पुणे- मुंबई एक्सप्रेस’वेवर तपासणीसाठी आरटीओचा ॲक्शन प्लॅन तयार

पुणे- मुंबई एक्सप्रेस’वेवर तपासणीसाठी आरटीओचा ॲक्शन प्लॅन तयार
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे मुंबई दरम्यानच्या जुन्या आणि नव्या महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी आरटीओ अधिकारी आता 24 तास या मार्गावर गस्त घालणार आहेत, ही गस्त कशी असणार, किती अधिकारी 24 तास येथे कार्यरत असणार, कोण कोणत्या कार्यालयातील पथके कार्यरत असणार, या संदर्भातील आराखडा म्हणजेच ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्यामुळे आता जुन्या आणि नव्या महामार्गावर होणारे अपघात काही प्रमाणात रोखण्यास प्रशासनाला यश येणार आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच जुन्या महामार्गावर वाहतुक नियमांचा भंग वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. त्यामुळे अपघात वाढत आहेत. यामध्ये वाहन चालक अतिवेगाने वाहन चालविणे, विना हेलमेट, विना सिटबेल्ट आणि चुकीच्या मार्गिकेमध्ये वाहन चालविणे, चुकीच्या पध्दतीने मार्गिका बदलणे यांसारखे नियम भंग करतात. वाहन चालकांना शिस्त लागून अपघात कमी करण्याच्या दृष्टीने हा ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. मागच्या आठवड्यात परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी यासंदर्भातील आदेश राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना दिला होता. पुणे आणि पनवेल आरटीओला नोडल कार्यालय म्हणून जबाबदारी देण्यात आली होती, असे पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी मागच्या आठवड्यात पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानुसार आता हा ॲक्शन प्लॅन तयार झाला आहे.

पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर झालेले अपघात

– सन २०२१ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर २०० अपघात झाले असुन ८८ लोक मृत्युमुखी पडले व १४६ लोक गंभीर जखमी झाले.

– जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२२ मध्ये १६८ अपघात झालेले असुन ६८ लोक मृत्युमुखी पडले तर ९२ लोक गंभीर जखमी झाले.

जुन्या पुणे मुंबई महामार्गावर झालेल्या अपघात

– सन २०२१ मध्ये मुंबई-पुणे द्रुतगती जुन्या महामार्गावर २७८ अपघात झाले असून १४९ लोक मृत्युमुखी पडले व १४४ लोक गंभीर जखमी झाले.

– जानेवारी २०२२ ते ऑक्टोबर २०२२ मध्ये २३१ अपघात झालेले असुन १०२ लोक मृत्युमुखी पडले, तर १६० लोक गंभीर जखमी झाले.

अशी असणार महामार्गावर 24 तास गस्त…

दोन्ही महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहन चालकांमध्ये शिस्त निर्माण करण्यासाठी दोन्ही महामार्गावर ६ महिन्यांसाठी २४ तास "सुरक्षा" या रस्ता सुरक्षा जनजागृती व अंमलबजावणी उपक्रम याचे आयोजन परिवहन विभागामार्फत (RTO) करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात १ डिसेंबर २०२२ पासुन होत आहे. या उपक्रमासाठी मोटार वाहन विभागातील मुंबई, पुणे, पनवेल, पिंपरी-चिंचवड या प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांमधून १२ पथकांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये ३० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६ पथके व १५ अधिकारी हे या दोन्ही महामार्गावर २४ तास कार्यरत राहणार आहेत. यावर देखरेख आणि नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन उपायुक्त, रस्ता सुरक्षा कक्ष भरत कळसकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

आरटीओ अधिकारी महामार्गावर राबवणार या उपायोजना…

१) अपघातग्रस्त ठिकाणांची (Black Spot) सर्वेक्षण करणे व त्याठिकाणी रस्ता सुरक्षेच्या हेतूने सर्व उपाययोजना करणे आणि वाहन चालकांच्या माहितीकरीता तिथे घडलेल्या अपघातांची माहिती देणारे बोर्ड प्रदर्शित करणे.
२) अपघात प्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण करणे व त्याठिकाणी योग्य त्या उपाययोजना करणे. वाहन चालकांच्या माहितीकरीता तेथे घडलेल्या अपघातांची माहिती देणारे बोर्ड प्रदर्शित करणे..
३) अवैधरित्या रस्त्यावर पार्किंग करणाऱ्या वाहनांवर तात्काळ कारवाई करणे आणि रस्त्यावर वाहतुकीसाठी निर्माण झालेले अडथळे दूर करणे. (अति आवश्यक परिस्थिती वगळता)
४) दोन्ही महामार्गावरील टोल नाक्यावर उद्घोषणा करुन जनजागृती निर्माण करणे.
५) इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून अतिवेगाने चालणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे.
६) उजव्या मार्गिकेत कमी वेगाने चालणारी वाहने उदा. ट्रक, बस, कंटेनर यांच्या विरुध्द प्रकर्षाने कारवाई करणे.
७) चुकीच्या पध्दतीने मार्गिका बदलणाऱ्या वाहनांवर कारवाई करणे.
८) बिना हेल्मेट, विना सिटबेल्ट प्रवास करणाऱ्या चालकांवर आणि प्रवाशांवर कारवाई करणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news