कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै. 'पुढारी' कस्तुरी क्लब वर्धापन दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाकरिता आषाढी दिंडीची संकल्पना राबवली जाणार आहे. त्याचबरोबर स्टार प्रवाह कलाकारांची मांदियाळीही असेल. बुधवार, दि. 5 रोजी दुपारी 2 वाजता राजर्षी शाहू स्मारक भवन, दसरा चौक येथे हा कार्यक्रम होणार आहे.
भक्ती आणि आध्यात्मिक उत्साहाचे रंगीबेरंगी आणि दोलायमान प्रदर्शन कस्तुरी क्लब आयोजित दिंडीमध्येही घडणार आहे. कार्यक्रम स्थळापासून निघणारी ही दिंडी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुन्हा त्याच ठिकाणी विसर्जित होणार आहे. कार्यक्रमात दुपारी 3 वाजता सुशीला सांस्कृतिक मंडळाचे सोंगी भजन, वाघ्या मुरळी, वासुदेव, अष्टभूजा देवीचे युद्ध याचे सादरीकरण होणार आहे.
स्टार प्रवाह सीरियलमधील 'आई कुठे काय करते' मधील अनिरद्ध (मिलिंद गवळी) आणि संजना (रूपाली भोसले) हे कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. हे दोघेही कार्यक्रमाला उपस्थित महिलांशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. आई कुठे काय करते ही एक मराठी मालिका आहे, जी सध्या अतिशय लोकप्रिय झाली आहे. स्टार प्रवाहवरील या मालिकेत मधुराणी गोखले-प्रभुळकर, मिलिंद गवळी आणि रुपाली भोसले हे लीड रोलमध्ये दिसत आहेत. या मालिकेने मराठी मनोरंजन क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतून त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल आणि एका आईच्या संघर्षाबद्दल कथा दाखवली आहे.
लकी ड्रॉ विजेतीला आकर्षक भेटवस्तू
कार्यक्रमा दरम्यान मराळमोळ्या पारंपरिक वेशभूषा साकारलेल्या लकी ड्रॉमधील विजेत्या महिलेला आकर्षक ज्वेलरी भेटवस्तू म्हणून दिली जाणार आहे. तसेच नाशिक ढोलांच्या तालावर कस्तुरी क्लबच्या बर्थ डे टायटल साँगवर सेलिब्रिटींसोबत आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे.
या कार्यक्रमाला गिफ्ट प्रायोजक स्वर्ग ज्वेलर्स, बिनखांबी मंदिर आणि विशेष सहकार्य हॉटेल गोविंदपुरम, न्यू महाव्दार रोड यांचे सहकार्य लाभले.
स्टार प्रवाहाच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात 'कोण बनणार महाराणी'
या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात एक मिनिट गेम शो आयोजित केला आहे. त्याद्वारे भरपूर बक्षिसे कार्यक्रमाद्वारे देण्यात येणार आहे. यावेळी स्टार प्रवाह 'कोण बनणार महाराणी' हा अॅवॉर्ड दिला जाणार आहे. सेलिब्रिटींच्या हस्ते विजेतीला महाराणी क्राऊन परिधान केला जाणार आहे.
धार्मिक आणि सांस्कृतिक दिंडी
कार्यक्रमात महिलांनी नऊवारी साडी, अंबाडा, गजरा असा मराठमोळा पोशाख करायचा आहे. तुळशी वृंदावन, टाळ आणि भगवा झेंडा सोबत घेऊन सेल्फी काढणार्या पहिल्या 200 महिलांना स्वर्ग ज्वेलर्स यांच्याकडून खास मोत्याची माळ दिली जाणार आहे.