Pune Politics: पुण्यात भाजपचा उमेदवार गल्लीतील की दिल्लीतील !

Pune Politics
Pune Politics

लोकसभा निवडणुका जवळ आल्या असतानाच पुण्यात भाजपच्या उमेदवारीसाठी गल्लीपासून थेट दिल्लीपर्यंतच्या नावांची चर्चा सुरू आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर अशी वेगवेगळी सातत्याने नावे पुढे येत आहे. त्यामुळे स्थानिक इच्छुक उमेदवार धास्तावले असून पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत. भाजपसाठी सुरक्षित असलेल्या या मतदारसंघात उमेदवारीसाठी अशा बाहेरील नावांची चर्चा होण्यामागे नक्की राजकीय खेळी काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. (Pune Politics)

देशात 2014 ला आलेल्या मोदी लाटेत पुणे लोकसभा मतदारसंघ भाजपने काँग्रेसकडून खेचून आणला. त्यावेळेस भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे हे तब्बल 3 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले होते. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचेच उमेदवार गिरीश बापट हे सव्वा तीन लाखांच्या मतांनी विजयी झाले होते. मात्र, खासदार बापट यांच्या आकस्मिक निधनाने आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात भाजपचा उमेदवार कोण याची चाचपणी आणि चर्चा दोन्हीही सुरू झाल्या आहेत. खरेतर खासदार बापट असतानाच पुणे लोकसभेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. स्वत: बापट यांनी फडणवीस उमेदवार असतील तर स्वागतच असेल, अशी भूमिका घेतली होती. मात्र, फडणवीस यांनीच या चर्चा निरर्थक असल्याचे सांगत त्यांना विराम दिला होता. (Pune Politics)

बापट यांच्या निधनानंतर शहर पातळीवरील अनेक नेत्यांनी लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यात अगदी बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांच्यापासून माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी खासदार संजय काकडे यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्व इच्छुकांकडून आपापल्या पध्दतीने निवडणुकीची तयारीही सुरू आहे. असे असतानाच भाजपमधून आता नव्याने थेट पुण्याबाहेरील नावांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्यात अगदी दीड दोन महिन्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर यांचे नाव पुढे आले आहे. त्यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याच्या शक्यतांची बातमी येऊन धडकली. त्याबाबत अनेक तर्कवितर्कही लढविले गेले. त्याबाबत ठोस अशी काहीच स्पष्टता होऊ शकली नाही.

मात्र, दुसरीकडे पुण्याच्याच नाही तर केवळ राज्याच्या राजकारणापासून दूर असलेले देवधर आता पुण्यात सक्रिय झाले आहेत. गणेशोत्सवात त्यांनी अनेक गणेश मंडळांना भेटी दिल्या. आता त्यांनी स्वः पक्षातील आणि मित्र पक्षातील पदाधिकार्‍यांच्या गाठी भेटी घेण्यास सुरवात केली आहे. त्याशिवाय मोहोळ, काकडे आणि मुळीक यांच्याकडूनही जोरदार तयारी सुरु आहे. यासर्व घडामोडींनी आणि भाजपकडून सातत्याने वेगवेगळी नावे पुढे येत असल्याने कार्यकर्तेही गोंधळल्याचे चित्र आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेले मताधिक्य आणि सद्यस्थितीतील राजकीय गणिते लक्षात घेता पुणे लोकसभा हा भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघाच्या यादीत आहे. असे असताना उमेदवारांच्या बाबत हा गोंधळ का होत आहे, तो जाणीवपूर्वक केला जात आहे असा प्रश्न आहे.

गत विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघात भाजपने बाहेरचा उमेदवार आणून तो निवडून आणण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. आता हाच पॅटर्न लोकसभेलाही राबविला जाणार का, याची उत्सुकता आणि धास्ती भाजपच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना लागली आहे. असे झाले तर स्थानिक पातळीवरील धुसफूस अधिक वाढण्याचीही भीती आहे. त्यामुळे नक्की उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, हे चित्र लवकर स्पष्ट होणार की थेट लोकसभा उमेदवारांच्या यादीतून दिसणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news