Nashik ‘युरेनियम’मधून परताव्याचा बहाणा; नाशिकमधील व्यावसायिकाची साडेतीन कोटींची फसवणूक

Nashik ‘युरेनियम’मधून परताव्याचा बहाणा; नाशिकमधील व्यावसायिकाची साडेतीन कोटींची फसवणूक
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शेअर मार्केट, ऑनलाइन टास्क, मल्टिलेव्हल मार्केटिंग योजना सांगत भामटे सर्वसामान्यांना गंडा घालत असतात. मात्र परराज्यातील भामट्यांनी शहरातील एकास 'युरेनियम'मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात अपहार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील व्यावसायिक राहुल शांताराम सावळे (४५, रा. इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार, कोलकाता येथील संशयितांनी १३ जुलै २०२२ पासून फसवणूक केली. संशयितांनी संगनमत करून राहुल यांचा विश्वास संपादन केला. संशयितांनी युरेनियमची माहिती देत त्यांना त्यांच्या इन्व्होल्टा कंपनीचे बनावट कागदपत्र दाखवले होते. तसेच ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून राहुल यांना कंपनीत पैसे गुंतवण्यास प्रोत्साहित केले. त्यानुसार राहुल यांनी ३ कोटी ४६ हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र परतावा न देता संशयितांनी राहुल यांना दमदाटी केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राहुल यांनी इंदिरानगर पोलिसांकडे तक्रार केली.

संशयितांची नावे
चंदन बेरा (रा. कोलकाता, राज्य पश्चिम बंगाल), रघुवीरकुमार संधू (रा. विमाननगर, पुणे), मुकेश कुमार (रा. नाॅर्थ २४ परगना), कांतिकुमार, बप्पीदास, आशीष रॉय (सर्व रा. कोलकाता), अरूप घाेष, बाेलाेमन मिन्ट अशी संशयितांची नावे आहेत.

कोट्यवधी रुपयांचे आमिष
राहुल यांना दि. १३ जुलै २०२२ राेजी संशयित संधूने फोन करून, मी इन्व्होल्टा कंपनीचा संचालक असून, तुम्ही आमच्या कंपनीत 30 लाख रुपये गुंतवा. ही कंपनी रेडिओॲक्टिव्ह मटेरियलमध्ये काम करते. आम्ही युरेनियम शोधून त्याचा वापर ॲटाेमिक एनर्जी तसेच डिफेन्समध्ये करताे. आमचे स्वतःचे रिसर्च सेंटर आहे. मात्र त्यासाठी खर्च येताे. त्यामुळे आम्ही लोकांकडून गुंतवणूक स्वरूपात रक्कम घेऊन जास्त मोबदला देतो. तुम्हाला 100 कोटी रुपयांपर्यंत मोबदला मिळवून देऊ, असे सांगून राहुल यांचा विश्वास संपादन केला होता. राहुल यांनी इन्व्होल्टा कंपनीची माहिती घेतली. ते मित्रासह कोलकाता येथे गेले होते. तेथे सर्वच संशयितांची भेट घेऊन कागदपत्रांची पडताळणी केल्यावर विश्वास बसल्याने त्यांनी गुंतवणूक करण्यास संमती दर्शविली होती. त्यानंतर ३ काेटी ४६ लाख रुपये घेत भामट्यांनी गंडा घातला.

संशयित सराईत, अनेक गुन्हे दाखल
अशा प्रकारच्या फसवणुकीला राइस पुलर बिजनेस म्हटले जाते. अशा स्वरूपाचे गुन्हे काही महिन्यांपूर्वी पुणे, मुंबई, बीड जिल्ह्यांतही दाखल आहेत. फसवणूक करणारी इन्व्हाेल्टा कंपनी बनावट असून, तिच्यातील वरील संशयित सराईत आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल असून, काेलकाता येथून हे संशयित फसवणुकीचे जाळे विणत असल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

भामट्यांनी केलेले दावे
– परराष्ट्रीय संरक्षण कंपन्यांना युरेनियम विक्रीचा संशयितांचा दावा
– भारताच्या पंतप्रधान कार्यालयाची परवानगी असल्याचा दावा
– तक्रारदार व संशयितांमध्ये झाले सामंजस्य करार
– संशयितांनी शास्त्रज्ञांच्या नावाचाही वापर केल्याचे उघड

कोणतीही शासकीय यंत्रणा किंवा संशोधन संस्थांचा या व्यवसायाशी संबंध नाही. संशयितांविरोधात याआधीही अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी तपास सुरू असून, त्यांचे लाेकेशन शोधले जात आहे. या फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी इंदिरानगर पाेलिस ठाण्यात तक्रार नाेंदवावी. –अशाेक शरमाळे, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, इंदिरानगर पाेलिस ठाणे.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news