रेस पक्ष वाहून गेला.

काँग्रेसचा भ्रष्ट कारभार आणि त्या पक्षातील अंतर्गत बजबजपुरीला पंजाबचा मतदार अक्षरशः उबगला होता. या पार्श्वभूमीवर, केजरीवाल यांनी दिल्लीसारखेच प्रभावी सरकार आम्ही पंजाबातही देऊ, अशी घातलेली साद मतदारांना भावली. त्यांच्या आपने सत्तारूढ काँग्रेससह अकाली दल, भाजप आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील पंजाब लोक काँग्रेस पक्ष अशा सगळ्यांना नेस्तनाबूत केले. शेतकर्‍यांच्या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फायदासुद्धा काँग्रेसला घेता आला नाही. 117 सदस्यसंख्या असलेल्या पंजाब विधानसभेत काँग्रेसची गाडी 18 जागांवरच रुतली. मोठा बोलबाला करून मुख्यमंत्रिपदावर बसवलेले त्यांचे दलित मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना मतदारांनी घरी बसवले.

दोन मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि दोन्ही ठिकाणी त्यांना हार स्वीकारणे मतदारांनी भाग पाडले. ज्यांच्या अडेलतट्टूपणामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपदावरून दिल्लीश्वरांना हटवणे भाग पडले ते बोलघेवडे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना जीवनज्योत कौर यांनी अमृतसर मतदरासंघातून अस्मान दाखवले. एवढेच नव्हे, तर या जांबाज महिलेने शिरोमणी अकाली दलाचे बाहुबली उमेदवार विक्रमजितसिंग मजिठिया यांनाही दणका दिला. 2013 साली सामान्य कार्यकर्त्या म्हणून त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आणि आता त्या जायंट किलर ठरल्या आहेत.

खेरीज माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनाच पतियाळा शहर मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे उमेदवार अजितपालसिंग कोहली यांच्याकडून 47,704 मतांच्या फरकाने दारुण पराभव स्वीकारावा लागला. पंजाबचे पाच वेळा मुख्यमंत्रिपद भूषवलेले प्रकाशसिंग बादल यांनाही यावेळी पराभवाचे तोंड पाहावे लागले. अर्थात, यावेळी अकाली दलाला फारशी संधीच नव्हती. तरीदेखील त्यांनी उपचार म्हणून निवडणूक लढवली आणि आपच्या झंझावातापुढे त्यांनाही सपशेल लोटांगण घालावे लागले. आता पंजाबमधून केवळ काँग्रेसचे नव्हे, तर अकाली दलाचेही उच्चाटन झाले आहे. (Punjab election)

हे दोन्ही तिथले जुने पक्ष. पण, गेल्या साठ वर्षांत त्यांनी पंजाबच्या हिताचा विचार न करता फक्त आपल्या तुंबड्या भरण्यावर भर दिला. वास्तविक, 2017 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या हाती पंजाबच्या मतदारांनी विश्वासाने सत्ता सोपवली होती. तेव्हा काँग्रेसला 77, नव्यानेच निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेल्या आपला 22, तर अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीला 18 जागा मिळाल्या होत्या. मात्र सत्ता मिळाली त्या दिवसापासून काँग्रेसचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एखाद्या नबाबासारखा राज्य कारभार हाकला. हे गृहस्थ मंत्रालयात क्वचितच फिरकत असत.

काँग्रेसच्या आमदारांनाच नव्हे, तर मंत्र्यांनाही कॅप्टन साहेबांच्या भेटीसाठी तासन्तास ताटकळत राहावे लागत असे. त्यामुळे प्रशासनातील बाबू मंडळींना आयतेच मोकळे रान मिळाले. शिवाय रेती माफिया आणि अमली पदार्थांचा सुळसुळाट या दोन गोष्टींमुळे पंजाबची सातत्याने बदनामी होत गेली. याकडे ना काँग्रेसच्या श्रेष्ठींनी लक्ष दिले, ना सरकार प्रमुखांनी. त्याचा व्हायचा तो आणि तसाच परिणाम झाला. आज पंजाबच्या राजकीय सारीपाटावरून काँग्रेसचे अस्तित्व संपायला सुरुवात झाली आहे. याचा स्पष्ट अर्थ असा की, यापुढील काळात काँग्रेस गलितगात्र होताना निर्माण झालेला अवकाश आपकडून व्यापला जाईल.

तशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. आम आदमी पार्टीला गोव्यात केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये खातेसुद्धा उघडता आले नाही, हेही तेवढेच खरे. याबद्दल आपचे ज्येष्ठ नेते तथा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे स्पष्टीकरण असे की, आम्हाला पंजाबमध्ये सत्ता मिळण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली होती. परिणामी, आम्ही सगळी शक्ती पंजाबातच पणाला लावली होती. त्या नादात अन्य राज्यांकडे आम्हाला हवे तेवढे लक्ष देता आले नाही. पण, हळूहळू आमचा पक्ष देशाच्या विविध भागांत पसरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दिल्लीच्या विकासाचे प्रारूप प्रभावी

या निवडणुकीत केजरीवाल यांनी दिल्लीच्या विकासाचे जे प्रारूप (मॉडेल) पंजाबी मतदारांसमोर मांडले, तेच सर्वांत प्रभावी ठरले. दिल्लीतील सरकारी शाळांचा प्रयत्नपूर्वक उंचावलेला दर्जा, चकाचक शासकीय रुग्णालये, कितीही गंभीर आजार असला तरी दिल्लीवासीयांवर तिथे होणारे मोफत उपचार, मोहल्ला क्लिनिक ही अभिनव संकल्पना, महिलांना सरकारी बसेसमधून मोफत प्रवासाची सुविधा, पाणी आणि वीज दरात मोठी सवलत या गोष्टींचे अप्रूप पंजाबच्या मतदारांनाही वाटले. मुख्य म्हणजे त्यांनी पंजाबातील बेरोजगारीचा मुद्दा ऐरणीवर आणला. या मुद्द्यामुळे युवावर्ग आपकडे खेचला गेला. दिल्लीप्रमाणे केजरीवाल हे घसरलेली पंजाब मेल रुळावर आणतील, असा विश्वास मतदारांच्या मनात निर्माण झाला.

साहजिकच, आपला भरभरून मतदान झाले. त्यामुळे आता भगवंतसिंग मान यांचा मुख्यमंत्री होण्याचा राजमार्ग मोकळा झाला आहे. केजरीवाल यांना आरंभापासून आपल्या पक्षाच्या विजयाची खात्री होती. झालेही तसेच. कसलाही बडेजाव नाही, मतदारांशी थेट संपर्क साधण्याची केजरीवाल यांची हातोटी, त्यांचा साधेपणा, गेल्या काही वर्षांपासून पक्षाची ग्रामीण भागापासून भक्कम बांधणी, सत्ता हाती नसली तरी आम जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी तळमळीने काम करणारे समर्पित कार्यकर्ते; या प्रमुख गोष्टींमुळे पंजाबचा मतदार आपसूकच आपकडे आकर्षिला गेला.

दिल्लीत मोठ्या प्रमाणावर स्थायिक झालेल्या पंजाबी जनतेने केजरीवाल यांचे काम जवळून पाहिले असल्याने, या लोकांनी आपल्या बांधवांपर्यंत त्याची साद्यंत माहिती पोहोचवली. त्याचाही मोठा परिणाम झाला. स्वतः आयआयटीयन असलेल्या केजरीवाल यांनी कल्याणकारी राज्य कसे करावे, याचा आदर्श वस्तुपाठच दिल्लीवासीयांपुढे ठेवला. वाढती महागाई आणि झपाट्याने फोफावत चाललेली बेरोजगारी या प्रश्नांना थेट भिडण्याचे धाडस केजरीवाल यांनी दाखवले. खेरीज, पंजाबमध्ये त्यांनी निष्क्रिय काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली. परिणामी, पंजाबच्या मतदाराने अगदी ठरवून केजरीवाल यांच्या पक्षाला प्रचंड बहुमताने सत्तेवर आणले.

आपने पंजाबात नव्वदहून अधिक जागा जिंकण्याचा चमत्कार घडवलाय. मात्र, आता निवडणुकांत दिलेली सगळी आश्वासने वास्तवात उतरवण्याचे मोठे आव्हान आपपुढे उभे आहे. कारण, आज घडीला पंजाबच्या डोक्यावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. खेरीज अमली द्रव्यांचा अवैध व्यापार आणि रेती माफियांचा बीमोड या अन्य समस्या पंजाबात आ वासून उभ्या आहेत. कृषिसंपन्न पंजाबमध्ये शेतकर्‍यांना दिलेली आश्वासनेही आपला प्रत्यक्षात उतरवावी लागतील. शिवाय बेरोजगारी संपवण्यासाठी आश्वासक पावलेही मान सरकारला उचलावी लागणार आहेत.

ग्रामीण भागातही मुसंडी (Punjab election)

आम आदमी पार्टीची स्थापनाच मुळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काँग्रेसविरुद्ध चालवलेल्या आंदोलनापासून स्फूर्ती घेऊन झाली. 26 नोव्हेंबर 2012 हा तो दिवस. 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या चळवळीचे रूपांतर त्या दिवशी 'आम आदमी पार्टी'च्या स्थापनेत झाले. त्यानंतर गेल्या दहा वर्षांच्या काळात केजरीवाल यांनी दोनदा दिल्लीचे तख्त जिंकून आपल्या पक्षाला सातत्याने केंद्रस्थानी ठेवण्यात यश मिळवले. केजरीवाल यांनी वाराणसी मतदारसंघातून दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही निवडणूक लढवली. तिथे त्यांची डाळ शिजली नाही हे खरे; परंतु केजरीवाल सतत प्रकाशझोतात राहिले, हे नाकारता येणार नाही.

आता तर दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये सत्ता संपादलेला आप हा पहिलाच प्रादेशिक पक्ष ठरला आहे. आणि आता त्यांनी गुजरातच्या दिशेने मुसंडी मारण्याची घोषणा केलीय. कारण, येत्या डिसेंबरमध्ये गुजरातेत विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. मात्र हे खरे की, सुरुवातीपासून शहरी तोंडावळ्याचा पक्ष अशी आम आदमी पार्टीची ओळख बनत गेली. त्यामुळे या पक्षाचा कारभार दिल्ली आणि परिसरापुरताच सीमित राहिला. गावाकडच्या लोकांना आपल्याकडे खेचून घेण्यात केजरीवाल यांना फारसे यश मिळाले नाही.

ही बाब अचूकरीत्या हेरून केजरीवाल यांनी दिल्लीची सत्ता काबीज केल्यानंतर हरियाणा, पंजाब, गोवा यांसारख्या छोट्या राज्यांकडे आपला मोर्चा वळवला. हे करताना त्यांनी धर्म आणि जात या भारतीय राजकारणातील कळीच्या घटकांना बगल देऊन आपला पक्ष सर्वसमावेशक होण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. तुम्ही मला मते द्या, मी तुमच्या मूलभूत समस्या सोडवतो, हा त्यांचा नारा मतदारांना भुरळ पाडून गेला. लक्षात घ्या, शहरी तोंडावळ्याचा पक्ष अशी खिल्ली उडवली गेलेल्या याच आम आदमी पार्टीने पंजाबच्या कानाकोपर्‍यांत संपादलेले यश डोळे दीपवणारे म्हटले पाहिजे. (Punjab election)

भारतीय राजकारणात केजरीवाल यांनी विकासाचे जे नवे प्रारूप जोरकसपणे मांडायला सुरुवात केली आहे; त्यावरून असे दिसते की, आता भाजपने काँग्रेसकडून नव्हे, तर भविष्यात आम आदमी पार्टीकडून उभ्या केल्या जाणार्‍या आव्हानांची चिंता केली पाहिजे. भ्रष्टाचार, निर्नायकी अवस्था, पक्ष संघटनेचा खुळखुळा, राज्यांतील शिलेदारांना आपसात झुंजवणे, ठोस कार्यक्रमाचा अभाव, व्यक्तिपूजेचे बटबटीत प्रदर्शन, एकच घराण्याची पक्षावर वर्षानुवर्षे हुकमत आदी कारणांमुळे काँग्रेसची अवस्था भग्न हवेलीसारखी झाली होती.

त्यावर केजरीवाल यांच्या झाडूने सणसणीत प्रहार केला असून, त्यामुळे या हवेलीचे उरलेसुरले चिरेदेखील नजीकच्या काळात नष्ट झाले तर आश्चर्य वाटू नये. देशाच्या विकासात काँग्रेसने दिलेले योगदान कोणीच नाकारू शकत नाही. आजसुद्धा या पक्षाला मानणारा मतदार देशामध्ये आहे. भलेही त्यांची संख्या रोडावत चालली असेल. अशा वेळी पंखात नव्याने बळ भरून काँग्रेसने तडफेने विरोधी पक्षाची भूमिका बजावणे अपेक्षित होते. सव्वाशे वर्षांची संपन्न परंपरा सांगणारा हा पक्ष आता केवळ राजस्थान आणि छत्तीसगडपुरताच उरला आहे. हेे गडदेखील केव्हा खालसा होतील हे सांगणे कठीण.

कारण तिथेसुद्धा विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना बळ देण्याचे आगलावे उद्योग करण्यात दिल्लीश्वर मग्न आहेत. तसाच कलगीतुरा राजस्थानात विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि बंडखोर युवा नेेते सचिन पायलट यांच्यात रंगत चालला आहे. राहुल गांधी यांचा बहुतांश वेळ विदेशवार्‍यांतच जातो. सोनिया गांधी यांना प्रकृती साथ देत नसली तरीदेखील त्या पक्षाच्या हंगामी अध्यक्ष आहेत. प्रियांका गांधी-वधेरा यांच्या तथाकथित करिश्म्याची माध्यमांत भरपूर चर्चा झाली. पण त्यावरील वर्ख उत्तर प्रदेशातील लाजिरवाण्या पराभवाने उडून गेला आहे.

प्रियांका यांच्याकडे प्रामुख्याने पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 'लडकी हूँ, लढ सकती हूँ' यासारखी घोषणाबाजी करून त्या काही काळ प्रकाशझोतात राहिल्या. वास्तवात, निवडणुका जिंकण्यासाठी जे कसब अंगी असावे लागते ते प्रियांका यांच्याकडे नसल्याचे सप्रमाण सिद्ध झाले आहे. या निवडणुकांतील करुण अपयशानंतर राहुल गांधी यांनी केलेले ट्विट पाहिले तर हसावे की रडावे, असा प्रश्न कोणालाही पडावा. हे गृहस्थ म्हणतात, आम्हाला अजूनही शिकण्यासाठी मोठा वाव असल्याचे या निवडणूक निकालांवरून दिसून आले आहे. (Punjab election)

उत्तर प्रदेशात गेल्या वेळच्या निवडणुकीत अखिलेश यादव यांनी काँग्रेसशी युती केली आणि या युतीचे भाजपने बारा वाजवले. मात्र, पाठ भुईला लागली तरी नाक वर या उक्तीनुसार अजूनही काँग्रेसला आपली सरंजामी मानसिकता बदलावी असे वाटलेले नाही. 403 सदस्यांच्या उत्तर प्रदेश विधानसभेत फक्त दोन जागांवर काँग्रेसला विजय मिळाला. गेल्या वेळी हीच संख्या होती 7. गोव्यात फक्त 12, तर उत्तराखंडमध्ये 18 जागांवर आणि मणिपूरमध्ये कशाबशा 5 जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या आहेत.

पंजाबमध्ये काँग्रेसला तब्बल 59 जागांवर पाणी सोडावे लागले आहे. लोकशाहीत सरकार पक्ष मजबूत असलाच पाहिजे, हे जेवढे खरे तेवढाच विरोधी पक्षसुद्धा सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी तगडा असायला हवा. त्या द़ृष्टीने विचार केला तर देशाच्या राजकीय पटलावर आम आदमी पार्टीचा ठळक उदय होत चाललाय आणि त्याचवेळी काँग्रेसचा सूर्य अस्ताला निघालाय. काँग्रेसची ही अवस्था जेवढी केविलवाणी तेवढीच ती लाजिरवाणी. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस विसर्जित करा, असा सल्ला महात्मा गांधी यांनी दिला होता. ते स्वप्न गांधी घराण्याची तिसरी पिढी वास्तवात उतरवू लागली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news