चतुर्दशी दोन दिवसांमध्ये विभागलेली असेल तर ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते. यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून, रात्रीला महत्त्व आहे, हे स्पष्ट होते. नित्यशिवरात्र, पक्षशिवरात्र, मासशिवरात्र, योगशिवरात्र आणि महाशिवरात्र असे शिवरात्रीचे पाच प्रकार असून, त्यापैकी महाशिवरात्र ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. भगवान शंकरांच्या पूजनामध्ये बारा ज्योतिर्लिंगांचे महत्त्व सांगितले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भारतातील काशी, रामेश्वरम, गोकर्ण, वैजनाथ, शिखर शिंगणापूर आदी असंख्य शिवक्षेत्रांमध्ये यात्रा भरतात. ज्योतिर्लिंगांच्या पाण्याच्या कुंडात स्नान करणे शुभ मानले जाते. महाशिवरात्रीचे व—त कसे करावे, याविषयी धार्मिक, पौराणिक ग्रंथांमध्ये तपशीलवार विवेचने आढळतात. त्यानुसार उपवास, पूजा आणि जागरण ही या व—ताची तीन प्रमुख अंगे आहेत. महाशिवरात्र हे कल्याणकारी शिवाचे आराधनापर्व मानले जाते. पृथ्वीची निर्मिती झाली, तेव्हा याच तिथीला मध्यरात्री भगवान शंकरांनी रौद्ररूप धारण केले होते. यामुळे या रात्रीला कालरात्री, असेही म्हटले जाते. याच महिन्यामध्ये सूर्याचा उत्तरायणाचा प्रवास सुरू होतो. या महिन्यात होणारे ऋतुपरिवर्तनही शुभ मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकर आणि पार्वती यांचा विवाह झाला होता, असाही संदर्भ आढळतो. स्कंदपुराणामध्ये भगवान शंकर पार्वतीला म्हणतात की, हे देवी, माझा जो भक्त शिवरात्रीचे व—त करतो, त्याला दिव्य गणत्व प्राप्त होऊन तो मोक्षाला जातो. महाशिवरात्रीचे व—त सर्व पापांचा नाश करणारे असते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी नेहमीपेक्षा हजार पटींनी ऊर्जा कार्यरत असते. या ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी 'ॐ नमः शिवाय' हा नामजप करावा, असे धर्मशास्त्र सांगते. शंकरांच्या पूजनामध्ये रुद्रपूजन सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. आपल्याकडे लघुरुद्र, महारुद्र करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. अलीकडील काळात अनेक अभ्यासकांनी रुद्रामधील मंत्रोच्चारांमुळे निर्माण होणार्या सकारात्मक तरंगांमुळे व्यक्तींच्या स्वभावप्रवृत्तींवर कसे अनुकूल परिणाम होतात, यासंदर्भातही अभ्यास केलेले आहेत.