जगासाठी भारतच भाग्यविधाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी

जगासाठी भारतच भाग्यविधाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी

सिडनी, वृत्तसंस्था : भारताचे विकासचक्र गतिमान झाले असून, अनेक शिखरे पादाक्रांत करीत भारत जगावर आपला ठसा उमटवत आहे. उद्योग, व्यापार, अर्थव्यवस्था, युवांची ताकद, कौशल्याचे भांडार असलेला भारत जगासाठी भाग्यविधाता बनू पाहत आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. सिडनी येथे ऑलिम्पिक स्टेडियममध्ये 20 हजार उत्साही भारतीयांना उद्देेशून त्यांनी भारताची यशोगाथा सांगतानाच ऑस्ट्रेलियासोबतच्या द़ृढ संबंधांनाही उजाळा दिला.

हिरोशिमा आणि पापुआ न्यू गिनीच्या दौर्‍यांनंतर ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी सिडनीच्या भव्य ऑलिम्पिक स्टेडियमवर सभा आयोजित करण्यात आली होती. यासाठी ऑस्ट्रेलियाच्या कानाकोपर्‍यात राहणार्‍या 20 हजारांहून अधिक भारतीयांची उपस्थिती होती. शेकडो जण विविध ठिकाणांवरून विशेष विमाने करून सिडनीत आले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले की,

अमेरिकेत आर्थिक

संकट असतानाही भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ चांगली आहे. बँकिंग क्षेत्र मजबूत आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा, सर्वात तरुण टॅलेंटचा कारखाना आहे. भारताकडे ना क्षमतेची चणचण आहे, ना गुणवत्तेची. आज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी भारताला जागतिक अर्थव्यवस्थेचा चमकता किरण मानते. जागतिक बँक म्हणते की, जगातील मोठ्यात मोठ्या आव्हानांचा मुकाबला कोण करू शकत असेल तर तो भारत आहे. जगातील अनेक बड्या देशांतील बँकिंग व्यवसथा अडचणीत असताना, भारतील बँकिंग क्षेत्र ज्या प्रकारे काम करत आहे, त्याचे जगात कौतुक होत आहे. कोरोनासारख्या शतकातून एकदा येणार्‍या महासंकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने गेल्यावर्षी विक्रमी निर्यात केली. विदेशी चलनसाठ्याच्या बाबतीत भारताने नवीन उच्चांक गाठला आहे. भारताची फिनटेक क्रांती हे बदलत्या डिजिटल अर्थव्यवस्थेचे उत्तम उदाहरण आहे.

ब्रिस्बेनमध्ये वाणिज्य दूतावास

भारताच्या ऑस्ट्रलियासोबतच्या घनिष्ठ संबंधांचा उल्लेख करीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, दोन देशांमध्ये भले कितीही भौगोलिक अंतर असेल; पण हिंदी महासागर या दोन देशांना जोडणारा दुवा आहे. जीवनशैली भिन्न असेल; पण योगा दोन देशांना जोडतो, वर्षानुवर्षे क्रिकेटच्या धाग्याने, टेनिसच्या आवडीने, मास्टरशेफच्या प्रेमाने दोन देश जोडले गेले आहेत. हे संबंध आगामी काळात आणखी द़ृढ होतील. त्याचाच एक भाग म्हणून ब्रिस्बेनमध्ये भारत लवकरच आपला वाणिज्य दूतावास सुरू करणार आहे.

अल्बानेस म्हणाले, मोदी इज बॉस 

सिडनीच्या सभेला ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानेस आवर्जून उपस्थित होते. पंतप्रधान मोदी अल्बानेस यांना हाताला धरून जेव्हा कार्यक्रमस्थळी आले, तेव्हा 'मोदी मोदी'च्या गगनभेदी घोषणांनी सभागृह दणाणून गेले. यावेळी अल्बानेस मोदी यांची लोकप्रियता पाहून चांगलेच भारावले. त्यांनी या सभेला झालेल्या गर्दीची तुलना विख्यात रॉकस्टार ब्रूस स्प्रिंगस्टनसोबत केली. याआधी एवढी गर्दी आणि लोकप्रियता फक्त ब्रूसच्याच कार्यक्रमाला पाहायला मिळाली. त्याला आज मोदी यांनी मागे टाकले आहे. 'मोदी इज द बॉस,' असेही अल्बानेस म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news