सांगलीहून पुण्याला निघालेली शिवशाही बस भर रस्त्यात जळून खाक

सातारा पुणे महामार्गावरील जळत असलेली शिवशाही बस. या आगीत ही बस भस्मसात झाली.
सातारा पुणे महामार्गावरील जळत असलेली शिवशाही बस. या आगीत ही बस भस्मसात झाली.

सारोळा : पुढारी वृत्तसेवा

सांगलीहून पुण्याकडे सातारा पुणे महामार्गावरून चाललेली शिवशाही बस जळून खाक झाली. निगडे (ता.भोर जि.पुणे) राजगड साखर कारखान्यासमोरील उड्डाणपूलावर सोमवारी दुपारी ४.२० वाजता बसमधून अचानक धूर येऊन बसने पेट घेतल्याने महामार्गावर आगीचे तांडव पाहण्यास मिळाले. चालकाच्या प्रसंगावधानाने जिवितहानी मात्र टळली.

सांगली- स्वारगेट शिवशाही बस सांगलीतून सकाळी साडे अकरा वाजता ४० प्रवाशांसह निघाली होती. सातारा पुणे महामार्गावर निगडे गावाच्या हद्दीतील उड्डाणपूलावर बस आली असता अचानक गाडीतून धूर येऊ लागला. गाडीचे चालक शेरअली सिराज फकीर यांनी प्रसंगावधान दाखवत तातडीने गाडी थांबवली व गाडीतील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. थोड्याच वेळात गाडीने धडधडून पेट घेतला.

गाडीतून प्रचंड प्रमाणात धुराचे लोट उठू लागले. आगीमुळे टायर फुटण्याचे आवाज झाले. भोर, सासवड, शिरवळ येथून आग्नीशामक गाडी बोलवूनही त्या वेळेत न आल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. बस मधील सर्व प्रवासी जीवाच्या आकांताने बस बाहेर धावले. या घाटनेत सर्व प्रवासी बालंबाल बचावले असले तरी, प्रवाशांच्या सर्व वस्तू जळून खाक झाल्या.

या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. सर्व्हिस रोडने वाहतूक सुरु ठेवण्यात आली होती. बघ्यांच्या गर्दीमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाली. महामार्ग पोलीस पथक व राजगड पोलिसांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजगड पोलीस निरिक्षक सचीन पाटील, महामार्ग पोलीस सहाय्यक निरीक्षक अस्लम खतीब, उपसरपंच पकंज गाडे पाटील, किशोर बारणे, तंटामुक्ती अध्यक्ष विशाल मालुसरे, श्रीकांत बारणे आदींनी पोलीसांना मदत केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news