Pudhari Crime Diary : ‘एका स्क्रू’मुळे उलगडली ‘मर्डर मिस्ट्री’! एका अफलातून पोलिस तपासाची अद्भूत कहाणी

Pudhari Crime Diary : ‘एका स्क्रू’मुळे उलगडली ‘मर्डर मिस्ट्री’! एका अफलातून पोलिस तपासाची अद्भूत कहाणी
Published on
Updated on

केरळच्या कोची शहरातील एका तलावात एक अनोळखी मृतदेह सापडला, मृतदेह कसला नुसता सांगाडाच होता. मरणारा पुरूष आहे की महिला आहे, याचाही थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे ओळख पटविणे तर दूरच! पण या प्रकरणाचा तपास करणारा पोलिस अधिकारी निघाला शेरलॉक होम्सच्या जातकुळीतला! कोणताही पुरावा नसताना केवळ एका स्क्रूच्या मागावरून या पोलिस अधिकार्‍याने शेवटी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावलाच! एका अफलातून आणि तितक्याच डोकेबाज पोलिस तपासाची ही अद्भूत कहाणी… (Pudhari Crime Diary)

कोची शहरानजीक एक तलाव आहे. स्थानिक लोक या तलावात मासेमारी करतात. 7 जानेवारी 2018 रोजी मच्छिमारांना तलावात एक प्लास्टिकचा ड्रम दिसला. त्यातून काहीशी दुर्गंधी येत असल्याने त्यांनी लागलीच पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तो ड्रम उघडला, तर त्या ड्रमच्या आत सिमेंट काँक्रिटने पॅक केलेला एक मानवी सांगाडा मिळाला. प्रथमदर्शनी तो सांगाडा पुरुषाचा की महिलेचा हेच ओळखता येत नव्हते. त्यामुळे हे किचकट प्रकरण तपासासाठी पोलिस निरीक्षक सी. बी. टॉम यांच्याकडे सोपविण्यात आले. टॉम यांना केरळ पोलिस दलातील 'शेरलॉक होम्स' म्हणून ओळखले जात होते. कारण, कोणत्याही जटिल प्रकरणाचा तपास करण्यात त्यांचा हातखंडा होता. (Pudhari Crime Diary)

हाडांमध्ये स्क्रू!

टॉम यांनी अत्यंत बारकाईने त्या सांगाड्याचे निरीक्षण केले असता पायाच्या दोन हाडांमध्ये एक स्टीलचा स्क्रू बसविलेला दिसला. तसेच ड्रममधील कपड्यांमध्ये पाचशे रुपयांची एक जुनी नोटही आढळून आली. 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी झाली होती. त्याचा अर्थ किमान दोन वर्षांपूर्वी हा खून झाला असावा, असा कयास टॉम यांनी लावला आणि तपासाला सुरुवात केली. सांगाड्याची दोन हाडे जोडण्यासाठी जो स्क्रू वापरण्यात आला होता, तो स्क्रू हाच एकमेव दुवा होता. त्यामुळे टॉमनी तो स्क्रू देशात आणि देशाबाहेर कुठेकुठे तयार होतो, तिथून तपासाला सुरुवात केली.

सुतावरून स्वर्ग!

अथक प्रयत्नानंतर टॉम यांना माहिती मिळाली की, पुणे येथील एका कंपनीत अशा प्रकारचे स्क्रू बनविले जातात आणि ते अस्थिभंग झालेली हाडे जोडण्यासाठी वापरण्यात येतात. कंपनीकडे अधिक तपास करता समजले की, 2016 मध्ये कंपनीने असे 161 स्क्रू बनविले होते आणि त्यापैकी केवळ 6 स्क्रू केरळमध्ये निर्यात करण्यात आले होते. संपूर्ण केरळमधील अस्थिरोगतज्ज्ञांकडे चौकशी केल्यानंतर 2016 मध्ये अशा पद्धतीचा स्क्रू बसविलेल्या सहा रुग्णांची नावे समजली. या सहापैकी पाचजणांची प्रत्यक्ष भेटही झाली; पण जिची भेट होऊ शकली नव्हती ती व्यक्ती होती शकुंतला…शकुंतला अस्वती! पोलिसांनी सुटकेचा किमान पहिला निःश्वास सोडला; पण अजून बरेच काही बाकी होते.

शकुंतला हिमालयात?

हॉस्पिटलमधील पत्त्यानुसार पोलिस शकुंतलाच्या घरी पोहोचले, तर तिची मुलगी अस्वती दामोदरनची गाठ पडली. तिने सांगितले की, मागील दोन वर्षांपासून तिने आपल्या आईला पाहिलेच नाही. कारण, दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीने सुजितने तिला सांगितले होते की, शकुंतला एका साधूबरोबर हिमालयात गेली असून जाताना तिने आपण कधीच परत येणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे तिने कधी आईचा शोध घेतला नाही. पोलिसांचा लगेच सुजितचा संशय आला आणि त्यांनी सुजित कुठे आहे असे विचारले; पण अस्वतीने जे काही सांगितले ते ऐकून पोलिसांचीही मती गुंग झाली. अस्वतीने सांगितले की, 9 जानेवारी 2018 रोजी सुजितने आत्महत्या केली आहे. म्हणजे शकुंतलाचा मृतदेह सापडल्यानंतर दोनच दिवसांनी सुजितने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला; पण तो तर मृत झाला होता; पण टॉम हार मानणारे नव्हते.

इन्स्पेक्टर टॉम यांनी सुजितची सगळी कुंडली गोळा करायला सुरुवात केली असता सुजितच्या सुरेश नावाच्या एका मित्राची माहिती मिळाली. या सुरेशलाही शकुंतलाच्या शेजापाजार्‍यांनी सुजितसोबत अनेकदा पाहिले होते. पोलिसांनी लागलीच सुरेशला ताब्यात घेतले. बहुतांश गुन्हेगारांप्रमाणे सुरेशही काही थांगपत्ता लागू देत नव्हता; पण इन्स्पेक्टर टॉम यांच्या पोलिसी पक्वान्नांची चव चाखताच सुरेश पोपटासारखा बोलायला लागला आणि या गूढ मर्डर मिस्ट्रीचा एकदाचा उलगडा झाला.

पण, 7 जानेवारीला शकुंतलाचा मृतदेह तलावात सापडल्यावर सुजितला कळून चुकले की, आपण यात अडकणार. त्यामुळे पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली; पण इन्स्पेक्टर टॉम यांनी केवळ एका स्क्रूवरून अख्ख्या मर्डर मिस्ट्रीचा भांडाफोड केला आणि या खून प्रकरणातील एक आरोपी सुरेश याला गजाआड केले. पोलिसांनी आपली शोधक वृत्ती जागरूक ठेवल्यास कोणताही जटिल गुन्हा सोडविणे शक्य असल्याचे यातून सिद्ध होते. इन्स्पेक्टर टॉम यांना घटनास्थळी केवळ एक छोटासा स्क्रू मिळाला होता. या स्क्रूशिवाय अन्य कोणताही सकृतदर्शनी पुरावा तिथे उपलब्ध नव्हता; पण या छोट्याशा स्क्रू वरून टॉम यांनी या मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश केला. आपल्या तपास कौशल्याने टॉम यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले की, ते खरोखरच केरळ पोलिस दलातील 'शेरलॉक होम्स' आहेत.

जावयानेच केला सासूचा घात!

शकुंतलाच्या मुलीने सुजितशी प्रेमविवाह केला होता. या विवाहाला शकुंतलाचा विरोधच होता. विवाहानंतर दोन वर्षांतच सुजित आणि शकुंतलाची मुलगी स्वतंत्र राहू लागले. याच दरम्यान शकुंतलाला समजले की, सुजितचे आधीच एक लग्न झाले असून त्याला दोन मुलेही आहेत. त्यामुळे रागाने बेभान झालेल्या शकुंतलाने सुजितला बोलावून चांगलेच फैलावर घेतले. तसेच ही बाब आपण मुलीलाही सांगणार असल्याचे सांगितले. आपल्या सासूने ही बाब आपल्याप्रेयसीला सांगितली, तर आपले काही खरे नाही हे ओळखून सुजितने शकुंतलाच्याच साडीने गळा आवळून तिचा खून केला. रात्री आपला मित्र सुरेश याच्या मदतीने शकुंतलाचा मृतदेह एका ड्रममध्ये भरून आजूबाजूला सिमेंट-काँक्रिट भरून तो ड्रम सुरेशच्याच रिक्षाने नेऊन त्या तलावात बुडवून टाकला. इकडे त्याने शकुंतलाच्या मुलीला शकुंतला हिमालयात गेल्याचे सांगितले. तिचाही आपल्या नवर्‍याच्या सांगण्यावर विश्वास बसला आणि जवळपास दोन वर्षे या खुनाचा कुठेही बोभाटा झाला नाही.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news