सार्वजनिक सत्य धर्म : मानव कल्याणाचा विचार

सार्वजनिक सत्य धर्म : मानव कल्याणाचा विचार

महात्मा जोतिराव फुले (1827-1890) हे आधुनिक भारतातील एक अग्रणी समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वचिंतक व साहित्यिक होते. स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा, समता, सामाजिक न्याय, श्रमप्रतिष्ठा हा क्रांतिकारी मूल्यविचार त्यांनी दिला. फुले यांनी 'सार्वजनिक सत्य धर्म' हा ग्रंथ स्त्री-पुरुषांनी काय काय करावे, एकमेकांशी कोणत्या तर्‍हेचे आचरण केल्याने त्यांचे हित होणार आहे, याचे विवेचन करण्यासाठी लिहिला. आज बुधवारी त्यांची जयंती आहे.

मानव जातीच्या ऐहिक कल्याणाचा आशय, कालानुरूप परिवर्तनशीलता, गतिशीलता, लवचिकता, खुलेपणा, चिकित्सा करून नवी भर घालण्याचे स्वातंत्र्य हे सत्य धर्माचे विशेष होते. कोणताही भाग सार्वजनिक अयोग्य किंवा खोटा दिसला, तो किंवा या ग्रंथाच्या द़ृढीकरणार्थ जर काही सत्य विचार सुचविणे असेल, तर ते कळवावे, असे आवाहन महात्मा फुले यांनी केले होते. म्हणजे सार्वजनिक चिकित्सेचे, कालसापेक्ष बदलाचे स्वातंत्र्य त्यांनी दिले होते. जगातील बहुतेक धर्मांनी चिकित्सेवर कडक निर्बंध लादले आहेत. या पार्श्वभूमीवर फुले यांचा सत्य धर्म लोकशाहीवादी होता. इहवाद हा सत्य धर्माचा पाया आहे. माणसाने ऐहिक जीवनात सुख साधावे. माणूस योग्य रीतीने वागला, तर सुखप्राप्ती होते. हे जग पवित्र आहे. स्वत: परिश्रम करून कुटुंब पोसले पाहिजे. मेहनत, मशागत, श्रम करून उपभोग्य वस्तूंची वाढ केली पाहिजे. वैज्ञानिक द़ृष्टीने ज्ञान कमवून मानव कल्याणासाठी त्याच्या उपयोजना केल्या पाहिजेत, असा ऐहिक कल्याणास प्रवृत्त करणारा विचार त्यांनी मांडला. मोक्ष, पारलौकिक जीवन, गूढवाद, चमत्कार, कर्मकांडप्रधान धार्मिकता, उच्च-नीच आदींना सत्य धर्मात स्थान नाही. फुले यांनी 'निर्मिक' ही नवी संज्ञा वापरली. 'सूर्यमंडळासह, पृथ्वीवरील प्राणिमात्रांसह पशू-पक्षी, वृक्ष आदींचा निर्माणकर्ता असे निर्मिकाचे स्वरूप सांगितले; परंतु त्यापुढे जाऊन निर्मिकाचे महत्त्व वाढले नाही. उलट निर्मिकाचा शोध, दर्शन, पूजा, नामस्मरण, अनुष्ठान वगैरे मार्ग अवलंबू नयेत, असे त्यांनी निक्षून सांगितले. निर्मिकाची उपासना कर्मकांडाच्या पातळीवरची न ठेवता तिला विधायक पर्याय दिला.

उदा. ईश्वराची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्याऐवजी परिश्रमाने कुटुंबाचे पोषण करून जगाच्या कल्याणासाठी झटणार्‍या सत्पुरुषास फुलांच्या माळा करून ईश्वराच्या नावाने अर्पण कराव्यात. कोणत्याही प्रकारचा भेदाभेद न करता जगाच्या कल्याणासाठी झटणार्‍या कोणत्याही व्यक्तीला मदत करण्याचे आवाहन फुले यांनी केले. श्रमनिष्ठ जीवन, बंधुभाव, नैतिकता, समाजोपयोगी कार्य, सार्वजनिकहिताला त्यांनी महत्त्व दिले. एकंदर सर्व मानवाबरोबर थेट सात्विक आचरण. श्रमाप्रमाणे उपभोग आणि सर्वांशी भावंडासारखे वर्तन केल्यास ईश्वराचे राज्य अस्तित्वात येईल, असे फुले यांचे मत होते. त्यांनी तर्कशुद्ध विचार, कार्यकारणभाव, बुद्धिवादाला महत्त्व दिले. ध्यानधारणा, जप, अनुष्ठान यापेक्षा तर्कशुद्ध पद्धतीने विचार करून भौतिक वस्तूंचा मानवजातीच्या प्रगतीसाठी वापर करणार्‍या समाजाचे स्वप्न त्यांनी पाहिले. स्वर्ग, नरक, ग्रह, राशी, दैव आदी भ—ामक कल्पितांची तार्किक चिकित्सा केली. पुण्याची संकल्पना माणसाच्या व्यावहारिक आचरणाशी जोडली. देवालयापेक्षा गरिबांचे दु:ख, दैन्य निवारण व भेदाभेद निर्मूलन त्यांनी अधिक पुण्यप्रद मानले. पारंपरिक विधींना कालानुरूप, व्यवहार्य पर्याय दिले.

सार्वजनिक सत्य धर्ममध्ये नीती आणि सत्य वर्तन यांना महत्त्व आहे. नीती म्हणजे कोणत्याही मानवाबरोबर बंधुत्वाचे आचरण. सत्य वर्तन करणारे कोणाला म्हणावे याचे 33 नियम देऊन सुस्पष्ट व कल्याणकारी सामाजिक आचारसंहिता सांगितली. मानवी अधिकारांच्या जागतिक जाहीरनाम्यातील काही कलमे व 'सार्वजनिक सत्य धर्म'मधील सत्य वर्तनाचे नियम यामध्ये विलक्षण साम्य आढळते तसेच भारतीय संविधानातील तरतुदी व मार्गदर्शक तत्त्वे यांच्याशीही साम्य आढळते. यामधून मानवी हक्कांविषयीची फुले यांची सजगता आणि वैश्विक द़ृष्टिकोन दिसून येतो.

स्त्री-पुरुष समानतेचा जोरदार पुरस्कार हा फुल्यांच्या विचारविश्वाचा एक असाधारण पैलू होता. त्यांनी स्त्रीला पुरुषापेक्षा श्रेष्ठ मानले. कावेबाज पुरुषांनी संहिता, स्मृत्या रचून स्त्रियांच्या गुलामगिरीला धर्मशास्त्राचा बळकट आधार दिल्याने दुष्ट चाली आजपर्यंत सुरू आहेत. पुरुषवर्गाने स्वार्थी हेतूने धर्म पुस्तकात स्त्रियांविषयी मतलबी लेखन केले, याचा फुले यांनी तीव— शब्दांत धिक्कार केला.

'आपल्यावरून जग ओळखण्याची' जीवनद़ृष्टी त्यांनी घालून दिली. पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनी दोन-तीन नवरे करून सवता आणल्यास पुरुषांना चालेल का? पूर्वी स्त्रिया 'सती' जात; परंतु पत्नीवरील प्रेमापोटी एकतरी पुरुष कधी 'सता' गेल्याचे ऐकले आहे काय, असे मूलभूत प्रश्न उपस्थित करून 'घ्यायचे माप एक आणि द्यायचे माप एक' अशा दुटप्पी प्रवृत्तीस त्यांनी धारेवर धरले. माणसामाणसांत भेद करणे हेच खरे पाप असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. स्त्रियांनी धर्मग्रंथ लिहिले असते, तर पुरुषी पक्षपातीपणाला लगाम बसला असता. पुरुषवर्ग नऊ महिने ओझे वाहणार्‍या जन्मदात्या मातांविषयी व एकंदर स्त्री जातीविषयी कृतघ्न होऊन त्यांना दासीसारखे वागवितात. यामुळे जगात सत्याचा र्‍हास होऊन असंतोष व दु:ख उत्पन्न झाले आहे, असे फुले यांनी ठणकावले. सर्वधर्मसमावेशक उदारमतवादी आदर्श कुटुंबाचे चित्र त्यांनी रेखाटले. सर्वजण निर्माणकर्त्यांने निर्माण केलेली लेकरे असून त्याच्याच (निर्मिकाच्या) कुटुंबातील आहोत, असे समजून प्रेमाने व गोडीगुलाबीने एकमेकांशी वर्तन करावे, असे त्यांनी म्हटले. शुद्रातिशुद्रांची उपेक्षा करणार्‍या राष्ट्रवादाला फुले यांनी अपवित्र देशाभिमान असे म्हटले आहे. त्यांनी 'एकमय लोक' अशी राष्ट्राची स्वतंत्र संकल्पना मांडली. वर्ण-जातीविरहित समाज निर्माण झाल्याशिवाय एकात्म राष्ट्र अस्तित्वात येणार नाही, हे त्यांचे विवेचन आजही तंतोतंत लागू पडते. जोतिराव फुले यांनी नेहमीच जातीविरहित समाजाचे समर्थन केले आणि त्याच जोतिराव फुले यांच्या विचारातून त्यांची दूरद़ृष्टी दिसते. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून अनेक महान नेत्यांनी काम केले. फुले हे खर्‍याअर्थाने मोठे समाजसुधारक होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news