पुणे; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या आक्रमक पवित्र्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक घेणे टाळले असले, तरी अप्रत्यक्षपणे मात्र या मतदारसंघात तयारीला सुरुवात केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांसह हडपसर आणि खडकवासला मतदारसंघांची जबाबदारी आमदार चेतन तुपे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून सद्या काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू आहे. जागावाटपात काँग्रेसकडे असलेल्या या जागेवर राष्ट्रवादीने दावा ठोकला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार त्यासाठी आग्रही आहेत. मात्र, राष्ट्रवादीच्या या मागणीनंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत ही जागा न सोडण्याची ठाम भूमिका घेतली. काँग्रेसच्या या भूमिकेने राष्ट्रवादीने काहीसी मवाळ भूमिका घेतली.
सोमवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर, भिवंडी आणि जालना या लोकसभा मतदारसंघांच्या आढावा बैठका झाल्या, त्यात पुणे लोकसभेची बैठक घेणे मात्र टाळण्यात आले असले, तरी निवडणुकीची तयारी म्हणून पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील बूथनिहाय कमिट्यांचा आढावा घेऊन त्याची बांधणी करण्याचे काम राष्ट्रवादीने सुरू केले आहे. या बूथनिहाय कमिट्याची जबाबदारी हडपसरचे आमदार तुपे यांंच्याकडे सोपविण्याचा निर्णय आढावा बैठकीत घेण्यात आला.
तुपे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष, तसेच महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे. त्यांना शहरातील राजकारणाची इत्यंभूत माहिती आहे. त्यामुळे पवारांनी ही जबाबदारी आवर्जून त्यांच्याकडे देत लोकसभेची अप्रत्यक्षपणे तयारी तर सुरू केली नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे लोकसभेची तयारी सुरू असल्याचे सांगत जागेचा निर्णय महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते घेतील, असेही स्पष्ट केले. त्यामुळे राष्ट्रवादीचा पुण्याच्या जागेचा आग्रह कायम असल्याचे दिसते. सद्य:स्थितीत शहराध्यक्ष प्रशांत जगताप हे पुणे लोकसभेसाठी इच्छुक असून, आता चेतन तुपे यांचे नावही या स्पर्धेत येण्याची शक्यता आहे.
एकीकडे राष्ट्रवादीने बूथ कमिट्यापासून तयारी सुरुवात केली असली, तरी काँग्रेसकडून अद्याप तयारीला सुरुवात झालेली नाही. कसब्याच्या विजयानंतर काँग्रेसला पुन्हा सुस्ती आल्याचे चित्र आहे. पुणे कॅन्टोन्मेन्ट, शिवाजीनगर या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, थेट मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसने अद्याप तरी कार्यक्रम राबविला नसल्याचे काँग्रेसमधूनच सांगण्यात आले.
हेही वाचा