लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात

File Photo
File Photo

नगर : पुढारी वृत्तसेवा :  लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी सुरू झाली असून, जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेल्या मतदानयंत्रांची प्राथमिक स्तरावरील तपासणी युद्धपातळीवर सुरू आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर मतदानयंत्रांचे विधानसभा मतदारसंघनिहाय वाटप होणार आहे.
लोकसभेच्या निवडणुका आठ-नऊ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने पूर्वतयारी सुरू झाली आहे. नवीन मतदार नोंदणी आणि मतदारयादी बिनचूक करण्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू होत आहे.

निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांवर निवडणूक सोडून इतर विभागांची कामे लादू नका, असे आदेश पूर्वीच आयोगाने राज्य शासनाला दिले आहेत. जिल्हा निवडणूक विभागाकडे यापूर्वी काही बीयू, सीयू आणि व्हीव्हीपॅट शिल्लक होते. बंगळूर येथील भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीकडून नव्याने 9 हजार 270 बीयू, 4 हजार 620 सीयू आणि 5 हजार 620 व्हीव्हीपॅट जिल्ह्यासाठी दाखल झाले आहेत. जिल्ह्यात अहमदनगर व शिर्डी हे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यासाठी एकूण 9 हजार 949 बीयू, 5 हजार 597 सीयू आणि 6 हजार 89 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत.

कडक पहारा
अहमदनगर एमआयडीसीतील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या दोन गोदामांत मतदानयंत्रे ठेवली असून तेथेच त्यांची तपासणी सुरू आहे. या गोदामांभोवती 24 तास राज्य राखीव पोलिस दलाचा कडक पहारा आहे.

दहा अभियंते, साठ कर्मचारी
या मतदानयंत्रांची प्राथमिक स्तरावरील तपासणी भारत इलेक्ट्रॉनिक कंपनीच्या दहा अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील 60 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. एकूण आठ टेबलांवर प्रत्येकी एक अभियंता आणि चार कर्मचारी ही तपासणी करत आहेत. तपासणीसाठी दररोज एक उपजिल्हाधिकारी व एका तहसीलदाराची पर्यवेक्षकपदी नियुक्ती केली जात असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news