नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिला पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिला पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

पंजाब काँग्रेसचे प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेशाध्यांनी राजीनामा द्यावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार नवज्योत सिंग सिद्धू पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार झाले आहेत. काॅंग्रेस अध्यक्षांकडे राजीनामापत्र पाठविले असल्याची माहिती स्वतः सिद्धू यांनी ट्विट करत दिली आहे.

पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकांतील दारुण पराभवानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संबंधित पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे निर्देश दिले आहेत, काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी मंगळवारी ट्विटरद्वारे ही माहिती दिली होती.

दरम्यान, सुरजेवाला यांच्या ट्विटनंतर काही वेळातच उत्तराखंडचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोदियाल यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत आपण राजीनामा देत असल्याचे ट्विट केले.

नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर विधानसभांच्या निवडणुकांत काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी वरिष्ठ मंत्र्यांच्या बैठका घेत चर्चा केली होती. त्यांनी स्वतःही राजीनाम्याची तयारी दर्शवली होती. मात्र, पक्षाच्या कार्य समितीने त्यांचा प्रस्ताव नाकारला होता. त्यानंतर आता सोनिया गांधी यांनी पराभव झालेल्या राज्यांतील प्रदेशाध्यक्षांकडे राजीनाम्याची मागणी केली असून, या राज्यांतील प्रदेश काँग्रेस कमिटीची (पीसीसी) पुनर्रचना सुलभ होण्याच्या द़ृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले होते.

दरम्यान, पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धू, उत्तर प्रदेशात अजयकुमार लल्लू, उत्तराखंडमध्ये गणेश गोदियाल, गोव्यात गिरीश चोडणकर तसेच मणिपूरमध्ये लोकेन सिंह यांच्याकडे काँग्रेसची धुरा होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news