लवंगी मिरची : नोमो फोबिया!

लवंगी मिरची : नोमो फोबिया!

मित्रा, नोमो फोबिया नावाच्या नवीन मानसिक विकाराबद्दल तू काही ऐकले आहे काय? अर्थात, ऐकले नसशीलच. मीच साधे सोपे करून समजाऊन सांगतो. फोबिया म्हणजे भीती वाटणे. नो म्हणजे नको किंवा नसलेला आणि मो म्हणजे मोबाईल. म्हणजे आपल्या सोबत मोबाईल नसेल तर वाटणारी चिंता, असाहाय्यता, असुरक्षिततेची भावना म्हणजे नोमो फोबिया. लोक मोबाईलच्या इतके आहारी गेले आहेत की, मोबाईल सोबत नसेल, तर त्यांना आता अस्वस्थ वाटायला लागले आहे.

हो, हे मात्र खरे आहे. परवा मी प्रवासाला निघालो होतो आणि रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर लक्षात आले की, आपला मोबाईल घरी राहिलेला आहे. चक्क दोनशे रुपयांची रिक्षा करून घरी गेलो. आधी मोबाईल हातात घेतला. कुणाकुणाचे कॉल्स येऊन गेले ते पाहिले. व्हॉट्स अ‍ॅपवर काय काय नवीन घडामोडी होत्या, त्या पहिल्या आणि उशीर झाल्यामुळे त्या दिवशी बाहेरगावी जाण्याचा बेत रद्द केला. मोबाईलशिवाय जगणे जवळपास आता अशक्य झाले आहे. जगण्यासाठी पूर्वी अन्न, वस्त्र, निवारा या बाबींची गरज होती. आता त्यात मोबाईलची भर पडली आहे. नवीन पिढीतील लोक तर चक्क रात्री तीन वाजेपर्यंत मोबाईलवर काय काय पाहत असतात.

अरे नवीन पिढीचे सोड, नुकतेच आईच्या हातून जेवायला लागलेली छोटी बालकेसुद्धा समोर मोबाईलवर गाणे लावल्याशिवाय नीट जेवतसुद्धा नाहीत. म्हणजे त्या छोट्या बाळाला भाषा शिकण्याआधी मोबाईल कसा वापरायचा, याची माहिती होते.

एका सर्वेक्षणात असेही लक्षात आले आहे की, 42 टक्के लोक मोबाईलचा वापर केवळ मनोरंजनासाठी करतात. म्हणजे काही ज्ञान मिळेल, माहिती मिळेल, आपल्या व्यवसायाला काही फायदा होईल असा कुठलाही विचार न करता तब्बल 42 टक्के लोक फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी मोबाईल वापरत असतील, तर मला प्रश्न असा पडतो की, हा देश पुढे कसा जाईल?

हे बघ, एक लक्षात घे की, या 42 टक्के रिकामटेकड्या लोकांमुळे देश पुढे जात नसतो, तर उर्वरित 58 टक्के लोक सतत कार्यरत असतात म्हणून आपली प्रगती होत असते.

नेटवर्क बंद पडले तरी काळजी, बॅटरी संपत झाली तरी काळजी, एखादे अ‍ॅप उघडले नाही तरी टेन्शन आणि सतत स्क्रीन पाहण्यामुळे होणारी डोळ्याची हानी हे काय कमी आहे की काय म्हणून मानसिक विकारसुद्धा आता लोकांमध्ये दिसण्यास सुरुवात झाली आहे. मोबाईल सोबत नसेल, तर लोक अस्वस्थ व्हायला लागले आहेत. अगदी झोपेतसुद्धा उशाशी मोबाईल ठेवून झोपणार्‍या लोकांची संख्या फार मोठी आहे. फार पूर्वी सकाळी जागे झाल्याबरोबर 'कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती' असे म्हणण्याचे संस्कार होते; पण आता सकाळी जागे झाल्याबरोबर लोक हातात मोबाईल घेऊन आपण झोपलेल्या जेमतेम चार-पाच तासांत काय घडले आहे, हे पाहण्यासाठी देवतांना बाजूला सारून मोबाईलला वंदन करत आहेत. काळ मोठा कठीण आला आहे, हे नक्की!

– झटका 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news