कोल्हापूर, प्रवीण मस्के : राज्य सरकारने प्राध्यापक भरतीस मान्यता दिल्यानंतर शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापक भरती सुरू आहे. निवड समितीच्या संगनमताने लाखोंची उड्डाणे सुरू आहेत. 'तेरी भी चूप- मेरी भी चूप' या अलिखित नियमामुळे सर्व काही आलबेल सुरू असल्याचा आरोप पात्र उमेदवार करीत आहेत.
राज्य सरकारने 2017 मध्ये रिक्त पदांच्या प्रमाणात 40 टक्के प्राध्यापक भरतीस अनेक वर्षांनंतरच्या विलंबाने मान्यता दिली. यासाठी नेट-सेट, पीएच.डी. पात्रताधारक संघटना, प्राध्यापक संघटनांनी यासाठी आंदोलने केली. मात्र, याचा खरा फायदा विशिष्ट घटकांना झाला.
राज्यातील 2088 प्राध्यापकांच्या जागा भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील 463 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामधील सुमारे 200 जागा भरल्याचे समजते.
रोस्टर तपासणी, सहसंचालक कार्यालय पदमान्यतेचा प्रस्ताव संचालकांना पाठवणे, संचालक कार्यालयाकडून हा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर पाठविण्याची मोठी प्रक्रिया आहे.
या प्रत्येक टप्प्यावर दर ठरलेले असल्याचा आरोप पात्रताधारकांकडून केला जात आहे. मंत्रालयातून मान्यता मिळाल्यानंतर संबंधित पदाची जाहिरात देऊन मुलाखती घेतल्या जातात, त्याही केवळ नावालाच. निवड समितीच्या संगनमताने लाखो रुपयांचे 'अर्थपूर्ण' व्यवहार घडवून आणले जातात. प्रत्येक विषयानुसार 25 ते 60 लाख रुपयांपर्यंतचे दर ठरतात, असा आरोप पात्र उमेदवारांकडून केला जात आहे.
निवड समितीमधील विषय तज्ज्ञ, कुलगुरू प्रतिनिधी, महिला, मागासवर्ग प्रतिनिधी हे संस्थाचालक व महाविद्यालयाच्या सोयीप्रमाणे दिले जातात. अनेक ठिकाणी तर तेच-तेच प्रतिनिधी निवड समितीत पाठवले जातात. एवढे दिव्य पार केल्यानंतरही प्राध्यापक भरती झालेल्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणे, पगार पत्रकात नाव घालण्यासाठी सहसंचालक कार्यालयात लाखो रुपये मोजावे लागतात, असे बोलले जाते. सामान्य, गोरगरीब पात्र उमेदवारांना कर्ज काढून प्रसंगी जमिनी विकून प्राध्यापक पद मिळवावे लागत असल्याने त्यांची मोठी फरपट होत असल्याची चर्चा शिक्षण क्षेत्रात आहे.
(क्रमश:)
पंचतारांकित हॉटेलातील भरती गुलदस्त्यात
यापूर्वीच्या तत्कालीन सहसंचालक व कर्मचारी यांच्यातील बाचाबाचीचे किस्से सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विद्यापीठात जबाबदारीचे पद सांभाळलेल्या एका उच्च पदस्थाच्या नातेवाईकाची निवड केली नाही म्हणून त्याने संस्था आणि विद्यापीठास वेठीस धरल्याचे किस्से ऐकायला मिळतात. गगनबावड्यातील नामांकित शिक्षण संस्थेतील प्राध्यापक भरती चक्क पंचतारांकित हॉटेलात झाली. याचा दणका संबंधित सहसंचालकांना बसला.
'सीएचबी'धारकांची अन्याय होत असल्याची भावना
प्राध्यापक भरती निवड प्रक्रियेत गुणवत्ता व अगोदर सीएचबी प्राध्यापक म्हणून अनेक वर्षे केलेल्या सेवेचा काहीच उपयोग होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. यातून नेट-सेट, पीएच.डी. पात्रताधारक व 'सीएचबी'च्या तरुण प्राध्यापकांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. आज ना उद्या प्राध्यापक होऊ, या आशेवर पडेल ते काम करीत आहेत.