काय रे मित्रा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या कुत्र्याचे नाव तुला माहीत आहे का?
अरे, सोपे आहे. ज्यो यांच्या कुत्र्याचे नाव टॉमी असेल नाही, तर मोत्या असेल. आपल्याला काय फरक पडतो?
अरे, तसं नाही. त्यांच्या कुत्र्याचे नाव आहे कमांडर! आपल्याकडे वडाप नावाच्या वाहनासाठी पूर्वी कमांडर नावाची काळी-पिवळी जीप असायची. ती बेधडक चालवून अवैध वाहतूक करणारे चौफेर धडका मारायचे. म्हणून ज्यो यांनी आपल्या कुत्र्याचे नाव कमांडर ठेवले की काय माहीत नाही; पण या कमांडर नावाच्या कुत्र्याने राष्ट्राध्यक्ष महोदयांना त्रस्त करून सोडलेले आहे. दिसेल त्याला चावण्याचा त्याने सपाटा लावला आहे. आजवर तब्बल दहा लोकांना त्याने चावा घेतला असून त्यापैकी एक जणाला गंभीर जखमी पण केले आहे.
अरे, अमेरिकेचाच कुत्रा तो! त्याला सवयच असणार चावे घेण्याची. मी असं ऐकलं आहे की, कुत्र्यांचे वागणे हे त्यांच्या मालकाच्या वागण्यासारखे असते म्हणे! म्हणजे मालक जर तुसडा असेल, तर त्याचा कुत्रा पण तसाच असतो म्हणे! मालक जर प्रेमळ असेल, तर त्याचा कुत्राही प्रेमळ असतो म्हणे! अमेरिकेच्या अध्यक्षांचा कुत्रा म्हणजे काय साधासुधा प्राणी आहे की काय? समर्थाघरचे श्वान म्हणतात ते उगाच नाही.
आता हा व्हाईट हाऊसमध्ये राहणारा कुत्रा काहीतरी तीन-एक वर्षाचा झाला आहे. म्हणजे, त्याची समज आता चांगली वाढलेली आहे. समज वाढल्याबरोबर त्याला आपल्या ताकदीचा अंदाज आला असणार. जगातील सर्वात शक्तिशाली माणूस आपला मालक आहे, याचा त्या कुत्र्याला गर्व झाला असेल आणि मग त्याने दिसेल त्याला चावायला सुरुवात केली असेल.
तू म्हणतोस ते बरोबर आहे. नाही तरी, अमेरिकेला सगळ्या जगामध्ये कारभार करण्याची सवय आहे. जिथे आपला काही संबंध नाही तिथे लुडबुड करण्याची त्यांची पॉलिसी आहे. अफगाणिस्तानमध्ये त्यांनी तेच केले आणि आता जगभर ते तेच करत आहेत.
मी काय म्हणतो, कुत्र्यांना आजकाल प्रशिक्षण देतात ना? मग, कमांडरला प्रशिक्षण दिले नाही की काय?
अरे, तसे नाही. त्याला प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर पाहिले काही दिवस तो चांगला वागू लागला; पण प्रशिक्षण संपले आणि पुन्हा त्याने चावाचाव करण्यास सुरुवात केली. त्यामुळे म्हणे बायडेन कुटुंब त्रस्त झाले आहे. चावू नकोस असे ज्यो यांनी सांगूनसुद्धा याच्या वागण्यात काही फरक पडलेला नाही. त्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये कमांडरच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे. यावरूनच त्याचे नाव बो ठेवायला पाहिजे होते.
बाय द वे, तुझ्या जनरल नॉलेजमध्ये भर पडावी म्हणून सांगतो, अमेरिकेचे पूर्वीचे अध्यक्ष ओबामा यांच्या कुत्र्याचे नाव बो असे होते. इंग्लंडचे पंतप्रधान आपल्या भारतीय वंशाचे असलेले आणि सुधा व नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनाक यांच्या कुत्र्याचे नाव 'नोवा' असे आहे म्हणे!
वा रे पठ्ठे, शाबास! जनरल नॉलेजमध्ये अध्यक्ष कोण, राजधानी कोणती याला महत्त्व होते. त्याची जागा प्रमुखांच्या कुत्र्यांच्या नावाने घेतलेली आहे, असे दिसते. तुझे तुलाच लखलाभ होवो, हे असले जनरल नॉलेज!
– झटका