ओबीसींना टाळून राजकारण होऊ शकत नाही : प्रफुल्ल पटेल; राष्ट्रवादी काँग्रेस राज्यस्तरीय ओबीसी कार्यकर्ता शिबिराचा समारोप

राष्ट्रवादी काँग्रेस राज्यस्तरीय ओबीसी कार्यकर्ता शिबिराच्या  समारोप प्रसंगी बाेलताना प्रफुल्ल पटेल. साेबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री अनिल देशमुख आदींसह मान्‍यवर.
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यस्तरीय ओबीसी कार्यकर्ता शिबिराच्या समारोप प्रसंगी बाेलताना प्रफुल्ल पटेल. साेबत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री अनिल देशमुख आदींसह मान्‍यवर.

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात किंवा देशात ओबीसी हा मोठा समाज घटक आहे. त्यामुळे त्यांना टाळून कोणालाही राजकारण, समाजकारण करता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी समाजाच्या हिताचेच राजकारण नेहमी केले. मात्र भाजप सरकारकडून ओबीसी नेतृत्व दडपण्याचा सातत्याने प्रयत्न केला गेला, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज (दि.४) केला. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी समाज विभाग तर्फे महात्मा फुले सभागृहात दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर समारोप प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ विचारवंत प्रा हरी नरके, सुबोध मोहिते ,डॉ खुशाल बोपचे, माजी मंत्री अनिल देशमुख रमेश बंग ईश्वर बाळबुधे, सक्षणा सलगर,कल्याण आखाडे, राज राजापूरकर,विकास लवांडे,अरविंद भाजीपाले, श्रीकांत शिवणकर, प्रा सुरेंद्र मोरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

ओबीसी समाजासाठी करीत असलेल्या संघर्षातूनच भुजबळांना तुरुंगवास भोगावा लागला

यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले, माजी मंत्री ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण, जातीनिहाय जनगणना यासाठी सातत्याने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. ओबीसी समाजाला नाकारून चालणार नाही ही राष्ट्रवादीची नेहमीसाठी भूमिका राहिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही ओबीसी समाज घटकाला न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. छगन भुजबळ यांना ओबीसी समाजासाठी करीत असलेल्या संघर्षातूनच तुरुंगवास भोगावा लागला, असाही आरोप पटेल यांनी यावेळी केला.

माजी मंत्री छगन भुजबळ म्‍हणाले, फुले शाहू आंबेडकर यांच्‍या जीवनकार्यावर प्रा. हरी नरके,डॉ आ.ह. साळुंखे आदी अनेक मान्यवरांनी प्रबोधनपर पुस्तके लिहिली आहेत. ही पुस्‍तके आता प्रत्येक कार्यकर्त्यांमार्फत ओबीसींच्या घरोघरी पोहोचली पाहिजेत. शेवटच्या घटकापर्यंत हा विचार गेला पाहिजे. राष्ट्रवादीने सुरुवातीपासून याच दृष्टीने भूमिका घेतली.राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या कामांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहनी भुजबळ यांनी केले.

सर्वोच्च न्यायालयात लढा देताना विरोधात वकिलांची मोठी फौज उभी करण्यात आली यावरून भाजपची दुटप्पी भूमिका लक्षात येते, असे भुजबळ म्हणाले. शरद पवार यांनी राजकारणी म्हणून सातत्याने समाजकारणावर अधिक भर दिला. शाहू, फुले, आंबेडकर,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची विचारसरणी जोपासली. मागासवर्गीयांच्या हितासाठी ते झटत राहिले. सत्तेची पर्वा न करता त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतरण केले, अशा आठवणींना ज्येष्ठ विचारवंत प्रा हरी नरके यांनी उजाळा दिला. संचालन प्रदेश संघटन सचिव श्रीकांत शिवणकर यांनी केले तर आभार अनिल ठाकरे यांनी मानले.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news