‘नो रिस्क, नो गेम, नो सक्सेस’

‘नो रिस्क, नो गेम, नो सक्सेस’

इंग्रजीत एक म्हण आहे – 'नो रिस्क, नो गेम!' या स्पर्धेच्या युगात ही म्हण आणखी विस्तारता येईल. 'नो रिस्क, नो गेम, नो सक्सेस.' जर तुम्ही जोखीम घेतली नाही, तर तुम्हाला काहीही मिळणार नाही. जेव्हा आपण जबाबदारी घ्यायची टाळतो, त्यावेळी आपण कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही आणि आलेल्या अपयशाबद्दल इतरांना दोषी ठरवून आपण आपल्या चुकांपासून काही शिकत नाही. आपण अपयशाची कारणमीमांसा प्रामाणिकपणे केली आणि कॅलक्युलेटेड रिस्क घेऊन प्रयत्न केले, तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीच रोखू शकणार नाही.

संधी नेहमी अस्तित्वात असते; पण ती पाहणार्‍याला दिसते आणि तिला धीटपणे उचलणार्‍याला ती वश होते. जे लोक डोळसपणे संधी पाहतात, त्यांनाच ती दिसते. खूपवेळा संधी खुणावत असते; पण माणूस घाबरुन संधी पकडत नाही. संधीला संकट समजून माणूस संधीपासून पळ काढतो. जीवनात येणारा प्रत्येक क्षण ही आपल्याला मिळालेली संधी असते. आपल्या भाग्योदयासाठी चांगला उपयोग करायचा, की संधी सोडून वेळ वाया घालवायचा, हे शेवटी तुमच्यावर अवलंबून असते. संधी नुसती दिसून उपयोगी नाही, तर तिला धरून वापरली, तरच ती फायदेशीर ठरते.

माणसाच्या दुःखाचे, निराशेचे कारण तो पुढे येण्यासाठी संधी शोधत नाही, यात आहे. जेव्हा आपण संधी पकडतो, तेव्हा त्यात जोखीम असते. अशावेळी एक तर आपल्याला यश येते किंवा अपयश येते. पण जो कधी संधी शोधत नाही, तिचा पाठलाग करीत नाही, त्याला यश कधीच येत नाही. संधीच्या बाबतीत आपले खूप गैरसमज आहेत. काही म्हणतात, 'संधी आयुष्यात एकदाच दरवाजा ठोठावते. संधी ही आपला काका, मामा मोठ्या पदावर असेल, तर विनासायास मिळते. संधी आपण होऊन चालून यावी लागते आणि नशीब असेल तरच ती चालून येते,' या सर्व कल्पना चुकीच्या आहेत.

बातमीदारांना बातम्या जशा सोर्सेसशिवाय मिळत नाहीत तसेच संधीचेही. इतरांशी केलेली चर्चा, गप्पागोष्टी, वाचनाचा छंद असेल तर पुस्तके, पर्यटनाची हौस असेल तर निसर्ग, यातून संधी शोधता येते. कारण प्रवास संधीला हितकारक असतो, तर डोळस निरीक्षक संधीला उपकारक ठरतो. वाचनाचा छंद संधीला दिशा दाखवतो. दुसर्‍याच्या अनुभवातून आणि अपयशातूनसुद्धा संधी शोधता येते. संधी शोधणारे आणि तिचा फायदा घेणारे, लोक काय म्हणतील याची तमा बाळगत नाहीत. नवनवे विचार नव्या कल्पनांना जन्म देतात, अन् या नवकल्पनांमधून नवोन्मेष असणारे स्टार्टअप आकारास येतात. सध्या जे तरुण नावीन्यपूर्ण संकल्पनांचा अवलंब करून मोठमोठे उद्योग सुरू करीत आहेत, भविष्य त्यांची वाट पहात आहे. संधी आपोआप त्यांच्या पायाशी लोळण घेत आहे. त्यामुळे एखादी नवी कल्पना तुमच्या डोक्यात आली, तर तिला वाट मोकळी करून द्या. तिला वाट दिली, तर कितीतरी प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील आणि संधी आपोआप मिळेल.

बहुसंख्य लोक आयुष्यात कोणतेच ध्येय न ठेवता जगत असतात. त्यांचे आयुष्य समुद्रात शिडाअभावी भरकटलेल्या जहाजासारखे असते. आपल्याला काय करायला हवे, कोणत्या गोष्टीला आयुष्यात महत्त्व द्यायला हवे, कोणाला अग्रक्रम द्यायला हवा, हे ज्याचे त्याने ठरवायला हवे. अग्रक्रम आणि दिरंगाई याचे हाडवैर आहे. अनेक लोक जीवनात कोणते काम अतिमहत्त्वाचे, कोणते थोडे महत्त्वाचे, कोणते काम उद्या केले तरी चालेल, यातला फरक ओळखू शकत नाहीत. प्रत्येक गोष्टीत ते दिरंगाई करतात आणि वेळ निघून गेली, की पश्चाताप करतात. दिरंगाई ही खूप वेळा इतकी महागात पडते, की आयुष्यभर केलेली मेहनत क्षणात नाहीशी होते. कुठल्याही गोष्टीची दिरंगाई, चालढकल हे रोगट मनोवृत्तीचे लक्षण आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या उमेदवारांनी या सर्व गोष्टी ध्यानात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

logo
Pudhari News
pudhari.news