बारामती; पुढारी वृत्तसेवा : बारामती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आले असून प्रस्थापिंना मतदारांनी नाकारले आहे. अनेक ठिकाणी गावनेत्यांच्या पॅनेलला मतदारांनी जोर का झटका दिला असून तरुणांच्या हाती सत्तेच्या चाव्या दिल्या आहेत. बारामती तालुक्यातील १३ ग्रामपंचायत मतमोजणीला मंगळवारी सकाळी १० वाजता प्रशासकीय भवन येथील तिसऱ्या मजल्यावर शांततेत सुरुवात झाली. प्रशासनाने मतमोजणीसाठी जय्यत तयारी केली आहे.
तहसीलदार विजय पाटील यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे. वाणेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला असून गाव पॅनेल हनुमान विकास पॅनेलच्या उमेदवार विद्या सुनील भोसले यांना पराभव स्वीकारावा लागला. अपक्ष उमेदवार गीतांजली दिग्विजय जगताप यांनी याठिकाणी विजयश्री खेचून आणली आहे. राजकीय दृष्ट्या महत्वाचे असलेले गाव म्हणून वाणेवाडीची ओळख आहे. येथे मातब्बर एका बाजूला आणि माजी सरपंच दिग्विजय जगताप हे एका बाजूला अशी स्थिती होती.
दिग्विजय जगताप यांनी पत्नीच्या रुपाने मिळवलेला विजय तालुक्यात चर्चेचा विषय ठरला. या निवडणुकीत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप तसेच आजी – माजी पदाधिकाऱ्यांच्या पॅनेलला पराभव स्विकारावा लागला. सुरुवातीला पळशी ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला. या ठिकाणी ताई माणिक काळे यांनी सरपंचपद मिळवत यश खेचून आणले. काऱ्हाटी ग्रामपंचायत सरपंचपदी दिपाली लोणकर यांनी विजयश्री खेचून आणली. सोरटेवाडी ग्रामपंचायत सरपंचपदी भारती अनिरुद्ध सोरटे यांची निवड झाली असून त्यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.
कुरणेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती आला असून बारामती तालुका दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे.आशा काळभोर यांची सरपंचपदी निवड झाली. गडदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सोमेश्वरचे संचालक अभिजीत काकडे यांनी एकहाती सत्ता मिळवली. मालन गडदरे यांनी सरपंचपदी विजय मिळविला.
मुरुम येथे मल्लिकार्जून स्वाभिमानी गावकरी पॅनेलचे नंदकुमार शिंगटे हे सरपंचपदी निवडून आले. त्यांच्या पॅनेलचे सहा सदस्य विजयी झाले. तर त्यांच्या विरोधी मल्लिकार्जुन स्वाभिमानी गावकरी परिवर्तन पॅनेलचे सात सदस्य निवडून आले आहेत. याठिकाणी सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांच्या पॅनेलला काही वार्डात धक्का बसला आहे.
वाघळवाडी ग्रामपंचायतीत मतदारांनी नवखे उमेदवार ॲड. हेमंत गायकवाड यांना सरपंच पदाची संधी देत माजी सरपंच सतीश सकुंडे यांना पराभवाची धुळ चारली. दुपारी दोनपर्यंत तालुक्यातील सर्व निकाल हाती आले. यानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर येथील प्रशासकीय कार्यालयासमोर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.