Pudhari Editorial; मैफल झाली उदास..!

Pudhari Editorial; मैफल झाली उदास..!
Published on
Updated on

चिठ्ठी आयी है, जिए तो जिए कैसे, आदमी खिलोना है, चांदी जैसा रंग है तेरा यांसारख्या एकाहून एक सुपरहिट गाण्यांनी लाखो रसिकांच्या मनावर ठसा उमटवणार्‍या पंकज उधास यांनी आता जगाचा निरोप घेतला आहे. गझलविश्वात आजवर ज्या महान गायकांनी अवीट स्वरसाजाने मैफली गाजवल्या, त्यामध्ये पंकज उधास यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. याखेरीज पार्श्वगायनामध्येही त्यांनी आपल्या स्वतंत्र शैलीने वेगळे स्थान निर्माण केले. (Pudhari Editorial)

गझल हा काव्यप्रकार अलीकडील काळातील फ्युजनमध्ये पूर्वीइतक्या मोठ्या प्रमाणात दिसत नसला तरी याची स्वतःची एक शैली असून, ती अवीट आहे. महाराष्ट्रात सुरेश भट, माधव ज्युलियन, भीमराव पांचाळे, इलाही जमादार यांसारख्या प्रतिभावंतांच्या गझला तुफान गाजल्या. हिंदी साहित्यातही गझलांवर प्रेम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. कविता असो वा गझल, त्यातील गेयता, नादमयता ही गायकाने तितक्याच समर्पकपणाने सादर केल्यानंतर अधिक उंचीवर पोहोचते आणि त्यातून रसिक श्रोते मंत्रमुग्ध होऊन जातात. भारतीय गानसंगीताच्या समृद्ध परंपरेमध्ये अनेक महान गझलकारांनी स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मांदियाळीतील एक असणार्‍या पंकज उधास यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून गायकीमध्ये मुशाफिरी केली. त्यांनी 80-90 च्या दशकात एकाहून एक सरस गीते, गझला, विराण्या सादर करत लाखो रसिक श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला. 1986 मध्ये आलेल्या 'नाम' या चित्रपटामधील गीतकार आनंद बक्षी यांचे चिठ्ठी आयी है हे पंकज यांनी गायिलेले गीत आणि संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे संगीत ऐकताना किती जणांचे डोळे पाणावून गेले असतील, त्याची गणनाच करता येणार नाही. त्याकाळात आजच्या इतकी विदेशामध्ये नोकरी-व्यवसायासाठी जाणार्‍यांची संख्या मोठी नव्हती. गावाकडचा माणूसही आजच्याइतका मोठ्या प्रमाणावर शहरांत आलेला नव्हता; परंतु तरीही घरापासून दूर, सातासमुद्रापार गेलेल्या व्यक्तीच्या भावभावना या गीतातून आनंद बक्षींनी मांडल्या आणि पंकज यांनी त्या गीताला तितकाच दर्दभरा स्वरसाज देऊन हे गीत अजरामर केले. हे गाणे आजही जगभरात स्थायिक झालेले भारतीय असंख्य वेळा ऐकतात आणि पंकजजींच्या आवाजाने त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहतात. (Pudhari Editorial)

उधास यांच्या घरात सुरुवातीपासूनच संगीताचे वातावरण होते. त्यांचे मोठे भाऊ मनोहर उधास हेसुद्धा प्रसिद्ध पार्श्वगायक होते. पंकज हे सुरुवातीला केवळ हौशी म्हणून गायचे; पण मनोहर यांनी त्यांची प्रतिभा ओळखून त्यांना गायनाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा दिली. भारत-चीन युद्धादरम्यान त्यांनी पहिल्यांदा 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणे गायिले, तेव्हा एका प्रेक्षकाने त्यांना 51 रुपयांचे बक्षीस दिले. लोकांना हे गाणे इतके आवडले की, ते अनेकांच्या अश्रूंचे बांध फुटले. यानंतर त्यांनी गझल गायनाच्या दुनियेत प्रवेश केला. 1980 मध्ये त्यांनी 'आहट' नावाचा पहिला अल्बम रीलिज केला. त्यानंतर त्यांना बॉलीवूडमधून गाण्याच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यांनी 1981 मध्ये 'तरन्नूम' आणि 1982 मध्ये 'मेहफिल' हे अल्बम लाँच केले. कारकिर्दीत त्यांनी सुमारे 40 अल्बममध्ये गायिले.

1972 मध्ये रीलिज झालेल्या कामना या चित्रपटातून त्यांची बॉलीवूडमधील पार्श्वगायनाची सुरुवात झाली. त्यानंतर गझल गायक होण्याच्या उद्देशाने त्यांनी उर्दूचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. त्यांनी सुमारे दहा महिने टोरंटो रेडिओ आणि दूरदर्शनमध्ये गायन केले. या दरम्यान, त्यांनी एका कॅसेट कंपनीचे मालक मीरचंदानी यांची भेट घेतली आणि त्यांनी 'आहट'मध्ये पंकज यांना पार्श्वगायनाची संधी दिली. हा अल्बम खूपच लोकप्रिय झाला. नाम या सिनेमानंतर गंगा जमुना सरस्वती, बहार आने तक, ठाणेदार, साजन, दिल आशना है यांसारख्या चित्रपटात त्यांनी गायिलेल्या गीतांना रसिकांनी मनमुराद पसंती दिली. नव्वदीच्या दशकात सुपरहिट ठरलेल्या साजनमधील जिए तो जिए कैसे या गाण्याची तर त्या काळातील नवतरुणांनी पारायणे केली. त्या काळात दूरदर्शनचा प्रचार झालेला नव्हता. रेडिओ हे प्रभावी माध्यम होते. अशा काळात रेडिओवर पंकज यांनी गायिलेले हे गाणे लागले की, श्रोत्यांचे मनोविश्व एका वेगळ्या दुनियेत रमून जायचे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news