जळगावात कमळाला मशालीचे चटके कुणामुळे? उन्मेष पाटील यांच्या निर्णयाने समीकरणे बदलली

जळगावात कमळाला मशालीचे चटके कुणामुळे? उन्मेष पाटील यांच्या निर्णयाने समीकरणे बदलली
Published on
Updated on

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव मध्ये आज राजकीय भूकंप घडला. उन्मेष पाटील यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा व खासदारकीचा राजीनामा देत हाती शिवबंधन बांधले. उन्मेष पाटील यांच्या या निर्णयाने जळगाव लोकसभा मतदारसंघातील राजकारणाला वेगळं वळण मिळालं आहे. यामागे उन्मेष पाटील यांचे लोकसभेतील टिकीट कापणे किंवा तिकीट न देणे हा मुद्दा नसून स्मिता वाघांना तिकीट मिळणे हा मुद्दा कळीचा ठरत आहे. उन्मेष पाटील यांचा पत्ता कट करुन स्मिता वाघ यांना तिकीट कोणामुळे मिळाले हाही एक प्रश्न उभा राहिला आहे. उन्मेष पाटील यांच्या जागी स्मिता वाघ खासदारकीच्या रेसमध्ये आल्यामुळे अशी कोणती कारणे होती की त्यामुळे विद्यमान खासदारांची तिकीट कापण्यात आले व स्मिता वाघांना संधी देण्यात आली?

उन्मेष पाटील यांना तिकीट नाकारण्यामागे अनेक कारणे असल्याचे बोलले जात आहे. चाळीसगाव आमदार व जामनेरचे नामदार यांची नाराजी असल्याची मोठी चर्चा आहे. त्यामुळेच उन्मेश पाटलांनी भाजपला रामराम ठोकत मशाल हाती घेतली आहे. यामुळे जळगाव लोकसभेत कमळाला मशालचे चटके सहन करावे लागणार आहे. दिसणारी लढाई ही आता सोपी राहिलेली नसून अस्तित्वाची झालेली दिसून येत आहे.

नेमकं खुपतय काय?

उन्मेष पाटील यांचे तिकट कापण्यामागे चाळीसगावचे आमदार व जामनेरचे नामदार यांचा हात असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. यांच्यामधील नाराजीमुळे उन्मेष पाटलांचे तिकीट कापले गेल्याच्या चर्चा मतदारसंघात सुरु आहेत. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा जळगाव लोकसभा व रावेर लोकसभा हे भाजपचे बालेकिल्ले राहिलेले आहेत. केंद्रात भाजपची सत्ता असो का नसो येथील नागरिकांनी भाजपालाच साथ दिलेली आहे. हा आजपर्यंतचा इतिहास आहे. सध्याच्या वातावरणात जळगाव लोकसभेमधून कोणीही भाजपाचा कार्यकर्ता निवडून येण्यास सक्षम आहे, तर मग उन्मेष पाटील यांचे तिकीट कापण्यामागे नेमकी कारणं काय याचा शोध घ्यावा लागणार आहे. चाळीसगावचे आमदार व जळगाव जिल्ह्याचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांची उन्मेष पाटील यांच्यावर अशी काय नाराजी असावी असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

उन्मेष पाटील व मंगेश चव्हाण यांच्यामधील वाद संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे. खासदार उन्मेष पाटील यांनी भाजपाच्या वरिष्ठांशी चांगले संबंध जुळवून घेतलेले होते. इतकच काय देशातील टॉप दहा खासदारांमध्ये त्यांचे नाव आलेले होते. असे असतानाही त्यांचे तिकीट कापले जाणे म्हणजे मोठा प्रश्न आहे.

पाटलांच्या मशाल हाती घेण्याने समीकरणं बदलली

भाजप मध्ये एकतर्फी लढत होऊन स्मिता वाघ एकतर्फी निवडून येतील असे दिसत होते. मात्र उन्मेष पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आता हाती मशाल घेतल्याने जळगाव लोकसभेची समीकरणे बदलली आहेत. स्मिता वाघ यांच्या अडचणी वाढल्या असून लोकसभेची निवडणूक पाहिजे तशी सरळ राहणार नाही. स्मिता वाघ यांनाआव्हान देण्यासाठी करण पवार सारखा युवा नेता त्यांच्यासमोर असेल. त्याला उन्मेष पाटील यांची साथ असल्याने जळगाव लोकसभेत काट्याची टक्कर होणार हे निश्चित. उन्मेष पाटील यांचे समर्थक जरी भाजपा सोडणार नसले तरी ते आतून पाटील यांना मदत करतील याची जाणीव उन्मेष पाटलांना आहे.

चव्हाण म्हणजे महाजन अन् महाजन म्हणजे फडणवीस

आज जळगाव जिल्ह्यामध्ये मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन व गिरीश महाजन म्हणजे देवेंद्र फडणवीस असे समीकरण लावले जाते. मंगेश चव्हाण आज जिल्हा दूध संघ, जिल्हा बँक या ठिकाणी पदांवर आहे. त्यांचे बीजेपीत एक स्वतंत्र वलय निर्माण झालेले आहे. त्यांनी सांगितलेला शब्द म्हणजे गिरीश महाजन यांचा शब्द असेच काही आहे आणि त्यातूनच ही राजकीय उलथापालथ झाल्याचे बोलले जात आहे.

खडसे, तावडे यांचाही हात?

एकनाथ खडसे भाजपात असताना स्मिता वाघ यांना त्यांनी जळगाव विधान परिषदेवर पाठवले होते. खडसे व विनोद तावडे यांचे संबंध जगजाहीर आहेत. ते खडसेंच्या जवळचे आहे. त्यामुळे स्मिता वाघांना तिकीट मिळाले या मागे एकनाथ खडसे व विनोद तावडे यांचाही हात असल्याचे बोलले जात आहे. हा अंदाज वर्तवला जात असला तरी मात्र उन्मेष पाटील हे गिरीश महाजन व मंगेश चव्हाण यांना चालत नसल्याचीजी चर्चा आहे. त्यामुळेच त्यांचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news