हे सारे ठिक असले, तरी अर्थसंकल्पाचा दस्तावेज पाहिला तर मावळत्या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात खर्च करण्याचे सरकारचे उद्दिष्ट केवळ कागदावरच राहिल्याचे दिसते; मग तो पायाभूत सुविधांवर होणारा भांडवली खर्च असो अथवा दलित, आदिवासी, अल्पसंख्याक समुदायांसाठी असो, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रही या खर्च कपातीपासून दूर राहिलेले नाही. सरकारला शिक्षणावर 1,16,417 कोटी रुपये खर्च करायचे होते; पण 1,08,878 कोटी रुपये खर्च झाले. त्याचप्रमाणे आरोग्यासाठी 88,956 कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक केले; परंतु प्रत्यक्षात केवळ 79,221 कोटी रुपये खर्च केले. (या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी पुढील आर्थिक वर्षात शिक्षण आणि आरोग्यावर खर्च वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.) बाजारातील मरगळ दूर करण्यासाठी, सरकारने मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी 10 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक तरतूद केली होती. प्रत्यक्षात हा खर्च साडेनऊ लाख कोटी रुपये झाला आहे. म्हणजे 50 हजार कोटी रुपये सरकारचा खर्च झालेला नाही. अशाच प्रकारे शिक्षण क्षेत्रात सुमारे आठ हजार कोटी रुपयांची, आरोग्य क्षेत्रात 9 हजार कोटी रुपयांची, कृषी आणि पूरक क्षेत्रात 3,600 कोटी रुपयांची, सामाजिक कल्याण क्षेत्रात 8,300 कोटी रुपयांची, शहरी विकासात 7,100 कोटी रुपयांची खर्चात कपात झाली आहे. तुलनेत खते, इंधन आणि अन्नधान्य यावरील अंशदानात 38.75 हजार कोटी रुपयांनी वाढ करावी लागली.