अकाली प्रसूतीची नेमकी कारणे काय?

File Photo
File Photo
Published on
Updated on

अकाली जन्मणार्‍या बाळांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे आई आणि बाळ दोघांनाही धोका असतो. चुकीची जीवनशैली, ताण तणाव आणि आहाराच्या चूकीच्या सवयी हे सर्व मुदतपूर्व प्रसूतीस कारणीभूत ठरत आहेत. अहवालानुसार जागतिक स्तरावर अंदाजे 9 ते 10 टक्के बाळ अकाली जन्माला येतात.

संबंधित बातम्या 

मुदतपूर्व प्रसुती किंवा 37 आठवड्यांच्या आत होणारा बाळाचा जन्म हा अकाली प्रसूती म्हणून ओळखला जातो. ही एक जागतिक आरोग्य समस्या आहे. वैद्यकीय प्रगतीमुळे अकाली जन्मलेल्या अर्भकांसाठी जगण्याचे प्रमाण सुधारले आहे, परंतु बाळाच्या विकासास व वाढीस कारणीभूत घटक समजून घेणे महत्त्वाचे आहे. करिअर तसेच शिक्षणामुळे गर्भधारणेचे वय वाढत चालले आहे आणि वाढत्या वयामुळे मुदतपूर्व प्रसूतीचा धोका वाढतो. 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये तिशीच्या आतील मातांच्या तुलनेत अकाली प्रसूती होण्याची शक्यता अधिक असते. उच्चरक्तदाब आणि मधुमेह यांसारख्या आरोग्य समस्यांमुळेही मुदतपूर्व प्रसूतीची शक्यता वाढते.

आयव्हीएफ सारख्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने प्रीमॅच्युर बाळाच्या जन्माची शक्यता वाढते. चुकीच्या जीवनशैलीची निवड आणि पर्यावरणीय घटकांमुळे देखील अकाली प्रसूती होऊ शकते. गर्भधारणेदरम्यान धूम्रपान करणे हे देखील अकाली प्रसूतीशी संबंधीत आहे. कारण तंबाखूच्या धुरामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि गर्भाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. वायू प्रदूषणाच्या संपर्कात आल्यानेही मुदतपूर्व प्रसूतीचा धोका वाढू शकतो. तणावाची वाढती पातळी हे देखील मुदतपूर्व प्रसूतीशी संबंधित आहे.

तणाव गर्भाच्या सामान्य विकासात व्यत्यय आणू शकते आणि लवकर आकुंचन झाल्यामुळे अकाली प्रसूतीची शक्यता वाढते. त्याचप्रमाणे गर्भधारणेदरम्यान अपुर्‍या पोषणामुळे गर्भाच्या विकासात अडथळे निर्मांण होतात. तसेच गर्भाला पोषक घटकांपासून वंचित राहिल्याने धोका वाढतो.

अकाली जन्मलेल्या बाळाला श्वसनासंबंधी समस्या, द़ृष्टी किंवा श्रवणदोष आणि सेरेब्रल पाल्सीसारखे न्यूरोलॉजिकल विकार निर्माण होण्याचा धोका अधिक असतो. याव्यतिरिक्त, अकाली प्रसूतीमुळे बाळाच्या विकासात अडथळे येतात. मेंदूचा विकास, शारीरीक हालचाली, भाषण कौशल्य, बौद्धिक क्षमता किंवा वर्तणुकीशी संबंधित अडचणी उद्भवू शकतात. शिवाय, जगण्यासाठी आणि त्यांच्या शारीरीक विकासाकरिता जन्मानंतर त्वरीत वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते. यामध्ये बाळाच्या नाजूक स्थितीचे निरीक्षण करून त्यानुसार उपचाराकरिता नवजात अतिदक्षता विभागाची आवश्यकता भासते.

अकाली प्रसूतीची नेमकी कारणे समजलेली नसली तरी, त्यासाठी कारणीभूत ठरणार्‍या घटकांमध्ये आईचे वाढते वय , एकाधिक गर्भधारणा (एकापेक्षा अधिक गर्भ असणे), गर्भधारणेदरम्यान तंबाखू आणि मादक पदार्थांचा गैरवापर, मातेचे अपुरे पोषण आणि प्रसवपूर्व काळजी न घेणे, गर्भधारणेदरम्यान होणारे संक्रमण आणि उच्च रक्तदाब सारख्या विशिष्ट वैद्यकीय परिस्थितींचा समावेश आहे.अकाली जन्माला आलेल्या बाळांमध्ये आजाराची शक्यता अधिक असते.

प्रसूतीपूर्व काळजी, निरोगी जीवनशैलीचे पालन, मानसिक आरोग्य चांगले रहावे आणि गर्भधारणेदरम्यान मातेला योग्य पोषण मिळणे उपयुक्त ठरू शकते. गर्भधारणेचे नियोजन करण्यासाठी प्रसूतीतज्ज्ञांना गर्भधारणापूर्व भेट देणे आणि मातेच्या आरोग्याची तपासणी करणे फायदेशीर ठरते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news