लवंगी मिरची : मग, मी पुन्हा परत जाईन!

लवंगी मिरची : मग, मी पुन्हा परत जाईन!

विक्रमाच्या पाठीवर बसलेला वेताळ म्हणाला, हे राजा, स्वतःला राजकारणाची फार समज आहे, असे तू नेहमी म्हणतोस. तुझी परीक्षा घेण्यासाठी मी एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचे अचूक उत्तर तू दिले नाहीस, तर मी पुन्हा मुक्त होऊन झाडाला लटकून बसेन. तर माझा प्रश्न आहे, ऐक… महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या चार वर्षांत प्रचंड उलथापालथ झालेली आहे. येत्या निवडणुकीमध्ये अर्थात येत्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकी लढत कोणत्या कोणत्या पक्षांमध्ये होईल आणि शेवटी कोणती आघाडी किंवा युती सत्तेवर येईल? आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण असेल, याचा अचूक अंदाज सांगितला नाहीस, तर मी पुन्हा परत जाईन आणि किमान पाच वर्षे तरी येणार नाही.

राजा विचारात पडला. शेवटी त्याने उत्तर देण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, हे वेताळा महाराष्ट्राचे राजकारण समजणे अत्यंत कठीण झालेले आहे. म्हणजे बघ, निवडणूक पूर्व युतीमध्ये भाजप आणि सेना मिळून लढले; पण सेना मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसली. शेवटी सेनेने 'घड्याळ' आणि 'पंजा'बरोबर हात मिळवणी करून मुख्यमंत्रिपद मिळवले; पण त्यांच्यामधून फुटून एक गट भाजप सोबत गेला आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. आता आघाडी आणि युती असे दोन प्रकारचे उपक्रम या राज्यामध्ये राबवले जात आहेत. त्या युतीमध्ये आणखी 'घड्याळ'वाल्या पक्षाचे लोक येऊन मिळाल्यामुळे आजकाल त्याला महायुती असे म्हणत आहेत. म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये फाईट होणार आहे.

येणार्‍या निवडणुकांमध्ये महायुतीमधील तीन घटक पक्ष मिळून एकत्र लढतील. सध्या सत्ता हातात असल्यामुळे आणि ती पुढेही हाती येण्याची शक्यता असल्यामुळे हे तिन्ही पक्ष उत्साहात आहेत. त्यात विशेष काही, तरी कॅल्क्युलेशन होऊन मुख्यमंत्रिपद आपल्याला मिळेल, अशी अपेक्षा ठेवून 'घड्याळ'वाल्या पक्षाचा दादा नावाचा नेता राज्यभर प्रचार करील. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदावर विराजमान असलेला मूळ सातारचा नेता पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, कोकण या भागामध्ये दांडपट्टा फिरवील.

विदर्भ निवासी असलेला निरागस चेहर्‍याचा तिसरा नेता राज्यभर झंजावात निर्माण करेल. शिवाय या तीन नेत्यांच्या पाठीशी दिल्लीवरून रणगाडा आणि लखनौवरून बुलडोझर सोबतीला येतील. प्रचाराची एकच राळ उडेल. या झंजावाताला थांबवणारा सक्षम नेता आघाडीकडे नसल्यामुळे त्यांची वाताहत होण्याची शक्यता मला स्पष्ट दिसत आहे, तरीपण क्रिकेटमध्ये आणि राजकारणामध्ये कधी काय होईल, सांगता येत नाही. आघाडीमधून एखादा तरुण नेता उभा राहून या महायुतीला टफ फाईट देण्याचा प्रयत्न करेल; पण तशी शक्यता मला कमी दिसते. जानेवारीमध्ये अयोध्येत राम मंदिर जनतेसाठी खुले होत आहे. त्याचाही बर्‍यापैकी परिणाम महाराष्ट्रातील जनतेवर होणार आहे. खरे तर, महाराष्ट्रातील राजकारण पुढे कसे चालेल, हे प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्रच सांगू शकतील. माझ्यासारख्या पामराचे हे काम नाही.

हे राजन, तू केलेले विश्लेषण बरेचसे बरोबर आहे; परंतु महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, याविषयी तू काही अंदाज व्यक्त केलेला नाहीस. माझ्या मताप्रमाणे या ठिकाणी तुझी बुद्धी कुंठीत झालेली आहे. त्यामुळे मी दिलेल्या प्रश्नाचे बरोबर उत्तर न दिल्यामुळे मी पुन्हा मुक्त होऊन झाडावर लटकण्यास जात आहे. आता यानंतर थेट तुला पाच वर्षांनंतर मला भेटण्याची संधी मिळेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news