मुंबई, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत 'एकला चलो'चा नारा देणारे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत चर्चा बंद केली नसल्याचे शुक्रवारी स्पष्ट केलेे.
भाजपविरोधात आम्ही मजबूत आघाडी उघडणार आहोत. यासंदर्भात विविध संघटनांशी बोलून येत्या 2 एप्रिलपर्यंत याचे चित्र स्पष्ट दिसेल, असा इशाराही त्यांनी दिला. यानिमित्ताने त्यांनी तिसर्या आघाडीचे संकेत दिले. आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन तिसर्या आघाडीचे सूतोवाच केले.
महाविकास आघाडीच्या बैठका आजही सुरू आहेत. आम्ही बैठक घेतली तर त्यांनीही बैठकीला यावे, अशी भूमिका मांडत आंबेडकर यांनी आघाडीबाबतचा सस्पेन्सही वाढवला.
लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात मजबूत आघाडी व्हावी, असा आमचा प्रयत्न होता; पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या विविध संघटनांशी बोलून येत्या 2 एप्रिलपर्यंत भाजपविरोधात असणारी महत्त्वपूर्ण आघाडी उभी राहिलेली दिसेल, असे सांगतानाच यावेळी आमच्यासोबत कोण असेल आणि आम्ही कुणासोबत असू, या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील, असे आंबेडकर म्हणाले. राज्यात ज्या पद्धतीने विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे होता. तो राहिलेला नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधी आघाडी उभी राहावी, हे आमचे मत होते; पण आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे आम्ही इतरांना सोबत घेऊन नवी आघाडी करत आहोत, असे सांगतानाच आमचे दरवाजे कुणासाठीही बंद झालेले नाहीत. आमचे दरवाजे उघडेच आहेत. महाविकास आघाडीसोबतच चर्चा केली पाहिजे, असे नाही. आम्ही वैयक्तिकपणे आणि पक्षाशी वैयक्तिक चर्चाही करू शकतो, असेही आंबेडकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.
संजय राऊतांकडून आघाडीत बिघाडी
आंबेडकर यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडीच्या चर्चेत केंद्रस्थानी असलेले शिवसेना (ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांना जोरदार तडाखे लगावले. महाविकास आघाडी वेगळी आहे आणि संजय राऊत वेगळे आहेत. ज्यांना आम्ही लक्ष्य केले ते संजय राऊत होते. राऊत चुकीचे वक्तव्य करतात म्हणून ते आघाडीत बिघाडी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. जोपर्यंत सुभाष देसाई यांच्याशी चर्चा होत होती, तोपर्यंत सर्व काही सकारात्मक होते. चर्चा पुढे जात होती; पण नंतर कुणी तरी कुणासाठी आम्हाला वापरून घेणारा हिशेब चालू झाला. त्यामुळे काही जणांना घ्यायचेच नाही, काही जणांना बोलवायचेच नाही याचा अंदाज आला, ते योग्य वाटले नाही, अशी नाराजीही आंबेडकर यांनी बोलून दाखवली.