मैदानात राजकारण कशाला?

मैदानात राजकारण कशाला?
Published on
Updated on

भारतात सध्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. त्याचवेळी इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्ष, पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यातील राजकीय ताणाताणी सुरू आहे. यासारख्या घटनांचा खेळांवर परिणाम होणे स्वाभाविक आहे. परंतु खेळाडूंनी त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी मैदानाचाच वापर करणे गैर आहे. जागतिक स्थितीवर अन्य व्यासपीठांवरून मते मांडणे सयुक्तिक राहू शकते. पण खेळ हा खेळच राहिला पाहिजे, त्याला राजकीय मुलामा देण्याचा प्रयत्न कोणी करू नये.

आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेदरम्यान अशा काही घटना समोर येत आहेत की, त्या खेळ भावना आणि क्रीडा संस्कृतीला गालबोट लावत आहेत. कधी कधी खेळाडूंना चिडविण्यासाठी धार्मिक घोषणा दिल्या जातात. तर कधी संघाचा विजय हा गाझा येथील पॅलेस्टिनी नागरिकांना समर्पित केला जात आहे, तर कधी प्लेअर ऑफ द मॅचसारखा पुरस्कार हा पाकिस्तानातून निर्वासित झालेल्या अफगाणी नागरिकांना अर्पण केला जात आहे. याकडे काही जण द्वेषभावनेतून उमटणारी प्रतिक्रिया म्हणत आहेत, तर काही जण राजकारण. या भानगडीत फारसे न पडणारी मंडळी या घटना क्रिकेटच्या अस्मितेला ठेच पोचविणार्‍या आणि नकारात्मक वातावरण तयार करणार्‍या आहेत, असे म्हणतील.

मैदानात कोणताही खेळाडू केवळ आपल्याच देशासाठी खेळत असतो. तो युद्धभूमीत किंवा निवडणुकीच्या रणभूमीत नसतो. तो कोणत्याही राजकीय विचारसरणीला पुढे नेत नाही. हे केवळ खेळाचेच मैदान असते आणि त्यात जिंकण्यासाठी खेळाडू आक्रमक खेळाचा आधार घेत असतो. हा खेळ जंटलमन गेम नावाने ओळखला जातो. अर्थात, एखाद्या संघासाठी प्रत्येक दिवस सारखा नसतो. तो कधी पराभूत होतो, तर कधी विजयी. यात लहान सहान संघही मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेल्या संघाला चितपट करण्यात देखील यशस्वी होतात. अशा चित्तथरारक स्थितीत खेळाच्या पावित्र्याला बाजूला ठेवून अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर बेजाबदार कृती घडते तेव्हा आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करायचा असेल, तर अशा प्रकारचे कृत्य ही मंडळी आपल्या देशातही करू शकतात. अर्थात, त्याचेही समर्थन करता येणार नाही. कारण चांगले क्रिकेटपटू हे जगासाठी आयकॉन असतात. त्यांना लाखो, कोट्यवधी फॉलोअर्स असतात. त्यांच्या प्रत्येक मताकडे, भूमिकेकडे, आचरणाकडे जगाचे लक्ष असते. ते देश-जगाबाबत काय विचार करतात हे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच त्यांच्या तोंडून येणारी प्रतिक्रिया ही मैदानाबाहेर उमटायला हवी आणि हेच योग्य आहे. आणखी एक मांडला जाणारा तर्क म्हणजे, एखाद्या संघाने आपला विजय ग्राऊंडस्टाफ मॅनला अर्पण केला, तर तेव्हा त्याला विरोध होत नाही. अर्थात, यामागे मानवतेचा विचार असतो. ग्राऊंडस्टाफ मॅनला एखादा विजय अर्पण करणे ही बाब व्यक्तिगत राहू शकते. मात्र एखाद्या राजकीय आंदोलनाचे कौतुक करणे, पाठराखण करणे हे राजकारणाच्या श्रेणीत मोडते. या दोन्हींतील फरक समजून घेतला पाहिजे.

मी जुन्या शाळेतला क्रिकेटपटू आणि आपणही विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रतिनिधित्व केले आहे. आमच्यावर जे क्रिकेटचे संस्कार झाले, ते अशा प्रकारच्या कृत्यांना थारा देणारे नाही आणि तशी ते परवानगीही देत नाहीत. अभिव्यक्तीच्या नावाखाली दिले जाणारे असे कथित स्वातंत्र्य आमच्या काळात कधीही दिसले नाही. विशेेष म्हणजे तत्कालीन काळातदेखील अशा प्रकारच्या राजकीय संकटांना जग सामोरे जात होते. तेव्हादेखील देशादेशांतील हितसंबंधांवरून संघर्ष सुरू असायचा. पण त्याचे प्रतिबिंब मैदानात कधीही उमटत नसे. एक गोष्ट स्पष्ट आहे की, खेळाच्या मैदानात राजकारण होऊ नये. ही बाब आयसीसीने स्पष्ट करायला हवी. अर्थात, क्रिकेटपटूही मनुष्य आहे आणि त्याच्या भावनादेखील प्रसंगी अशा घटनांमुळे तीव्र होऊ शकतात. त्यालाही आपला विचार असतो. परंतु एखाद्या खेळाडूला अशा घटनांवर प्रतिक्रिया द्यायचीच असेल तर त्याने अन्य ठिकाणच्या व्यासपीठाचा वापर करायला हवा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news