शोध सुखाचा : हवे तेच पेरा!

शोध सुखाचा : हवे तेच पेरा!

'सुख म्हणजे नक्की काय असते? काय पुण्य असते की जे घरबसल्या मिळते' असं एक नाटकातलं सुप्रसिद्ध गाणं आहे. प्रशांत दामले यांच्या आवाजातलं हे सरळ सोपं गाणं अनेकांनी ऐकलेलं असेलच; पण जितकं हे सरळ साधं वाटतं. तितकीच सुख ही संकल्पना सोपी नाही. सुखाची व्याख्या करायची, तर नेमकं सुख कशाला म्हणतात? हा प्रश्न बराच गहन आहे. कारण, त्याला अनेक कंगोरे आहेत. असंख्य माणसांच्या अगणित अपेक्षा आहेत. विविधांगी द़ृष्टिकोन आहेत. या जगातल्या प्रत्येक माणसाची सुखाची व्याख्या वेगवेगळी असेल, यात शंका नाही.

खरं तर सगळं जगच सुखाच्याच मागे धावतंय; पण सुख आपलं मृगजळासारखं दिसत राहतं. जिथं पोहोचायचंय असं वाटून धावून धावून पोहोचतो, तिथे ते नसतंच; मग पुन्हा सुखाच्या शोधात माणूस निघतो आणि हे चक्र चालतच राहतं. हे वारंवार घडत राहिलं, तर माणूस दुःखी होऊ लागतो आणि सुख ही आपल्याला अशक्य अशी दुष्प्राय गोष्ट वाटू लागते. हे सगळं प्रत्येकालाच कमी-अधिक प्रमाणात अनुभवायला मिळतं. यावर उपाय काय? हा खरा कळीचा मुद्दा आहे. सुख मिळवण्याचे काही मार्ग आहेत का, याचा खरोखरच शोध घेतला, तर तर खूप आश्चर्याचीच गोष्ट समोर येईल. ती म्हणजे, सुख मिळवण्याचा मार्ग आपल्याकडेच आहे. फक्त त्याची योग्य ती पद्धत आपल्याला माहीत नाही. हे विधान काहींना अगदी धाडसी वाटू शकेल, काहींना हे आता काय वेगळं, असं वाटेल; तर काहींना हे ऐकलेलं… वाचलेलंही वाटू कशेल. कुणाला काहीही वाटू दे; पण ज्यांना खरंच सुखाचा शोध घेऊन, स्वतःचं आयुष्य सुखी करायचंय. त्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवं. शेवटी आपलं आयुष्य सुंदर असावं, हीच प्रत्येकाची इच्छा असते आणि याच्यापुढे जाऊन सर्वांचंच आयुष्य आपल्यासारखं सुंदर असावं, अशी इच्छाही आपण बाळगू लागतो.

खरं तर आपल्या बालपणापासून जर सुखाचे मार्ग कसे शोधायचे हे समजलं असतं, तर आपण दुःखी झालोच नसतो; पण तसं होत नाही. उलट बालपणात आलेले बरे-वाईट अनुभव, शिक्षण, संस्कार याच्या परिणामातून आपण आज एका विशिष्ट स्वभावाची, बर्‍या-वाईट गुणांनीयुक्त अशी व्यक्ती बनलेली असतो. प्रत्येकालाच आपल्या गुण-दोषांची जाणीव असत नाही; पण जर सुखी व्हायचं असेल, तर आधी याची जाणीव करून घ्यायला हवी. मी कसा/कशी आहे, या महत्त्वाच्या प्रश्नाचं खरं तर उत्तर स्वतःला द्यायचं. दोषांची बाजू जाणून घ्यायची; पण चुकूनही त्याचं समर्थन करायचं नाही. जे दोष आहेत, त्यावर योग्य पद्धतीने काम करायचं. गुणांच्या बाबतीत विशेष काम करावं लागत नाही. फक्त अतिरेक असणारे गुण नकोत. उदा., परोपकार हा उत्तम गुण आहे; पण दुसर्‍यांना मदत करायला जाताना स्वतःचे घर, माणसं उघड्यावर पडू नयेत. इतके शहाणपण हवेच.

आपल्यातल्या दोषांची जाणीव झाली की, ते दुरुस्त कसे करायचे, हा यक्षप्रश्न उभा राहतो. दोष निर्माण का होतात, या प्रश्नाचे उत्तर आहे ते म्हणजे स्वतःबद्दलच्या आपल्या धारणा किंवा समजुती. उदा., एखाद्याला वाटतं की, आपल्याला सर्व बाबतीतलं कळतं. आपलं आकलन उत्तम आहे. त्यामुळं ती व्यक्ती दुसर्‍या कुणाचं म्हणणं बरोबर असलं तरी सहसा मान्य करत नाही. कारण, आपलं नेहमी बरोबर असतं ही चुकीची धारणा. असा स्वभाव असणार्‍या माणसाला भले समोर कुणी बोलत असेल किंवा नाही; पण पाठीमागे सगळे नावे ठेवतात. जर हा दोष आपल्यात आहे, असं समजलं तर काय करायचं. जगात आपल्याहून ज्ञानी, अनुभवी माणसं समाजात आहेत. त्यांना निश्चितच जास्त कळतं. हे पक्कं लक्षात ठेवून, दुसर्‍याचं म्हणणं ऐकून घ्यायला शिकायचं. त्यावर विचार करायला शिकायचं.

हे झालं, दुसर्‍यांवर अवलंबून असणार्‍या दोषांच्या बाबतीत; पण माणसाचा सर्वात मोठा शत्रू आणि मित्रदेखील तो स्वतःच असतो. या शत्रुत्वाचा आणि मित्रत्वाचा माणसाच्या आयुष्यात प्रचंड फरक पडतो. जगात असंख्य माणसे याच नात्यांच्या गुंत्यात गुंतून गेल्यामुळे त्यांचं आयुष्य असह्य, दुःखी, निराश झालेलं आहे. मघाशी म्हटल्याप्रमाणं माणसाच्या मनात त्याने केलेली स्वतःची इमेज असते. ही इमेज त्याला आलेले अनुभव इतरांनी त्याच्याबद्दल तयार केलेली मतं आणि पूर्वसंस्कार यावर अवलंबून असते.

उदा., एखाद्या मुलीला तू सुंदर आहेस, असं वारंवार सांगितलं गेलेलं असेल आणि आरशात पाहून विचार करताना तिच्याही ते लक्षात आलेलं असेल, तर आपण सुंदर आहोत ही तिची स्वतःबद्दलची धारणा बलवान असते. याउलट एखादी मुलगी बुटकी, सावळी असेल तर इतरांची मतं पाहून ती स्वतःबद्दलची धारणा बनवते आणि सोबत न्यूनगंड घेऊन जगते. हे एक खूप छोटं उदाहरण आहे; पण माणसाचं रूप, शिक्षण, गुणवत्ता यासह असंख्य प्रकारातून याच पद्धतीच्या धारणा बनत असतात. एखादी रेघ वारंवार एकावर एक गिरवली तर ठळक होते. तशा या धारणा किंवा समजुती अतिशय घट्ट होतात. अशा सगळ्या बर्‍या-वाईट समजुतीचं गाठोडं प्रत्येक माणसाच्या मनाशी साठवून ठेवलेलं असतं. हे सगळं असतं सुप्त मनाच्या तळाशी.

मन ही गोष्ट शास्त्रीयद़ृष्ट्या दाखवता येत नसली, तरी ती शंभर टक्के अस्तित्वात आहे. याचबरोबर जागरूक मन आणि सुप्त मन असे दोन मनाचे भाग आहेत. जिथे घडणार्‍या घडामोडी नकळतपणे माणसाला प्रगतीकडे किंवा अधोगतीकडे नेतात, याचा शास्त्रशुद्ध अभ्यासही झालेला आहे. आपण आपली प्रगती करून दुःखापासून स्वतःला दूर ठेवायचं असेल, तर दोन्ही मनांचं काम कसं चालतं, हे जाणून घ्यायला हवं. त्यांची ओळख करून घ्यायला हवी.

जागरूक मन म्हणजे बाहेरच्या जगात तुमच्याबरोबर वावरतं ते मन. जे प्रत्येक घटनेचा. परिस्थितीचा स्वतःवर परिणाम करून घेते. आयुष्यात संकटे, अवघड परिस्थिती, अनाकलनीय समस्या येतातच. तेव्हा हे मन त्याच्या अनुभवाच्या, बुद्धीच्या जोरावर निर्णय घेते. काहीवेळा ते चुकतात किंवा बरेबर येतात.

सुप्त मन म्हणजे निद्रिस्त किंवा अबोध मन. त्याला फक्त तुम्ही काय सांगता, ऐकवता, तेवढंच ते ऐकतं. तुम्ही सांगाल ते आणि तितकंच करतं. त्याला बरं-वाईट अशी विभागणी करता येत नाही.

उदा., जेव्हा तुम्ही म्हणता बाहेरचं जेवण जेवलं की, माझी प्रकृती बिघडते किंवा सकाळी 5 वाजता मला जाग आली की, झोपच लागत नाही. यासारख्या असंख्य विचारांच्या फैरी मनात सुरू असतात. सुप्त मन त्यानुसार वागते. म्हणजे बाहेर जेवलं की त्रास होतो हे तुम्ही ठामपणे, पूर्ण खात्रीने म्हटलं असेल, तर बाहेर खाल्लं की तुमच्या सुप्त मनातून ते घडवून आणलं जातं आणि शरीरातल्या नकारात्मक लहरींचा परिणाम म्हणून प्रकृती बिघडते किंवा तुम्हाला पाचनंतर झोप येत नाही, हा विचार सुप्त मनाने स्वीकारला की तुम्ही जागे होताच.
हा विषय म्हटलं तर गहन आहे; पण नीट विचार करून कृतीत आणला, तर अतिशय सोपा आहे. जे पेरतो तेच उगवते. हे त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणून तुम्हाला जे हवे आहे तेच पेरा हे कसं करायचं. याबद्दल जाणून घेऊया पुढच्या भागात.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news