बसपला तरुण चेहरा तारणार?

बसपला तरुण चेहरा तारणार?
Published on
Updated on

लखनौमध्ये बहुजन समाज पक्षाच्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत बसप प्रमुख मायावती यांनी पुतण्या आकाश आनंद यांच्या खांद्यावर हात ठेवून मोठा राजकीय संदेश दिला आहे. गेल्या काही वर्षांपासून घसरणीच्या प्रवासाला लागलेल्या बसपला जमिनीवर उतरून आपल्या पारंपरिक व्होट बँकेशी पुन्हा जोडला जाऊ शकेल आणि पक्षाच्या समर्थकांमध्ये ऊर्जा आणू शकेल, अशा तरुण चेहर्‍याची गरज होतीच. आकाश यांच्या रूपाने ती पूर्ण झाली आहे.

सध्या आकाश आनंद राजस्थानमधील कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी काम करत आहेत. आकाश यांनी राजस्थानमध्ये 'सर्वजन हिताय, सर्वजन सुखे' संकल्प यात्रा सुरू केली असून ती राजस्थानच्या 150 विधानसभा मतदारसंघांमधून जाणार आहे. याला 'बहुजन अधिकार यात्रा' असेही नाव देण्यात आले आहे. मायावतींनी आनंद यांच्याकडे राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. आकाश या राज्यांमध्ये बसपला काही जागा मिळवून देऊ शकले आणि बसपशी तरुणांना जोडण्यात यशस्वी ठरले, तर संकटातून जात असलेल्या मायावतींच्या पक्षासाठी तो एक नवा आशेचा किरण ठरू शकेल.

चालू वर्षाखेरीस विधानसभा निवडणुका होत असलेल्या चार राज्यांकडे पाहिल्यास 2018 च्या विधानसभा निवडणुकीत बसपने मध्य प्रदेशात 2 जागा, राजस्थानमध्ये 6 जागा, छत्तीसगडमध्ये 2 जागा आणि मिझोराममध्ये एक जागा जिंकली होती. तेलंगणात या पक्षालाही एकही जागा जिंकण्यात यश मिळू शकले नव्हते. 2013 मध्ये बसपने तेलंगणात 2 जागा जिंकल्या होत्या. राजस्थानमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत मायावतींच्या पक्षाला विजय मिळाला असला, तरी या 6 आमदारांनी नंतर काँग्रेसच्या गोटात प्रवेश केला. आकाश आनंद यांनी पक्ष सोडलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार नसल्याचे म्हटले होते.

डिजिटायझेशनच्या प्रदीर्घ काळानंतर बहुजन समाज पक्ष सोशल मीडियावर सक्रिय झाला. कारण, बसपचा पारंपरिक मतदार सोशल मीडियावर कार्यरत नाही, अशी बसपप्रमुखांची धारणा होती; पण काळ बदलला, द़ृष्टिकोन बदलला आणि बहनजींना सोशल मीडियावर यावे लागले. मोबाईल क्रांती आणि स्वस्त इंटरनेटच्या युगात सोशल मीडिया गावागावांत पोहोचला आहे. त्यामुळे बसपचा पारंपरिक मतदारही त्याच्यापासून अस्पर्श राहिला नाही. हा बदल लक्षात घेऊन ऑक्टोबर 2018 मध्ये मायावती ट्विटरवर रुजू झाल्या. यामागचे कारण आकाश आनंद असल्याचे सांगितले जाते. कारण, 2017 मध्ये आकाश यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्याने या विषयांवर बारकाईने लक्ष ठेवले आणि सोशल मीडियाद्वारे बसप आणि पक्षाच्या विचारसरणीशी संबंधित इतर लोकांना जोडण्याचे काम केले. अलीकडील काळात आकाश आनंद सोशल मीडियावर बसपच्या राजकारणाला धार देताना दिसत आहेत.

तरुणांना जोडण्यासाठी सोशल मीडिया हे खूप प्रभावी आणि आवश्यक माध्यम असल्याचे एव्हाना सर्वच राजकीय पक्षांच्या लक्षात आले आहे. आकाश आनंद यांनी सोशल मीडियावर प्लॅनिंग करून पडद्याआडून बहुजन समाज पक्षाची विचारधारा सक्रिय केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या संख्येने तरुण बसपमध्ये सामील होत असल्याचे सांगितले जाते. आझाद समाज पार्टी सोशल मीडियावर सक्रिय असणे हेदेखील बसपच्या सोशल मीडियाकडे वळण्याचे एक प्रमुख कारण आहे. कारण, आझाद समाज पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर रावण हेदेखील दलितांचे राजकारण करतात आणि सोशल मीडियावर त्यांचा प्रभावही मोठा आहे. त्यामुळे त्यांना शह देण्यासाठी सोशल मीडियाची कास धरणे बसपसाठी आवश्यक झाले होते. 2014, 2019 आणि 2022 च्या निवडणुकीत बसप सर्वात वाईट राजकीय टप्प्यातून गेला आहे. साहजिकच यापुढील काळात पक्षाचा टिकाव लागायचा असेल, तर आताच्या स्थितीत मैदानात उतरून पक्षासाठी काम करू शकणार्‍या चेहर्‍याची गरज होती. विशेषतः ज्याप्रकारे आजचे राजकारण तरुणाईच्या हाती गेले आहे, ते पाहता असा चेहरा तरुण असणे गरजेचे होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news