पुण्यात केवळ पंधरा दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा !

blood Delivery
blood Delivery

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळयाच्या सुट्या, रक्तदान शिबिरांचे कमी झालेले प्रमाण यामुळे दर वर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवतो. सध्या शहरातील रक्तपेढ्यांमध्ये दहा ते पंधरा दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे. रक्तदानाचे प्रमाण न वाढल्यास महिनाअखेरीस तुटवडा निर्माण होऊ शकतो. पाणीसाठ्याप्रमाणे रक्तसाठ्याचेही नियोजन आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

उष्णतेमुळे बरेचदा हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी होते. तसेच, गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाणही वाढले होते. अनेकजण नुकतेच आजारपणातून उठल्यामुळे लगेच रक्तदान करत नाहीत. शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्यामुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस रक्ताचा तुटवडा जाणवल्यास रुग्णांची आणि नातेवाईकांची धावपळ होऊ शकते. यासाठी विविध संस्था आणि रक्तपेढ्यांकडून नागरिकांना रक्तदानाचे आवाहन करण्यात येत आहे.

किती आहे रक्ताची किंमत ?

एक रक्तपिशवी-1550 रुपये
रँडम डोनर प्लेटलेटस-400 रुपये
सिंगल डोनर प्लेटलेट-11 हजार रुपये

शनिवारी शिबिर…रक्तदानासाठी पुढे या…

अ‍ॅडव्हेंचर फाउंडेशन आणि महालक्ष्मी सभागृह यांच्यातर्फे 13 मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रुबी हॉल ब्लड बँकेच्या सहकार्याने मित्र मंडळ चौकातील महालक्ष्मी सभागृह येथे सकाळी 9 ते 12 या कालावधीत शिबिर आयोजित केले आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे या वेळी रक्तदान करणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

सध्या रक्तदात्याची संख्या रोडावली आहे. त्यामुळे रक्तसंकलनाचे प्रमाण कमी झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्यात शहरातील पाणीसाठा लक्षात घेऊन त्यानुसार पुढील चार-सहा महिन्यांचे नियोजन केले जाते. त्याचप्रमाणे रक्तसाठ्यासाठी दीर्घकालीन उपाययोजनांची गरज करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाच्या नियमावलीमध्ये सुसूत्रता यायला हवी.

                                    – राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट

ससून रुग्णालयात सध्या 15 दिवस पुरेल इतका रक्तसाठा उपलब्ध आहे. मार्च-एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात शिबिरे झाल्याने चांगले रक्तसंकलन झाले. सध्या 1000 युनिट रक्तसाठा असून, दररोज 70 ते 80 रुग्णांना रक्त दिले जाते. मात्र, सध्या शिबिरे कमी झाली आहेत. दर महिन्याला 20 ते 22 कॅम्प होतात. सध्या ही संख्या 1-12 पर्यंत कमी झाली आहे. त्यामुळे जूनमध्ये कमतरता भासू शकते.

                                    – डॉ. सोमनाथ खेडकर, ससून रक्तपेढी.

सध्या रक्तदान शिबिरे सुरू आहेत. पुण्यातील अनेक संस्था रक्तदान शिबिरांसाठी पुढे येत आहेत. आमच्या रक्तपेढीतर्फे दर दिवशी 60 जणांना रक्तसेवा दिली जाते. त्याप्रमाणे संकलनही 60-70 पिशव्या मिळत आहेत. सध्या तरी पुरेसा साठा आहे. मात्र, दर वर्षीप्रमाणे संभाव्य तुटवडा टाळण्यासाठी नागरिकांनी रक्तदानासाठी आपणहून पुढे यावे.

                               – अतुल कुलकर्णी, जनकल्याण रक्तपेढी.

रक्तदान शिबिरे कमी होत असल्याने सध्या आमच्याकडे 8 ते 10 दिवस पुरेल इतका रक्तसाठा आहे. दररोज 15 ते 20 पिशव्या लागतात. रक्तदान शिबिरांमधून रक्तसंकलन होते. मात्र, रक्तदानासाठी वैयक्तिक प्रतिसाद मिळत नाही. 20 ते 25 रक्तदात्यांना फोन केल्यास 5 ते 6 जणच रक्तदानासाठी पुढे येतात. रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यास रुग्णाच्या नातेवाईकांना रक्तदानाची सक्ती करावी लागते.

                                       – सारिका पाटील, आधार रक्तपेढी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news