भारतात काम करणार्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना भारतीय कायदे आणि नियमांचे पालन करावेच लागेल आणि भारतीय संस्कृती, सभ्यता आणि परंपरेचा सन्मान करावा लागेल; पण गुगलने यासंदर्भात आश्वासन देऊनही भारत आणि भारतासंदर्भात संभ्रम निर्माण करणारी माहिती पुरविली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.
गुगल, फेसबुक, एक्ससारख्या कंपन्या अमेरिकी कायद्यानुसार काम करतात; पण भारतात काम करायचे असेल तर भारतीय आयटी कायद्यांच्या कक्षेतच काम करावे लागेल, हेदेखील या कंपन्यांनी ध्यानात घेतले पाहिजे. सध्या गुगलचे आर्टिफिशियल इंटिलिजन्स (एआय) 'जेमिनी'ची चर्चा आहे' पण या 'जेमिनी'वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी खोटी आणि चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप आहे. याबाबत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी गुगलला (इंडिया) तंबी दिली आहे. चंद्रशेखर यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांच्याविषयी चुकीची माहिती देत गुगलने आयटी कायद्यातील नियमांचे आणि क्रिमिनल कोडच्या तरतुदींचे उल्लंघन केले आहे.
देशाच्या प्रमुखाबाबत प्रसारित केली जाणारी चुकीची माहिती, ही आयटी नियम मोडणारी आहे, असे मंत्र्यांनी बजावले आहे. मग गुगल अमेरिकेच्या अध्यक्षाबाबत चुकीची माहिती देऊ शकते का? मग याप्रमाणेही गुगलला पंतप्रधान मोदी यांच्याविषयी खोटी माहिती पुरवण्याचा कोणताही अधिकार नाही. देशाच्या प्रमुखांबाबत चुकीची माहिती देत नकारात्मक प्रसिद्धीच्या माध्यमातून 'जेमिनी'चा प्रसार करण्यासाठी घाट घातला जात असेल तर ही बाब अमान्य आहे. जेमिनी एआय हे जगातील काही प्रमुख नेत्यांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना चुकीची माहिती देतो आणि त्यात पंतप्रधान मोदी यांचा समावेश आहे. इतिहासातील काही गोष्टी चुकीच्या पद्धतीने सादर केल्यामुळेही गुगलच्या जेमिनी एआयला टीकेला सामोरे जावे लागत आहे.
जेमिनी एआयने अनेक चुकीचे दाखले देत फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर गुगलने सारवासारव केली आहे; परंतु ती बाब पुरेशी नाही. 'जेमिनी'च्या इमेज जनरेशन फिचरमध्ये निर्माण झालेल्या समस्येवर गुगल तोडगा शोधत आहे. अशावेळी 'जेमिनी'तील फोटो निर्मिती तातडीने थांबवू व लवकरच चांगली आवृत्ती नव्याने जारी करू, असे गुगलने म्हटले आहे. अर्थात, गुगलने चॅटजीपीटीचा मुकाबला करण्यासाठी नवे आर्टिफिशियल इंटिलिजन्स (एआय) मॉडेल-जेमिनीला तीन महिन्यांपूर्वी लाँच केले. एखाद्या मानवाप्रमाणे व्यवहार करण्यासाठी या टूलची निर्मिती करण्यात आली. गुगलच्या मते, जेमिनी टूल ही एखादी गोष्ट समजून घेण्यास, आकलन करण्यास, कोडिंग आणि प्लॅनिंगमध्ये अन्य मॉडेलच्या तुलनेत चांगले काम करते.
कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी जेमिनी लाँच करताना गुगलमध्ये एआयच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली असल्याचे म्हटले होते. जेमिनी हे गुगलचे अलीकडचे 'लार्ज लँग्वेज मॉडेल' (एलएलएम) आहे. ते 'मॅसिव्ह मल्टिटास्क लँग्वेज अंडरस्टॅडिंग मॉडेल'वर (एमएमएलयू) आधारित आहे. 'लार्ज लँग्वेज मॉडेल' हे एक 'डीप लर्निंग अल्गोरिदम' आहे. त्याला व्यापक माहितीच्या आधारे प्रशिक्षित केले आहे. म्हणूनच त्याला लार्ज असे म्हटले जाते. अनुवाद करणे, प्रेडिक्ट करणे, शिवाय टेक्स्ट व अन्य कंटेंटला जनरेट करण्यात सक्षम आहे. 'लार्ज लँग्वेज मॉडेल'ला 'न्युरल नेटवर्क'च्या रूपातूनही ओळखले जाते. ही एक मानवी मेंदूपासून प्रेरणा घेत तयार केलेली कॉम्प्युटिंग सिस्टीम आहे. 'लार्ज लँग्वेज मॉडेल' हे प्रोटिन आराखडा समजून घेणे, सॉफ्टवेअर कोड लिहिणे यांसारख्या अनेक कामासाठी तयार करता येऊ शकते. त्याचवेळी आयटी नियमांचे उल्लंघन होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. नियमांचे उल्लंघन केल्यास त्याबाबत कडक कारवाई करण्याची पावले उचलण्याची गरज आहे.