Valentine day special : ये इश्क नही आसान ! प्रेमासाठी अनवाणी आलेले ते आणि ऐन लॉकडाउनमध्ये पार पडलेलं लग्न… वाचा एका लग्नाची हटके गोष्ट

Valentine day special : ये इश्क नही आसान ! प्रेमासाठी अनवाणी आलेले ते आणि ऐन लॉकडाउनमध्ये पार पडलेलं लग्न… वाचा एका लग्नाची हटके गोष्ट

अमृता चौगुले- पाटील :

पुढारी डिजिटल:

लव्हस्टोरी म्हटलं की आपल्याला एकसे एक सिनेमे आठवत राहतात. जगाच्या विरोधात जाऊन प्रेम करणारे ते दोघे… तर या दोघांनी समाजाच्या रितीप्रमाणे वागावं यासाठी दंड थोपटून उभा असलेला समाज.. आणि या प्रेमवीरांनी एकत्र यावं यासाठी धडपड करणारी मित्रमंडळी.. पहायला गेलं तर सुपरहिट लव्हस्टोरीचा हा प्लॉट. पण आज ज्या लव्हस्टोरींबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तिची वाट इतकी गुलाबी नक्कीच नव्हती. पण प्रेमाच्या अवघड आणि काटेरी वाटेवर या प्रेमिकांचा सोबती बनतो आहे पुण्याचा अभिजीत के. अर्थात कसं ते पुढे वाचा.

त्या दोघांचही एकमेकांवर प्रेम. घरच्यांचा विरोध असूनही प्रेमाचं रूपांतर लग्नात करण्याची त्यांची ओढ आणि जिद्दही तेवढीच. लॉकडाउनमध्ये लादलेला विरह संपल्यानंतर प्रेमाने उचल खाल्ली. जमेल तशा परिस्थितीत लग्न करण्याच्या ओढीने त्यांनी नांदेडहून पुणे गाठलं. हातात मोजके पैसे, पायात चप्पल नाही, पण प्रेमावर आणि एकमेकांवर असलेला विश्वास फळाला आला आणि अखेर या जोडप्याचं लग्न पार पडलं. पण खरी अग्निपरीक्षा पुढे होती. एकमेकांच्या ओढीने येण्याच्या नादात तिला पायातल्या चपलेचं भान नव्हतं. अगदी लग्नादिवशी तरी अनवाणी असलेल्या तिच्या पायात चप्पल असावी यासाठी अभिजीत आणि त्याच्या टीमने शोधाशोध केली. पण लॉकडाऊनमुळे दुकानं बंद असल्याने तिला अनवाणी पावलांनी संसराच्या वाटेवरचं पहिलं पाऊल टाकावं लागलं.

प्रेम ते लग्न या वाटेवरचे अनेक अडचणींचे डोंगर पार करण्यासाठी इथल्या एका अवलियाची मदत ही झाली. पण खरी परिक्षा पुढेच होती. तुटपुंज्या साधनांवर संसार सुरू करणं हे आव्हान पेलत असताना त्यांना मदत मिळाली ती 'Right to love' चळवळीची.

प्रेम करणं हे सिनेमात कितीही गोड गुलाबी, सुखद वाटत असलं तरी अनेक प्रेमकथांमध्ये प्रत्यक्षात मात्र वैशाख वणवाच असतो. पण आंतरजातीय – आंतरधर्मीय विवाह करू इच्छिणाऱ्या पण अडचणीत असलेल्या जोडप्यांसाठी पुण्यातला अभिजीत के Right to love चळवळीच्या माध्यमातून काम करतो आहे.

'सैराट', 'धडक', इशकजादे या सिनेमांनी आंतरजातीय प्रेम आणि त्यापासून बसणाऱ्या चटक्यांची दाहकता पडद्यावर मांडली. अजूनही असे विवाह करणाऱ्या जोडप्यांना समाज खुलेपणाने स्वीकारताना दिसत नाही. अशाच प्रेमात सैराट होत असलेल्या जोडप्यांसाठी अभिजीत के आशेचा किरण बनून आला आहे.

२०१४ मध्ये लातूरच्या तथाकथित संस्कृतीरक्षकाकडून एका जोडप्याला झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि अभिजीतसह अनेकजण तो व्हिडिओ पाहून अस्वस्थ झाले. पण फक्त कोरडी हळहळ व्यक्त न करता यासाठी काहीतरी करायला हवं या प्रेरणेतूनच 'right to love' ची सुरुवात झाली.

जवळपास ८ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आज एका चळवळीत बदलला आहे. सोशल मिडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत ही चळवळ पोहोचली आहे. आज जवळपास अभिजीत यांच्यासह ८-१० सदस्य करियर आणि वैयक्तिक जीवनातील अनेक व्याप सांभाळून अनेक जोडप्यांच्या वाटेत आशेचा दिवा बनले आहेत. खरं तर रुढीप्रिय समाजात आंतरधर्मीय- आंतरजातीय विवाहाच्या बाजूने उभं राहणं हे कोणत्याही आव्हांनापेक्षा कमी नाही. समाज, घरचे यांच्याकडून आलेला भावनिक दबाव, आर्थिक सक्षम नसणं, कधी कधी प्रेमाच्या संकल्पनेतच गोंधळ असणं याकडेही तितकंच लक्ष देणं महत्त्वाचं होऊन जातं.

त्यामुळेच अभिजीत यांनी या सगळ्यासाठी एक कार्यपद्धती सुरू केली आहे.

कोणत्याही जोडप्याने आंतरजातीय लग्नाची तयारी दाखवल्यास त्याच्या संदर्भातील अनेक बाबींची पडताळणी केली जाते. यामध्ये :

• दोघांच्या घरची पार्श्वभूमी जाणून घेणे
• दोघंही किंवा दोघांपैकी एकजण आर्थिक भार उचलण्यास सक्षम आहे का ते पाहणं
• कायद्याच्या दृष्टीने सज्ञान आहेत का हे तपासणं.

एकत्र राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडींची तयारी आहे का हे पडताळण

यामध्ये अनेकदा कमी वयाची, अड्यानिडया वळणावर असलेली जोडपीही 'राईट टू लव्ह'च्या माध्यमातून एकत्र राहण्यासाठी उत्सुक असतात. पण अशा वेळी त्यांचं योग्य कौन्सिलिंग करणं आणि त्याच्या बंडखोरीला शांतपणे सुयोग्य वळण देणं गरजेचं असतं. हेच काम अभिजीत राईट टु लव्हच्या माध्यमातून करताना दिसतात.

अर्थातच हे निकष पूर्ण करणाऱ्या जोडप्यांबाबत पुढचा टप्पा सुरू केला जातो. तो म्हणजे त्यांची योग्य व्यवस्था करणे. घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न करणारी जोडपी कमावती असली तरी लग्नासारखी जबाबदारी एकदम अंगावर पडल्यावर गांगरून जातात. अनेकदा नवीन शहरात डोक्यावर छत शोधण्यापासून ते नोकरीची सोय करण्यापर्यंतची मदत राईट टु लव्ह करताना दिसते. अशी अनेक जोडप्यांना काम शोधण्यासाठी राईट टु लव्ह कायमच हात पुढे करताना दिसते. पण आता आंतर जातीय – आंतरधर्मीय विवाहानंतर आता LGBTQ समूहाचे अनेक सदस्यही लिव इन सर्टिफिकेटसाठी अर्ज करताना दिसतात.

यापैकी एक अनुभव अभिजीत यांनी नुकताच पुढारी डिजिटलशी शेयर केला. नागपूर येथील एका लेस्बियन जोडीला एकत्र राहण्याची इच्छा होती. पण घरच्यांनी प्रचंड विरोध केल्यामुळे या दोघीनांही प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेषत: त्यातील मुलीच्या आईच्या या ॲग्रीमेंटला कडाडून विरोध होता. पण या मुलीच्या घरच्यांची अनेकदा हेटाळणीयुक्त बोलणी सहन करून अभिजीत आणि त्यांच्या टीमने त्या मुलींच्या घरच्यांची संमती मिळवली. आणि कायदेशीर बाबी पूर्ण करून या जोडीला पुण्यातून लिव्ह इन ॲग्रिमेंट मिळवून दिलं.

महाराष्ट्रातील पहिलं लिव्ह इन ॲग्रीमेंट :

लेस्बीअन जोडीसाठी लिव्ह इन ॲग्रीमेंट पहिल्यांदा बनवण्याची संधी राईट टू लव्हला मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रात लेस्बीयन जोडीसाठी लिव्ह ॲग्रीमेंट करणारी राईट टु लव्ह ही पहिली संस्था ठरली.

पुण्यात फक्त कपल गार्डन असावं यासाठी राईट टू लव्ह कायमच प्रयत्नशील आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन लवबर्डससाठी कपल गार्डन सुरू होईल अशा शुभेच्छा नक्कीच देऊ शकतो.

… आणि हो लेखाच्या सुरूवातीला असलेल्या जोडीचं अगदी छान सुरू आहे. त्याने आता दोन टेम्पो घेतले आहेत. त्याच्या भरवशावर आलेली ती देखील आता अगदी आनंदी आहे आणि दोघांमध्ये अजूनही तितकंच प्रेम असलं तो असताना आता तिला अनवाणी फिरावं लागत नाही…

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news