नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नंदुरबार दौरा निश्चित झाला आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. हिना विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ (दि.7) मोदी यांची भव्य जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने डॉ. हिना विजयकुमार गावित यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आ. चंद्रश्खेर बावनकुळे हे (दि. 2) नंदुरबार जिल्ह्यात आले होते, त्यांच्या उपस्थितीत नंदुरबार लोकसभेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कामकाजाची बैठक पार पडली. त्यानंतर उपस्थित माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही नंदुरबार येथील चौथी जाहीर सभा असेल. तर भाजपाचे उमेदवार डॉ. हिना गावित यांच्यासाठी होणारी ही त्यांची तिसरी जाहीर सभा असेल.
दरम्यान, याविषयी सविस्तर माहिती देताना महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित आणि महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावित म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा निश्चित झाला असून, त्याची पूर्वतयारी सुरू आहे. त्यासाठीच प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि जिल्हा कार्यालयातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठकांचे नियोजन सुरू झाले आहे. मागच्या वेळी पेक्षा रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती राहील असा विश्वास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला.
दरम्यान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज बाबा रिसॉर्ट येथे पार पडलेल्या बैठकीला आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित, भाजपा प्रदेश महामंत्री विजयभाऊ चौधरी, खा.डॉ.हिनाताई गावित, जिल्हा परीषद अध्यक्षा डॉ.सुप्रियाताई गावित, आ.राजेश पाडवी, आ.काशीराम पावरा, भारतीय जनता पार्टीचे धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, लोकसभा प्रभारी तुषार भाऊ रंधे, नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थीत होते.