चंद्रावर जाण्यापूर्वी ‘इथे’ फिरली होती दोन्ही रोव्हर

चंद्रावर जाण्यापूर्वी ‘इथे’ फिरली होती दोन्ही रोव्हर

बंगळूर : भारताच्या 'चांद्रयान-3' मधील विक्रम लँडर पोटात प्रज्ञान रोव्हरला घेऊन चंद्राच्या दक्षिण ध्रुवालगत सुखरूप उतरले आणि अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरला. 'चांद्रयान-2' मोहिमेत लँडरचे सॉफ्ट लँडिंग होऊ शकले नव्हते. मात्र, या दोन्ही मोहिमेतील लँडर व रोव्हरच्या चाचण्या पृथ्वीवर कशा घेतल्या गेल्या याबाबतही अनेकांना कुतुहल असते.

आता 'इस्रो'चे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी काही महिन्यांपूर्वी भारताच्या चांद्रयान मोहिमांची पूर्व तयारी कशा प्रकारे करण्यात आली याबाबत माहिती दिली. आहे. चंद्रावर लँड होण्याआधी भारताचे दोन्ही चांद्रयान पृथ्वीवरच एका ठिकाणी 'लँड' करण्यात आले होते. बंगळूरजवळ चंद्रावर असलेल्या जमिनीच्या खड्ड्यांप्रमाणे रचना करण्यात आली होती. येथेच 'चांद्रयान-2' आणि 'चांद्रयान-3' मधील लँडरचे कृत्रिम लँडिंग करण्यात आले होते.

बंगळूरपासून 215 किलोमीटर अंतरावर असलेल्या चल्लाकेरेमध्ये कृत्रिम खड्डे तयार करण्यात आले आहेत. त्यांची रचना चंद्रावरील जमिनीवर असलेल्या खड्ड्यांप्रमाणे केली आहे. येथे 'चांद्रयान-2' आणि 'चांद्रयान-3'च्या लँडरचे कृत्रिम लँडिंग करण्यात आले होते. प्रत्यक्षात चंद्रावर लँडिंग करताना काय अडथळे येऊ शकतात तसेच दोन्ही यानांमध्ये असलेल्या सेंसरचे परीक्षण करण्यासाठी हे कृत्रिम लँडिंग करण्यात आले. येथे दोन्ही यानांमधील लँडरचे यशस्वी लँडिंग झाले होते.

'चांद्रयान-3' च्या यशस्वी लँडिंगसाठी इस्रोने या कृत्रिम लँडिग साईटवर 1000 हून अधिक वेळा लँडिंगचा सराव केला होता अशी माहिती सोमनाथ यांनी एका प्रेजेंटेशन दरम्यान दिली. चांद्रयानच्या लँडिंगसाठी तयार करण्यात आलेली ही कृत्रिम साईट कशी होती. यान नेमकं कुठे लँड झाले याचे फोटो 'इस्रो' ने शेअर केले आहेत. यासाठी 25 लाख रुपये खर्च आला. भारताची 'चांद्रयान-3' मोहीम फत्ते झाली आहे. विक्रम लँडरमधून बाहेर आलेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत संशोधन केले. चंद्रावरील तापमान, हवामान, चंद्रावर होणारे भूकंप तसेच ऑक्सिजन, आयर्न तसेच इतर खनिजे या संदर्भातील भरपूर डेटा विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने गोळा केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news