Pudhari Editorial | तडका : संपत्तीचे वारस..!

Pudhari Editorial | तडका : संपत्तीचे वारस..!
Published on
Updated on

सर्वसाधारणतः आपल्या पोटी जन्मलेली आपली मुले हीच संपत्तीची वारस असतात. आयुष्यात कितीही पैसे कमावले तरी पैशापेक्षाही जास्त महत्त्व आपल्या आयुष्यातल्या माणसांना असते. सर्वसाधारण आई-वडिलांची इच्छा अशी असते की, वय झाल्यानंतर आपल्या मुलाबाळांनी आपल्याला सांभाळावे, आपल्यावर प्रेम करावे. नातेसंबंधांमध्ये मोठाच दुरावा असण्याच्या आजच्या काळात बर्‍याच आई-वडिलांना मुलाबाळांनी पाठवलेला पैसा हाच आधार मानवा लागतो. मुले आपल्याकडे बघत नाहीत, अशी तक्रार घेऊन बरेच वृद्ध आई-वडील कोर्टातही जातात. आपल्यावर आलेल्या परिस्थितीने अनेक वृद्ध हतबल आणि पराभूत झालेले असतात; पण काही पालक खमके निघतात आणि मुलांना धडा शिकवण्याची भूमिका घेतात. (Pudhari Editorial)

चीनमधील लिऊ या वृद्ध महिलेने अशीच भूमिका घेतली आहे. एकेकाळी त्या आपल्या म्हातारपणाबाबत बिनधास्त होत्या. आपली मुले आपली काळजी घेतील, याचा त्यांना विश्वास होता. या विश्वासाच्या बळावरच त्यांनी आपले मृत्युपत्रही करून ठेवले होते. त्यांनी आपली सगळी संपत्ती मुलांच्या नावावर केली; पण लवकरच त्यांच्यावर आपल्या निर्णयाचा पश्चात्ताप करण्याची वेळ आली. नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणार्‍या मुलांनी आपल्या वृद्ध आईच्या काळजीबाबत चालढकल करायला सुरुवात केली. त्यांना जेव्हा गरज असायची, तेव्हा त्यांची मुले कधीच येत नसत. त्यांना मनात आले तरच ते आपल्या आईला भेटायला येत असत, म्हणून त्यांनी कुत्री आणि मांजरे पाळायला सुरुवात केली. ते मुके प्राणी त्यांचे सखे सोबती झाले आणि त्यांना या प्राण्यांबद्दल प्रेम वाटायला लागले. वय होईल तसे त्यांचे आजारपण वाढले आणि तसतसा त्यांना मुलांचा स्वार्थीपणा लक्षात यायला सुरुवात झाली. मुलांच्या नावाने संपत्ती केल्यानंतरही ती अशी वागतात, त्यापेक्षा आपल्याला जीव लावलेली आणि सावलीसारखी सोबत असणारी कुत्री आणि मांजरे जास्त महत्त्वाची आहेत, असे त्यांना वाटले. कुठल्याही अपेक्षा ठेवण्याचा विचार त्यांनी मनातून काढून टाकला; पण मुलांना मात्र त्यांनी माफ केले नाही. (Pudhari Editorial)

त्यांनी आपले इच्छापत्र बदलून घेतले. नवीन मृत्यपत्रानुसार लिऊ यांनी आपल्या मुलांच्या नावावर केलेली संपत्ती रद्द करून ती आपल्याबरोबर राहणार्‍या लाडक्या कुत्र्या-मांजरांच्या नाव करायचे ठरवले. त्यांची संपत्ती भारतीय चलनात 23 कोटी रुपयांची होती. ही सर्व संपत्ती त्यांनी कुत्र्यांच्या आणि मांजरांच्या नावाने केली. कुत्र्यांची आणि मांजरांची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांनी स्थानिक पशुवैद्यक दवाखान्यावर म्हणजेच पेट क्लिनिकवर सोपवली. भविष्यात ही कुत्री-मांजरी मेल्यानंतर ही संपत्ती त्यांच्या पिलांसाठी वापरावी, असे त्यांनी इच्छापत्रात म्हटले आहे. पुढची गंमत म्हणजे या प्रकाराला कायदेशीर मान्यता नव्हती. त्यामुळे स्थानिक कायदे सल्लागार यांनी त्यांना ही संपत्ती कोणातरी व्यक्तीच्या नावावर करण्याची व त्या व्यक्तीवर ती जबाबदारी सोपवण्याची विनंती केली; लिऊ आता यावरून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. आई-वडिलांना न विचारणार्‍या जगभरातील मुलाबाळांसाठी हे झणझणीत अंजनच आहे.

कलंदर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news