श्रीरामासह चार बंधू ज्ञानसंपन्न, गुणसंपन्न झाले. वेदविद्येसह धनुर्वेदाने पारंगत झाले. सकल गुणसंपन्न अशा या पुत्रांच्या विवाहाविषयीचे विचार राजा दशरथाच्या मनी येऊ लागले. राजा याविषयी आपल्या मंत्रिगणाशी चर्चा करीत असतानाच तपोनिधी विश्वामित्र ऋषी यांचे आगमन झाले. राजाने त्यांचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. पूजन केले. राजाने, आपले मजकडे काय कार्य आहे, त्याची आज्ञा करावी, असे विनयशीलतेने प्रार्थिले. तेव्हा महर्षी विश्वामित्र प्रमुदित झाले. त्यांनी आपला मनोदय प्रकट केला. ते म्हणाले, "राजन, मी यज्ञदीक्षा घेतली असता मायावी रूप धारण करणारे दोन राक्षस यज्ञामध्ये विघ्न आणीत आहेत. अनेकदा मी दीक्षाविधी संपवण्याच्या मार्गावर असता, मारीच आणि सुबाहु हे राक्षस यज्ञवेदीत रक्त-मांसाचा सडा ओतत आहेत. यज्ञकर्म करताना शाप देणे योग्य नसल्याने मी हतबल झालो आहे. तेव्हा या राक्षसांचे पारिपत्य करण्यासाठी हे राजा, तुझा पुत्र श्रीराम याला तू माझ्या स्वाधीन कर! मी त्याचे सर्वथा कल्याण करीन आणि त्याच्यापुढे हे राक्षस टिकाव धरू शकणार नाहीत."
महर्षी विश्वामित्रांचे हे मागणे ऐकून राजा दशरथ शोकाकुल झाला. मूर्च्छित झाला. सावध झाल्यावर तो म्हणाला, "हे ब्रह्मर्षी, श्रीरामाचे वय सोळा वर्षांहून कमी आहे. मी एक अक्षौहिणी सैन्यासह या राक्षसांशी युद्ध करीन. मीच त्यांना पिटाळून लावीन. रामाला त्यासाठी नेऊ नका! रामाचा वियोग मला सहन होणार नाही." त्यावर संतप्त विश्वामित्र म्हणाले, "हे राजन, आधी करीन असे सांगून नंतर त्याला नकार दिल्याने प्रतिज्ञा भंग होत आहे. रघुकुलाला हे शोभत नाही. तू प्रतिज्ञा असत्य केलीस. तेव्हा मी आता माझ्या मार्गाने जातो."
विश्वामित्रांच्या क्रोधाने सारी पृथ्वी भयकंपित झाली. तेव्हा राजपुरोहित वसिष्ठ मुनी पुढे आले. त्यांनी राजाला समजावले. विश्वमित्राएवढे शस्त्र-शास्त्र ज्ञान कोणास नाही. त्याच्या सान्निध्यात राक्षस रामाचे तेज सहन करू शकणार नाहीत. तेव्हा प्रतिज्ञा भंग न करता रामाला विश्वामित्रांबरोबर जाऊ दे. अशा रीतीने समजावणी झाल्यानंतर दशरथाने श्रीरामाला विश्वामित्रांच्या स्वाधीन केले. त्याच्यासमवेत भ्राता लक्ष्मण हाही चालू लागला.
दोघा बंधूंना घेऊन विश्वामित्र शरयू नदीच्या दक्षिण तीरी आले. तेथे त्यांनी श्रीरामाला बला आणि अतिबला या विद्यांचे समंत्रक शिक्षण दिले आणि 'आता त्रैलोक्यातही तुझ्या बरोबरीचा कोणी असणार नाही,' असा आशीर्वाद दिला. पुढे शरयू आणि भागीरथी यांच्या संगमावर अनेक थोर मुनिवरांचे आश्रम त्यांनी पाहिले. गंगा नदी ओलांडून विश्वामित्र राम-लक्ष्मणासह दक्षिण तीरी आले. तेव्हा त्यांना निबिड अरण्य समोर दिसले. सुंद-उपसुंद या महाराक्षसांपैकी सुंद याची पत्नी ताटिका हिचे वास्तव्य या ठिकाणी असे. तिने या प्रदेशाची धूळधाण केली. त्याचे निबिड अरण्य झाले. तिने या वनाची वाट अडवून धरली आहे. तिचा वध करून, हे वन, हे रामा, तुला निष्कंटक करावयाचे आहे, असे या महावनाविषयी विश्वामित्रांनी कथन केले.
या राक्षसीचा पुत्र मारीच महाबलाढ्य आहे. अगस्ती मुनींच्या शापाने तो राक्षस झाला आणि ताटिकेलाही अक्राळविक्राळ रूप प्राप्त झाले, ती स्त्री आहे, म्हणून तिचा वध करता येणार नाही, असा विचार करू नको. आपल्या नृशंस कृत्यांनी ती शिक्षेस प्राप्त झाली आहे, असे सांगून मुनिवरांनी श्रीरामाला ताटिका वधाचा आदेश दिला. तेव्हा महापराक्रमी श्रीरामाने धनुष्याचा टणत्कार केला. त्या महाशब्दाने सारे अरण्य थरकापून उठले. त्या आवाजाने संतप्त झालेली राक्षसी ताटिका रामाच्या रोखाने महागर्जना करीत धावून आली. मायेचा अवलंब करून ताटिकेने त्या दोघांवर पाषाणांचा वर्षाव केला. त्यामुळे श्रीराम अति कु्रद्ध झाला आणि त्याने शरवर्षावाने पाषाण शतखंड केले. पुढे ताटिका धावून येत असता श्रीरामाने अमोघ बाणाने तिच्या दोन्ही हातांचे खंडन केले. हात तुटलेल्या स्थितीतही तिच्या गर्जना सुरूच होत्या. तेव्हा लक्ष्मणाने तिचे कान आणि नाक कापून टाकले. एवढे झाले, तरी मायावी रूप धारण करून ताटिकेने उभयता बंधूंवर पाषाणवृष्टी सुरूच ठेवली. तेव्हा, आता या मायाविनीचा समूळ उच्छेद कर, असा स्पष्ट आदेश विश्वामित्रांनी श्रीरामाला दिला. त्यावर ककुत्थकुलोत्पन्न श्रीरामाने बाणवृष्टीने तिला जखडून टाकले आणि वर्मी बाण मारून तिचा अखेर वध केला. ताटिकेचा वध होताच, इंद्रासह देवदेवतांनी विश्वामित्र आणि श्रीरामाची प्रशंसा केली. श्रीराम आपला आप्तशिष्य आहे, त्याच्यावर पूर्ण अनुग्रह करावा, असे देवदेवतांनी विश्वामित्राला सांगितले. मुनिवरांनी त्याचा सहर्ष स्वीकार केला.
दुसरे दिवशी मुनिवरांनी अतिप्रसन्न चित्ताने ब्रह्मास्त्रासह विविध अस्त्रे आणि शक्ती यांचा मंत्रसमुदाय श्रीरामाला अर्पण केला. विश्वामित्रांनी अस्त्रांचे मंत्रजप करतच सर्व अस्त्रे मूर्त रूपाने श्रीरामासमोर उपस्थित झाली. त्यांना रामाने स्पर्श केला आणि मी स्मरण करताच प्रकट व्हावे, अशी अस्त्रांना आज्ञा दिली. त्यानंतर विश्वामित्रांनी त्याला अस्त्रांचा उपसंहारही शिकविला. आता तू अजिंक्य महावीर झालास, असा आशीर्वाद महर्षी विश्वामित्रांनी श्रीरामाला दिला.
॥ जय श्रीराम ॥