शोध सुखाचा : ग्रीन सिग्नल

शोध सुखाचा : ग्रीन सिग्नल

मागच्या भागात आपण तुमच्याकडे जे जे आहे; त्याबद्दल कृतज्ञ असण्याची सवय कशी लावून घ्यायची हे जाणून घेतले. ही सवय अत्यंत आवश्यक आहे. कारण तुम्ही आहे त्या सगळ्या लहानातल्या लहान गोष्टींबद्दल कृतज्ञ राहू लागतात की, एक महत्त्वाची गोष्ट घडते; ती म्हणजे तुमच्या मनात समाधानाचे काही क्षण निर्माण होऊ लागतात. आत्तापर्यंत जी चिडचिड, वैताग आणणार्‍या सभोवतालात समाधानाची एक शीतल झुळूक येते, आणि काही क्षण खूप प्रसन्न वाटतं.

याची सुरुवात सकाळी उठल्यापासून करायची. उठल्या उठल्या प्रथम हात जोडून मनोमन ईश्वराला किंवा तुम्ही नास्तिक असाल तर निसर्गाच्या शक्तीला प्रणाम करा. तोंडाने म्हणा की 'आज मी जिवंत आहे, ते तुझ्या कृपेने. त्याबद्दल तुझे आभार!' मग तुम्ही झोपलात तो बेड, ती खोली, खोलीला असलेली खिडकी, ज्यातून छान असा उगवलेला सूर्य दिसता आहे, किंवा प्रकाश, वारा येतो, त्या खिडकीचे, प्रकाशाचे, खिडकीतून दिसणार्‍या प्रत्येकाबद्दल दीर्घ श्वास घेऊन कृतज्ञता व्यक्त करा. तुमच्यापैकी कुणीतरी म्हणेल की यात काय आभार मानायचे. जगात कोट्यावधी लोकांना हे सगळंच मिळतंय. मग मीच कशाला आणि का आभार मानायचे? हा प्रश्न पडला की, स्वत:ला तुम्ही आणखी एक प्रश्न करा की, आजचा दिवस उगवलाच नसता तर? कोणत्याही क्षणी माणसाचे आयुष्य संपू शकते किंवा कोणतीही रात्र, कोणत्याही अचानक उद्भवलेल्या कारणाने तुम्हाला झोपेपासून दूर करू शकते. जगात काहीही घडू शकतं. अनेक बातम्या इतक्या भयंकर असतात की त्या ठिकाणी दुसर्‍या व्यक्तींच्या जागी तुम्ही असतात तर? कल्पनाही भयंकर वाटते ना? मग तुम्ही तिथे नसल्याबद्दल कृतज्ञ राहायला हवं की नको? अर्थातच 'हवं'! म्हणूनच प्रत्येक दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. यानंतर दिवसभरात जे जे काही कराल, चांगले अनुभवाल, त्या ठिकाणी मनापासून आभार मानत राहा. यामुळे काय होईल, तर सुखाकडे जाणार्‍या रस्त्यावर तुमचे पहिले पाऊल पडेल. रस्त्यावरच्या 'पुढे जाऊ शकता' असा संदेश देणारा ग्रीन सिग्नलला पाहून जसा आनंद वाटतो, तसेच तुम्हाला कृतज्ञ राहू लागल्याबरोबर आनंद मिळायला सुरुवात होईल. कोणत्याही जमिनीत काही पेरण्यापूर्वी नांगरणी, मशागत वगैरे गोष्टी करून जमीन पेरण्यायोग्य केली जाते, तशीच ही कृती मनाला पुढच्या वाटेसाठी हा ग्रीन सिग्नल घ्यायचा.

आता पुढचा टप्पा आहे तो काय हवे आहे त्याची यादी करायची. त्यात समजा, तुमचा प्राधान्यक्रम चांगली नोकरी हा आहे. तर आधी आता तुम्ही जे काम करत आहात, त्यात तुम्ही खूश नसता, म्हणूनच तुम्हाला वाटते की, मला याहून चांगली नोकरी हवी. हाच तुमचा नं.1 चा प्राधान्यक्रम असेल तर आधी चांगली नोकरीची तुमची व्याख्या काय, ते स्पष्ट करून घ्या. मनासारख्या कंपनीत नोकरी हवी, की मनासारखी पोस्ट हवीय, याबद्दल नेमके ठरवा. या भविष्यात मिळणार्‍या नोकरीबद्दल अगदी स्पष्ट, स्वच्छ विचार करा. अमुक अमुक कंपनीसारख्या कंपनीत, इतक्या पगाराची नोकरी हवीय, असे मुद्दे शॉर्टलिस्ट करा. नंंतर दोन पद्धतीने तुमच्या मनातील गोष्ट पूर्ण होऊ शकते. एक म्हणजे हवी ती गोष्ट कमीत कमी शब्दांत वर्णन करून मनाच्या शांत, स्थिर स्थितीत सतत मनाला सांगणे. एक उदाहरण घेऊया. एक विशीतली मुलगी, जिचा लायब्ररीयनचा शॉर्ट कोर्स झाला होता. तिला एक छोट्या लायब्ररीत 'असिस्टंट' म्हणून नोकरी होती. पण तिला मनोमन वाटायचे, त्या शहरात एक प्रशस्त आणि नावलौकिक असलेली लायब्ररी होती. तिथे आपल्याला काम मिळावे. प्रत्यक्षात ते शक्य नाही, असे वाटून ती हिरमुसून जायची. ती ज्या लायब्ररीत काम करे, त्या वाटेवरच ही मोठी लायब्ररी होती. तिथे आत जाऊन बघण्याची संधी मिळाल्यापासून तिला वाटू लागले होते की, इथे काम करायला किती मजा येईल? पण ते शक्य नाही, असे वाटून ती दरवेळी दु:खी व्हायची.

एकदा तिच्या वाचनात लॉ ऑफ अ‍ॅट्रॅक्शन या आकर्षणाच्या नियमाची गोष्ट आली आणि तिला आपली इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग सापडला. ती रोज रात्री झोपताना शांत मनाला सूचना देई. त्या लायब्ररीचे नाव घेऊन म्हणे 'एशियन लायब्ररीत काम करणे मला खूप आवडते आहे!' हेच वाक्य ती रोज जेव्हा जेव्हा स्वस्थ, शांत बसायची, तेव्हा मनापासून म्हणायची आणि त्या सोबत एक कल्पनाचित्र तिने मनोमन रेखाटले होते. एशियन लायब्ररीतील मुख्य लायब्ररीयन तिचे स्वागत करताना म्हणत आहेत. 'वेलकम! तू इथे जॉईन झालीस, याचा मला आनंद वाटतो!' हे चित्र आणि ती वाक्ये सतत आणि प्रेमाने, कृतज्ञतेने ती म्हणत राहायची. काही दिवसांनी तिला समजले की, एशियन लायब्ररीत फक्त आठ दिवसांकरिता एक असिस्टंट हवी आहे. ती ताबडतोब तिथे गेली. 'आठ दिवस तर आठ दिवस' म्हणत तिथे काम करू लागली. त्या लायब्ररीचा आपण एक हिस्सा आहोत, याबद्दल ती रोज कृतज्ञ राहू लागली. याबरोबरच तिने मनात कल्पनाचित्र पाहणे सुरूच ठेवले होते आणि मग एक आश्चर्य घडले. त्या तरुणीने अत्यंत मनापासून, नीटनेटके केलेले काम पाहून मुख्य लायब्ररीयन खूश झाले आणि त्यांनी तिला कायमस्वरूपी कामाची ऑफर दिली. ते ऐकताच त्या तरुणीने अत्यानंदाने होकार दिला. त्या दिवशी तिला ऑफर लेटर मिळून ती मुख्य लायब्ररीयनना भेटायला गेली तेव्हा त्यांनी 'वेलकम! तू इथे जॉईन झालीस, याचा मला आनंद वाटतो!' हे वाक्य म्हटले, जे ती तरुणी मनोमन रोज पाहात होती. ते कल्पनाचित्र वास्तवात जसेच्या तसे आले. त्या तरुणीने काय काय केले, हे तुम्ही वाचले आहेच. तिने आधी मनातल्या नकारात्मक गोष्टी बाजूला केल्या. मग जे हवे ते कमीत कमी, नेमक्या शब्दांत मनाला सतत ऐकवले. सोबत एक डिटेलिंग असलेले कल्पनाचित्र पाहिले, पूर्ण विश्वासाने, श्रद्धेने हे सगळे केले आणि म्हणूनच हे सगळे जसेच्या तसे घडले.

ही गोष्ट आकर्षणाच्या नियमानुसार घडली हे खरेच. पण बर्‍याच माणसांचे असे म्हणणे असते की, आम्हालाही हे समजलंय. पण कितीही वेळा प्रार्थना केली, वरील सगळ्या कृती केल्या, पण वास्तवात काही घडले नाही. असे का? आमची इच्छाशक्ती कमी पडते का? नेमके काय चुकते म्हणून आमच्या इच्छा फलद्रूप होत नाहीत. असे घडण्यात कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात, याबद्दल जाणून घेऊया पुढील भागात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news