19 वर्षांनंतर प्रतीक्षा संपली! पुणे बाजार समितीच्या निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला, 29 एप्रिलला होणार मतदान

19 वर्षांनंतर प्रतीक्षा संपली! पुणे बाजार समितीच्या निवडणुकीचा अखेर बिगुल वाजला, 29 एप्रिलला होणार मतदान
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राज्यात अग्रगण्य असलेली आणि उत्पन्नामध्ये मुंबईनंतर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया अखेर सुरु करण्याचे आदेश शुक्रवार १३ जानेवारी रोजी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिले आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार या बाजार समितीसाठी 29 एप्रिल 2023 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे 19 वर्षांहून अधिक काळ असलेली बाजार समितीवरील प्रशासकीय राजवट आता संपण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे हवेली तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारामुळे मूळच्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन संचालक मंडळ 2003 मध्ये जिल्हा उपनिबंधकांनी बरखास्त केले होते. त्यानंतर राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आणण्याऐवजी प्रशासक, प्रशासकीय मंडळ, पुन्हा प्रशासक राज आणून निवडणूका लांबविण्यात सर्वांनीच धन्यता मानली. आता ही प्रशासकीय राजवट एकदाची संपून लोकनियुक्त संचालक मंडळ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी आपल्या आदेशात बाजार समित्यांच्या निवडणुकांबाबत विविध उच्च न्यायालयाचे संदर्भ नमूद केले आहेत. त्यामध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीचे जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे ग्रामीण यांच्याकडून बाजार समितीची निवडणूक घेण्यासंदर्भात प्राधिकरणाकडून निर्णय घेण्यात येईल असे म्हणणे प्राधिकरणाने याचिकेतील सुनावणीवेळी मांडले होते. न्यायालयाने आदेशात ही बाब अधोरेखित केलेली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोरील याचिका आणि इतर 43 संलग्न याचिकांमध्ये 5 जानेवारी 2023 रोजीचे आदेश पारित करुन राज्यातील निवडणुकीस पात्र सर्व बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रिया 30 एप्रिल 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी पूर्ण करण्याबाबत आदेशित केले आहे.

पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या बाजार क्षेत्रातील बहुतांशी प्राथमिक कृषि पतसंस्था, बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत. त्यानुसार पुणे बाजार समितीच्या निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया 16 जानेवारीपासून सुरु करावी. या बाजार समितीच्या निवडणुकीकरिता आवश्यक असणारी प्राथमिक मतदार यादी ही दिनांक 1 जानेवारी 2023 च्या अर्हता दिनांकावर (कट ऑफ डेट) तयार करावी. तसेच संपुर्ण मतदार यादी कार्यक्रम प्राधिकरणाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करावा व त्यास व्यापक प्रसिध्दी द्यावी असेही आदेशात नमूद केले आहे.

असा आहे मतदार यादीचा कार्यक्रम

जिल्हा उपनिबंधक व गटविकास अधिकार्‍यांकडून सदस्य सूचि मागविणे 27 जानेवारी, प्रारुप मतदार यादी तयार करण्याकरिता सदस्य सुचि बाजार समिती सचिवाकडे सुपूर्द करणे 31 जानेवारी, बाजार समिती सचिवाने नमुना 4 मध्ये प्रारुप मतदार यादी तयार करणे 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी, बाजार समिती सचिवाने प्रारुप मतदार यादी जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडे (कृषि उत्पन्न बाजार समिती) सादर करणे 15 फेब्रुवारी, जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी ती प्रारुप मतदार यादी प्रसिध्दी करण्याचा दिनांक 20 फेब्रुवारी, त्यावर आक्षेप वा हरकती या 20 फेब्रुवारी ते 1 मार्च 2023 पर्यंत मागविण्यात येतील. जिल्हा निवडणूक अधिकारी 15 मार्च रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करतील.

27 मार्चपासून निवडणूक कार्यक्रम जाहिर होणार

आदेशान्वये निवडणूक अधिकारी 27 मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहिर करतील, नामनिर्देशन करण्याचा शेवटचा दिवस 3 एप्रिल राहील. दाखल नामनिर्देशन, अर्जांच्या यादीच्या प्रसिध्दीचा दिनांक नामनिर्देशनासाठी निश्चित केलेल्या शेवटच्या दिनाकांपर्यंत जसजशी मिळतील त्याप्रमाणे राहील. अर्जांची छाननी 5 एपिल, छाननीनंतर वैध अर्जांच्या प्रसिध्दी 6 एपिल, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस 20 एप्रिल आहे. निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्याचा व निशाण्यांचे वाटप 21 एप्रिल रोजी होईल. पुणे बाजार समितीसाठी 29 एप्रिल 2023 रोजी मतदान होईल. तर मतमोजणी 30 एप्रिल रोजी होऊन मतमोजणी पूर्ण होताच निकाल घोषित करण्यात येईल, असेही डॉ. खंडागळे यांनी नमूद केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news