लवंगी मिरची : ही दोस्ती तुटायची नाय..!

लवंगी मिरची
लवंगी मिरची

नमस्कार सीएम साहेब.

या दादा या. काल जोरदार भाषण केले सहकार खात्याच्या कार्यक्रमात. अमित भाई खुश झाले. त्यांची सासुरवाडी कोल्हापूरची आहे, हे तुम्ही सांगितल्याबरोबर अमित भाईंच्या चेहर्‍यावर जे हास्य झळकले, वाह, क्या बात है. दादा तुम आगे बढो पण माझ्या मागे मागे, मग हम तुम्हारे साथ है. दादा दोन दिवस झाले; पण अजूनही तुमच्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधलेला आहे. नेमका कुणी बांधलेला आहे?

अहो, शिंदेसाहेब जुने मित्र मागे पडले. आता नवीन ताजे-ताजे झालेले मित्र देवाभाऊंनी हा बँड बांधलाय. ये बंधन नही तुटेगा. देवाभाऊंची आणि माझी केमिस्ट्री फार वर्षांपासून जुळते; पण आमचे पक्ष वेगळे असल्यामुळे आम्हाला फारशी संधी मिळत नव्हती. दरम्यान, मध्यंतरी आम्ही एकदा पहाटेचा शपथविधी करून फ्रेंडशिप घट्ट केली होती. तेव्हा, तर दोघांनी मिळून त्यावेळेसचे राज्यपाल कोश्यारी बाप्पू यांनाही फे्ंरडशिप बँड बांधला होता. मी आणि देवाभाऊने एकमेकाला फे्ंरडशिप बँड बांधलेला, आमच्या आधारवड साहेबांना आवडला नाही आणि त्यांनी तो मला काढून टाकायला लावला. आता पुन्हा संधी मिळाल्याबरोबर देवाभाऊंनी नवीन फे्ंरडशिप बँड आणला आणि वाजत गाजत मला तुमच्याबरोबर घेऊन आले.

तोच तर प्रॉब्लेम आहे ना दादा. तुम्ही आणि देवाभाऊंनी एकमेकाला फे्ंरडशिप बँड बांधला की, माझ्या काळजात धस्स होते. तुम्ही आणि देवाभाऊ सारखे महाकरामती दोस्त एकत्र आले की, मला आमच्या लोकांची काळजी वाटायला लागते. 'दोस्त को दोस्त मिले, चार कोस पैदल चले' अशी वेळ माझ्यावर येऊ नये म्हणून मी लक्ष ठेवून असतो हे विसरू नका दादा.

अहो, काय कमाल करतो शिंदेसाहेब? मी आता आलोय ते तुम्हाला फे्ंरडशिप बँड बांधण्यासाठीच. मध्यंतरी तुम्ही सहकुटुंब दिल्लीला जाऊन सगळ्यात मोठ्या साहेबांना फे्ंरडशिप बँड बांधून आलात त्यामुळे तुम्हाला काळजी नाही. आम्ही खाली कितीही चुळबूळ केली तरी तुम्हाला काळजी नाही.

या, या देवाभाऊ, अगदी वेळेवर आलात. फे्ंरडशिप बँडबद्दल आमची चर्चा चालली होती. या ना बसा, काही घाई आहे का?

नाही, विशेष घाई असे काही नाही एकनाथराव. काय झालं की, महाराष्ट्रामध्ये माझ्यावर फार मोठी जबाबदारी आली आहे. आमची पार्टी विथ डिफ्रांस आहे आणि पार्टीने मला सगळे डिफ्रनसेस मिटवून टाकायला सांगितले आहे. त्यामुळे गेली चार दिवस झाले मी फे्ंरडशिप बँड वाटण्यावरच आहे. आतापर्यंत दोन एक लाख फे्ंरडशिप बँड वाटून झाले आहेत. तुम्ही आलात, दादा आले, आपले मित्रामित्रांचे राज्य आले. आपल्या सगळ्यांच्या दिल्ली हाय कमांडकडून मला सूचना आली की, काँग्रेसमधील कोणी फे्ंरडशिप बँड बांधून घ्यायला तयार आहे का बघा. आम्ही आजकाल काय करतो की, दोन-चार लोकांच्या मागे लागत नाही, म्होरक्याला पकडतो, त्याच्या हातात फे्ंरडशिप बँड बांधतो.

अरे वा वा देवा भाऊ खूप छान काम सुरू आहे तुमचे; पण इकडे-तिकडे फे्ंरडशिप बँड बांधून गर्दी गोळा करून माझी खुर्ची कुठे ओढून घेता याची मला सतत काळजी लागलेली असते.

शिंदे साहेब, आता इकडे-तिकडे पळापळ करायची गरज नाही. आता आपले मित्र देवाभाऊ आणि दिल्ली मधले नवे ज्येष्ठ मित्र करण-अर्जुन आपल्या सोबत आहेत. आता माझेच पाहा ना? मी ताईबरोबरचे रक्षाबंधन सोडून देऊन तुम्हाला फे्ंरडशिप बँड बांधून आलोच की नाही इकडे? त्यामुळे आपली दोस्ती तुटायची नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news