तडका : सुट्ट्या न घेण्याचा पॅटर्न

तडका : सुट्ट्या न घेण्याचा पॅटर्न
Published on
Updated on

शासकीय कर्मचारी असणे हे स्वतंत्र प्रकरण आहे. कोणे एकेकाळी आणि काही भागात आजही ज्या मुलाला सरकारी नोकरी असेल त्याचे स्थळ विवाहासाठी सर्वात उत्तम समजले जात असे. किंबहुना आजही तीच भावना कायम आहे. सरकारी नोकरीचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ती अत्यंत सुरक्षित असते. विशेष काही तक्रारी किंवा भानगडी केल्या नाहीत, तर निवृत्तीपर्यंत सुखरूप नोकरी करता येणे सरकारी नोकरांना शक्य आहे. शिवाय भरपूर पगार आणि त्या तुलनेत कमी काम ही इतर आकर्षणे आहेतच. भारतामध्ये पारशी समाजाच्या लोकांची संख्या जेमतेम लाखभर असेल, तरी पारशी नववर्ष दिनाची सुट्टी सरकारी नोकरांना असते. अशीच सुट्टी गुरुगोविंद सिंग जयंतीची पण असते. नियमित सार्वजनिक सुट्ट्यांशिवाय जिल्हाधिकारी यांच्या अधिकारात तीन सुट्ट्या असतात. या सुट्ट्या स्थानिक सणवारांच्या दिवशी दिल्या जातात. जिल्ह्यातील मोठ्या जत्रा, उरूस किंवा महालक्ष्मीचे सण अशा प्रकारच्या वेगळ्या सुट्ट्या असतात.

भरपूर आराम, भरपूर पगार यामुळे सरकारी नोकर आपल्या पद्धतीने निवांतपणे काम करत असतात. भरपूर (?) काम पडत असल्यामुळे प्रत्येक आठवड्याला शनिवार, रविवारची सुट्टी ही असतेच. याला अपवाद ठरले आहेत, उत्तर प्रदेशातील बिजनोर जिल्ह्यातील एक कर्मचारी तेजपाल सिंह. सर्वात कमी रजा घेतल्यामुळे सध्या ते चर्चेत आले आहेत. सदरील सद्गृहस्थांनी आपल्या सव्वीस वर्षांच्या नोकरीत केवळ एकच सुट्टी घेतली आहे. त्यामुळे त्यांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये झालेली आहे. तेजपाल सिंह यांनी नोकरीदरम्यान केवळ एकच सुट्टी घेतली आणि ती पण त्यांच्या धाकट्या भावाच्या लग्नासाठी. दिवाळीचा सण असो किंवा रविवार असो, सर्वांना सुट्टी असली, तरी तेजपाल सिंह अजिबात घरी थांबत नाहीत. सुट्टीच्या दिवशीही ते कार्यालयात येत असतात हे अजबच म्हणावे लागेल. आपल्या कामाप्रती असलेल्या निष्ठेचे हे अद्भुत असेच उदाहरण आहे.

घरी शांतता मिळत नाही म्हणून बरेच कर्मचारी उत्साहाने कार्यालयात जातात असा काही प्रकार सिंह यांच्या बाबतीत आहे की नाही, याविषयी माहिती समजली नाही. काही कर्मचारी रागीटपणामुळे घरातील लोकांना जीव नकोसा करतात. त्यामुळे ते कार्यालयात गेले की, घरातील लोकांना शांतता मिळते असे त्यांच्या बाबत झालेले आहे की नाही, याविषयी माहिती कळत नाही; पण एक निश्चित की, तेजपाल सिंह यांचे अधिकारी मात्र त्यांच्यावर कायम खूश असतील. कारण, दिवस कोणताही असो ते हमखास कार्यालयात उपलब्ध असतात. अशा कर्मचार्‍यांची संख्या वाढावी आणि इतर कर्मचार्‍यांनी त्यांच्याकडून हा वसा घ्यावा म्हणून सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. सुट्टीचा अर्ज केल्याबरोबर इतर कर्मचार्‍यांना त्यांचे साहेब लोक 'तेजपाल सिंह यांच्याकडे बघा आणि काही शिका. सारखेसारखे सुट्ट्या काय घेता' असे म्हणून झापत असतील. तेजपाल सिंह यांना विविध राज्यांनी आमंत्रित करून आपल्या कर्मचार्‍यांसमोर त्यांची व्याख्याने आयोजित केली पाहिजेत. तेजपाल पॅटर्न सर्व कर्मचार्‍यांमध्ये लोकप्रिय झाला, तर जनताही शासनाला आशीर्वाद देईल, यात शंका नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news