छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था तर…, अक्षय वाघमारेची पोस्ट चर्चेत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था तर…, अक्षय वाघमारेची पोस्ट चर्चेत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित, अभिनेता चिन्मय मांडलेकरचा प्रमुख भूमिका असलेला,  छत्रपती शिवाजी महाराजांवरील चित्रपट शेर शिवराज हा नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरभरुन प्रतिसाद मिळत आहेत. पण या चित्रपटाला प्राइम टाइम (Prime time) मिळत नसल्याने  मराठी अभिनेता अक्षय वाघमारेने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत टीका केली आहे. या चित्रपटात त्याने  प्रमुख नरवीर पिलाजीराव गोळे यांची भूमिका साकारली आहे.

Prime time मराठी जनतेने प्रतिसाद दिला, पण…

अक्षयने आपल्या पोस्टमध्ये लिहले आहे की, "नमस्कार पोस्ट मोठी आहे पण, अत्यंत महत्वाची आहे. मराठी चित्रपट आणि प्राइम टाइम असं टायटल दिलं आहे. पुढे लिहलं आहे की, मुळात महाराष्ट्रात राहून आपल्या मातृभाषेच्या चित्रपटासाठी झगडावे लागत आहे. यासारखे दुसरे दुर्दैव नाही. याविषयी यापूर्वी देखील अनेकदा या विषयी बोलले गेले आहे. पण पुढे काहीच साध्य झाले नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची महती सांगणारा ऐतिहासिक चित्रपट शेर शिवराज हा गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झाला. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड आणि आता शेर शिवराज असे ऐतिहासिक चित्रपट बनवण्यामागे दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांचा एकच उद्देश होता की, महाराजांचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहचायला हवा. नवीन पिढीला स्वराज्य घडवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा, स्वराज्याची स्थापना ते परकीयांचे आक्रमण आणि अनेक बाबी या चित्रपटांद्वारे मांडल्या गेल्या आहेत आणि मराठी जनतेने उत्स्फुर्तपणे या सर्व चित्रपटांना प्रतिसाद दिला.

Prime time हिंदी चित्रपटांना प्राधान्य

आता सुद्धा महाराष्ट्रातील जनता शेर शिवराज हा चित्रपट पाहू इच्छिते पण, तरी बघू शकत नाही किंवा त्यांना बघू दिला जात नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शो चे वेळापत्रक अर्थात शो टाइम्स. सगळे प्राइम टाइम्स हे हिंदी चित्रपटांना प्राधान्याने दिले जातात आणि त्या वेळेला तिथे मराठी चित्रपट नसतो. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात धोक्यात आलेली आहे. चित्रपटाच्या निर्मितीमागे असंख्य हात लागलेले असतात या चित्रपटसृष्टीत अनेक लोकांचे उत्पन्न अवलंबून आहेत या सगळ्याचा विचार कोण करणार?? आपल्याच राज्यात राहून आपल्या मराठी भाषेची गळचेपी होत असेल तर या संदर्भात आवाज उठवायला नको का?? जी व्यवस्था हे सगळं बघत आहे. त्यांनी या विषयी काहीतरी धोरण अवलंबणार आहेत की नाही? नाही तर इथून पुढे मराठी चित्रपट निर्मिती करतांना निर्माते देखील १० वेळा विचार करतील आणि अनेक लोक बेरोजगार होतील.
akshay waghmare
akshay waghmare

प्राइम टाइम आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे…

मराठी माणसाने म्हणजे सन्माननीय दादासाहेब फाळके यांनी ही चित्रपटसृष्टी निर्माण केली आणि याच राज्यात मराठी चित्रपटांचे असे हाल होत आहेत. जर निर्मात्यांचे अशा प्रकारे नुकसान होणार असेल तर आम्ही कलाकारांनीदेखील का काम करावे हा पण एक प्रश्न आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाची अशी अवस्था महाराष्ट्रात आहे तर इतर चित्रपटांबद्दल बद्दल काय बोलणार??? बस झाला यापेक्षा जास्त सहन करणे आता शक्य नाही … मातृभाषेचा सन्मान महाराष्ट्रात झालाच पाहिजे. प्राइम टाइम आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे …
अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या पोस्टला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्याचा एक चाहता म्हणत  आहे. काहीही होवो आम्ही तुमच्या सोबत  आहोत. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news