‘त्याचे शीर धडापासून वेगळे करा’; टी राजा सिंह यांना जामीन मिळताच हैदराबादमध्ये हिंसाचार, ४ पोलिस जखमी

‘त्याचे शीर धडापासून वेगळे करा’; टी राजा सिंह यांना जामीन मिळताच हैदराबादमध्ये हिंसाचार, ४ पोलिस जखमी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या तेलंगणाचे भाजपचे आमदार टी राजा सिंह यांना कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. यानंतर त्यांची पोलिस कोठडीतून सुटका करण्यात आली आहे. मात्र, या घटनेनंतर टी राजा सिंह यांच्या विरोधात पुन्हा एकदा वातावरण तापले असून त्यांच्याविरोधात निदर्शने होत आहेत. दरम्यान, हैदराबादच्या विविध भागात काल (दि. 23) रात्री उशिरापासून निदर्शने सुरू असून रात्री हजारोंचा जमाव रस्त्यावर उतरला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, परंतु काही ठिकाणी जमावाने हिंसक निदर्शने करत गाड्यांची तोडफोड केल्याचे समजते आहे. टी. राजा सिंह यांची पोलिस कोठडीतून झालेली सुटका चुकीची असल्याचे त्यांच्या निदर्शनकर्त्यांचे म्हणणे आहे. याआधी मंगळवारी हैदराबादमध्ये भीषण निदर्शने करण्यात आली आणि टी. राजा सिंह यांच्या विरोधात 'शीर धडापासून वेगळे करा' (सर तन से जुदा) अशा हिंसक घोषणाही देण्यात आल्या.

तेलंगणाचे भाजपचे आमदार टी राजा सिंह यांना कोर्टाकडून जामीन मिळाल्याचे समजताच मंगळवारी रात्री उशिरा चारमिनार येथे मोठ्या संख्येने लोक जमले आणि त्यांनी टी. राजा सिंह यांना फाशी देण्याची मागणी केली. अनेक ठिकाणी टी. राजा सिंह यांचे पुतळे जाळण्यात आले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला, मात्र लोक हटण्याचे नाव घेत नव्हते. लोकांच्या हातात तिरंगा तर काही निदर्शकांच्या हातात काळे झेंडे होते. चारमिनार, गुलजार हौज आणि वट्टापल्ली भागात हिंसक निदर्शने झाली. यावेळी जमावाने हिंसक होत दोन पोलिसांच्या गाड्या फोडल्या. तर एका टॅक्सीचीही तोडफोड करण्यात आली. या सगळ्यात उपनिरीक्षकासह चार पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे.

टी राजा सिंह यांच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात म्हटले की, 'आमदार टी राजा सिंह यांना सीआरपीसीच्या कलम 41 (ए) अंतर्गत कोणतीही नोटीस बजावली नाही'. न्यायालयाने वकिलांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरून टी राजा सिंह यांना जामीन मंजूर केल्याचे समजते. यानंतर राज्यभरात निदर्शने सुरू झाली. जमाव आणि घोषणाबाजी एवढी वाढली की, पोलिसांना लाठीचार्ज करून जमावाला पांगवावे लागले. अंबरपेट, तल्लाबकट्टा, मोगलपुरा, खिलवत, बहादूरपुरा आणि चंचलगुडा येथे टी राजा सिंह यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्याचवेळी शेकडो आंदोलकांनी बरकस ते चंद्रयांगुट्टा असा मोर्चा काढला.

हैदराबादच्या शालीबांदामध्ये पोलिसांसोबत आंदोलकांची हिंसक चकमक झाल्याचे वृत्त आहे. आंदोलकांनी पोलिस व्हॅनचीही तोडफोड केल्याचे समजते आहे. याशिवाय बाजारपेठेतील दुकाने जबरदस्तीने बंद करणे, टी राजा सिंह यांच्या पोस्टरवर चप्पल मारणे, त्यांचा पुतळा जाळणे अशा घटनाही घडल्याची माहिती मिळते आहे.

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी तेलंगणाचे भाजपचे आमदार टी राजा सिंह यांना सोमवारी रात्री हैदराबादमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी दक्षिण झोन डीसीपी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

याबाबत डीसीपी साई चैतन्य यांनी सांगितले की, मोठ्या संख्येने एकत्र येत नागरिकांनी दक्षिण झोन डीसीपी कार्यालयासमोर टी राजा यांच्याविरोधात निदर्शने केली होती. टी राजा यांनी एका समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यानंतर विविध कलमांखाली त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप आमदार टी राजा सिंह यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ अपलोड केला. यामध्ये त्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा डबीरपुरा, भवानीनगर, मिचोक, रेनबाजार येथील पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी आंदोलन सुरू केले. दरम्यान, भाजप आमदार टी राजा यांनी स्वतः शूट केलेल्या सहा मिनिटांच्या व्हिडिओमध्ये त्यांनी वादग्रस्त कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांच्यावर निशाणा साधत टिप्पणी केली. ते म्हणाले, एक विनोदी अभिनेता आहे, जो थर्ड क्लास कॉमेडी करतो आणि हिंदूंना, भाजपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष्य करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news