पुणे-मुंबई विमानसेवा पाच वर्षांपासून बंद; प्रवाशांचे होत आहेत हाल

पुणे-मुंबई विमानसेवा पाच वर्षांपासून बंद; प्रवाशांचे होत आहेत हाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्याहून मुंबईसाठीची विमानसेवा गेल्या 5 वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे पुणेकर प्रवाशांना बायरोड जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. परिणामी, प्रवाशांना अपघाताची भीती बाळगत आणि वाहतूक कोंडीत तासन्तास अडकत महामार्गांवरून प्रवास करावा लागत आहे. पुणे-मुंबई विमानसेवेला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र, विमानतळ प्रशासनाची आणि विमान कंपन्यांच्या उदासीनतेमुळे पुणे-मुंबई विमानसेवा 2016-17 पासून बंद आहे. विमान कंपन्यांनी ही सेवा सुरू करण्यास पाठ फिरवली आहे. पूर्वी 2016-17 साली जेट एअर या कंपनीमार्फत पुणे-मुंबई ही विमानसेवा सुरू होती. ती अजूनही बंदच आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.

विमानतळ म्हणते स्लॉट उपलब्ध नाहीत…
गेल्या पाच वर्षांपासून पुणे-मुंबई विमानसेवा बंद आहे, यासंदर्भात पुणे विमानतळ प्रशासनाला विचारले असता, ते म्हणाले, आमची पुण्याहून मुंबईसाठी विमानसेवा सुरू करण्याची तयारी आहे. परंतु, मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नाहीत. त्यामुळे अडचण येत आहे. परंतु, आम्ही ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

पुण्यातून सुरू असलेली विमानसेवा
जयपूर, रांची, कोलकत्ता, चंदीगड, बंगळुरू, लखनऊ, चेन्नई, मोपा, दिल्ली, इंदोर, नागपूर, गुवाहाटी, त्रिवेंद्रम, अमृतसर, भुवनेश्वर, कोलकत्ता, अहमदाबाद, मंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, रायपूर, भावनगर, डेहरादून, गोवा, पटना, जबलपूर, तिरूपती, जयपूर

मुंबईला जाण्यासाठी एसटी, रेल्वेला गर्दी
दररोज पुणे-मुंबई प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. अनेक चाकरमानी, उद्योजक, व्यापारी आणि प्रशासकीय अधिकारी पुण्यातून एसटी, रेल्वेच्या माध्यमातून पुणे-मुंबई दररोज ये-जा करत असतात. पुणे रेल्वे स्टेशन, पुणे स्टेशन एसटी स्थानक, स्वारगेट, शिवाजीनगर एसटी स्थानक येथून दररोज लाखोंच्या घरात प्रवासी प्रवास करतात. हंगामात तर येथे प्रवाशांची संख्या दुप्पट, तिप्पट असते.

पुणे-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात आम्ही विविध कंपन्यांशी चर्चा करत आहोत. मुंबईमध्ये सध्या स्लॉट उपलब्ध नाहीत. स्लॉट उपलब्ध झाल्यास ही सेवा लवकरच सुरू
करण्यात येईल.
                                                                 – संतोष ढोके,
                                                       संचालक, पुणे विमानतळ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news