‘पुढारी’ शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलला भरभरून प्रतिसाद मिळेल : हसन मुश्रीफ

‘पुढारी’ शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलला भरभरून प्रतिसाद मिळेल : हसन मुश्रीफ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दैनिक 'पुढारी'च्या वतीने ख्रिसमसदरम्यान आयोजित शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हल ही कोल्हापूरकरांसाठी एक पर्वणीच आहे. 'पुढारी'च्या कोणत्याही उपक्रमास कोल्हापूरकर भरभरून प्रतिसाद देतात. या शॉपिंग फेस्टिव्हलला कोल्हापूरकर दरवर्षीप्रमाणेच प्रचंड गर्दी करतील, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

दैनिक 'पुढारी', 94.3 टोमॅटो एफएम आणि कस्तुरी क्लब आयोजित पुढारी 'पुढारी' शॉपिंग अँड फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन शुक्रवारी मुश्रीफ यांच्या हस्ते आणि दै. 'पुढारी'चे समूह संपादक व चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी मंत्री मुश्रीफ बोलत होते.

दै. 'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील, रॉनिक स्मार्ट वॉटर हीटरचे संचालक तानाजी पोवार, सोसायटी चहाचे असि. मार्केटिंग मॅनेजर शशिकांत ठाकरे, क्रेझी आइस्क्रिम सांगलीचे बिझनेस हेड प्रशांत पाटील, दै. 'पुढारी'चे विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार, दै. 'पुढारी'चे सीनिअर इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर यावेळी उपस्थित होते.

अनिल पाटील म्हणाले, पालकमंत्री मुश्रीफ हे 'पुढारी'च्या परिवाराचे सदस्य आहेत. कोल्हापूरच्या प्रश्नांवर धडाकेबाज निर्णय घेणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. शहराच्या कोणत्याही प्रलंबित प्रश्नावर ते सकारात्मक तोडगा काढतील, असा विश्वास निर्माण झाला आहे.

या महोत्सवाचे सहप्रायोजक रॉनिक स्मार्ट वॉटर हीटर, सोसायटी चहा हे आहेत, तर आईस्क्रीम पार्टनर क्रेझी आईस्क्रीम आहे. मंगळवार (दि. 26) पर्यंत कोल्हापूरकरांना सकाळी 10 ते रात्री 9 दरम्यान या फेस्टिव्हलच्या मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे.

नाताळनिमित्त आकर्षक सजावट

नाताळानिमित्त प्रवेशद्वारावर आकर्षक सजावट केली आहे. मुख्य मंडपात सांताक्लॉज, ख्रिसमस ट्री, जिंगल बेल अशी सजावट करण्यात आली आहे.

या फेस्टिव्हलमध्ये चारचाकी गाड्यांपासून फर्निचरपर्यंत, किचन ट्रॉली, इलेक्ट्रॉनिक्स, गारमेंट, होम डेकोर, आयुर्वेदिक प्रॉडक्ट, सौंदर्यप्रसाधने, चटण्या, लोणचे, मसाल्यांचे पदार्थ, प्लास्टिकच्या विविध वस्तू, ब—ँडेड शूज, ज्वेलरी अशा उत्पादनांचे स्टॉल्स आहेत. व्यावसायिक व खाद्यपदार्थांचे मिळून 130 हून अधिक स्टॉलधारक सहभागी झाले आहेत.

मनोरंजन आणि एन्जॉयमेंटचे विविध पर्याय

फेस्टिव्हलमधील 360 डिग्रीत फिरणारा सेल्फी पॉईंट हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तोल न जाता उंच काठीवर चालणारा स्टिक मॅन, हवेत अनेक वस्तू एकाच वेळी खेळवत राहणारा जगलर, तसेच रंगबेरंगी जोकर हा आबालवृद्धांचा कुतूहलाचा विषय आहे. कराओके, 360 अंशामध्ये फिरणारा खास सेल्फी पॉईंट अशी खास आकर्षण असणार आहेत. नाताळची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मनोरंजनाचे विविध पर्याय आकर्षण ठरत आहेत.

महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कस्तुरी क्लबच्या सदस्या व बचत गटाच्या महिलांचे विविध स्टॉल्स या फेस्टिव्हलमध्ये लावण्यात आले आहेत. ऑटोमोबाईल्ससाठी विशेष दालन असून, गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांसाठी वेगळे विभाग आहेत.

खवय्यांसाठी पहिल्या दिवसापासून पर्वणी

या शॉपिंग आणि खाद्य महोत्सवामध्ये नॉन-व्हेज खवय्यांसाठी तांबडा – पांढरा रस्सा, वडा कोंबडा, तंदूर-कबाब, चिकन 65, खिमा पराठा, फिशचे नावीन्यपूर्ण प्रकार, सोलापुरी मटण-चिकन थाळी तसेच शुद्ध शाकाहारी खवय्यांसाठी थालीपीठ, इडली – उडीद वडा, चौपाटी पदार्थ, साऊथ इंडियन, पिझ्झा, सँडविचसारखे फास्ट फूड, स्प्रिंग पोटॅटो अशा अनेकविध पदार्थांची मांदियाळी आहे.

'पुढारी'ने जनमानसाचा घेतला ठाव

दैनिक 'पुढारी'ने गेल्या तीन पिढ्यांपासून कोल्हापूरच्या जनमानसाचा ठाव घेतला आहे. 'पुढारी'चे संस्थापक संपादक डॉ. ग.गो. जाधव, त्यांच्यानंतर पद्मश्री प्रतापसिंह जाधव आणि आता डॉ. योगेश जाधव यांनी 'पुढारी'ची थोर परंपरा पुढे चालवली आहे. 'पुढारी'च्या या परंपरेच्या प्रभावातून आम्ही 'पुढारी'च्या परिवाराचे सदस्य झालो आहोत. आता डॉ. योगेश जाधव यांनी पुढारी न्यूज हे चॅनेल सुरू केले आहे. ज्या पद्धतीने 'पुढारी'ने एक दैनिक म्हणून लौकिक मिळवला आहे, त्याहून अधिक लौकिक पुढारी न्यूज चॅनेल मिळवेल, असा मला विश्वास आहे. असे मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news