हॅलो, राम राम भाऊ, उमेश बोलतोय. आपला घड्याळवाला कार्यकर्ता.
हा बोला, बोला उमेशराव, काय म्हणताय? कसं काय, गावाकडे पीकपाणी चांगला आहे ना?
पीकपाणी बरं आहे भाऊ. पण राजकारणाचं काय चाललंय ते काय कळत नाही. सकाळी सहा वाजता उठल्यापासून रात्री बारा वाजता झोपेपर्यंत चॅनेल बदलू बदलून सगळे पाहात राहतो. पण मला काही राजकारणाचा अंदाज येईना झालाय. म्हणजे काय झालं भाऊ, थोडे ढग दाटून येतात गावावर. पाऊस काय पडत नाही. पण बाजूच्या तालुक्यात पाऊस पडल्याच्या बातम्या येतात. ढग कुठे येतात आणि पाऊस कुठे पडतो याचा जसा काही नेम नाही, तसंच राजकारणाचं झालं आहे. आता तुम्हाला ठाव आहे की, आमच्या गावात घड्याळाचा मेन माणूस मी आहे. आता जिल्हा पातळीवर आमचे नेते तुम्ही आहेत. पंचाईत अशी झाली आहे की, गावात घराबाहेर पडलं, राम राम, शाम शाम झालं की लोक विचारतात, तुमच्या घड्याळाचे तोंड कुणीकडे आहे? म्हणजे ताईकडे आहे का दादाकडे? काय उत्तर द्यावं काय कळत नाही. भाऊ, काहीतरी मार्गदर्शन करा.
अरे उमेश, इथे जिल्हा पातळीवर आम्हालाच कळंना कुणीकडे जावं ते. राज्याच्या नेत्यांमध्ये फाटाफूट झाली तेव्हापासून आम्ही पण गोंधळात पडलेलो आहोत. म्हणजे काय झालं की, आपल्या जिल्ह्यातले काही नेते म्हणू लागले की, मोठ्या साहेबांबरोबर आपण राहिलं पाहिजे. सकाळी असं म्हणालेले अर्ध्यावर नेते संध्याकाळी धाकट्या साहेबाकडे गेले. म्हणजे सकाळी थोरल्या साहेबाकडे, संध्याकाळी दादाकडे आणि रातच्याला आपल्या आपल्या घरी. त्याच्यामुळे कोण कोणाकडे आहे तेच कळंना झालेआहे.
तसं नाही भाऊ, एकदाच काय तो सोक्षमोक्ष लागायला पाहिजे, म्हणजे आम्ही निर्णय घेऊ शकतो. आपला गट फुटून दादांकडे गेला. दादा सगळ्यांना बरोबर घेऊन थोरल्या साहेबाकडे आशीर्वाद घ्यायला गेले. याचा काय अर्थ लागत नाही आम्हाला. संबंध कटऑफ झाले, एकमेकांना पक्षातून काढून झाले, आता पुन्हा आशीर्वाद घ्यायची काय गरज आहे म्हंतो मी?
हे बघ उमेश, तूर्त आपण दोन्हीकडे पण आहेत. जसजसं विधानसभा निवडणुका जवळ येतील, तसतसं चित्र स्पष्ट होत जाईल. बाकी आजघडीला म्हणशील तर मी दादांबरोबर आहे. दादा जर थोरल्या साहेबांचा आशीर्वाद घ्यायला जात असतील तरी पण मी दादांबरोबर आहे. अरे थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. म्हणजे मतदान करणारी आपली जनता, मतदार, आपलं काम आणि वरून थोर लोकांचे आशीर्वाद असले की इलेक्शन जिंकायला सोपे जाते. त्यामुळे तुम्ही गाव पातळीवर आहे तशी परिस्थिती असू द्या.
तुमचं बरोबर आहे भाऊ. पण, आता गावामध्ये एखादे बॅनर लावायचे म्हटले तर त्याच्यावर कोणते फोटो टाकावेत हा प्रश्न उभा राहतो. म्हणजे तसा तुमचा फोटो कायम असतो आमच्या बॅनरवर. पण आपल्या स्टेट लेव्हलच्या नेत्यांचे कुणाकुणाचे टाकायला पाहिजेत?
हे बघ, पक्ष फुटला असला तरी प्रत्येक ठिकाणी आपल्या मोठ्या साहेबांचा फोटो पाहिजे. त्यांच्या बाजूला दादा, त्यांच्या बाजूला ताई,
त्यांच्या बाजूला प्रफुल्लभाई, त्यांच्या बाजूला जयंतराव, त्यांच्या बाजूला माझा फोटो टाकायचा. माझ्या फोटोच्या खाली तुझा फोटो टाकायचा. तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले ना आता? चल ठेव फोन, आन लाग कामाला…
– झटका