पोलिस, भाजपाविरोधात करणार निदर्शने ; डॉ. कुमार सप्तर्षी यांचा इशारा

पोलिस, भाजपाविरोधात करणार निदर्शने ; डॉ. कुमार सप्तर्षी यांचा इशारा
पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रसेवा समूह दल येथे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणात किरकोळ गुन्हे दाखल करुन गुन्हेगारांना पाठीशी  घालण्याचे काम पुणे पोलिस करीत आहेत. त्यामुळे पुणे पोलिस आणि भाजपाच्या विरोधात निदर्शने करण्यात येतील, असा इशारा युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. कुमार सप्तर्षी यांनी दिला. रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मोर्चाचे राहुल डंबाळे, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे गजानन थरकुडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांसह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सप्तर्षी म्हणाले, वागळे यांचा कार्यक्रम नियोजित होता. भाजप शहराध्यक्षांनी कार्यक्रम उधळून लावण्याबाबत इशारा दिलेला असताना ही पोलिसांकडून वागळे यांना कोणतेही संरक्षण देण्यात आले नाही. वास्तविक भाजपच्या राजकीय गुंडांचे समर्थन पोलिसांकडून होताना दिसत आहे. पुणे पोलिस आयुक्तांनी संबंधित राजकीय गुंडांवर त्वरीत गुन्हे दाखल करुन कारवाई करावी. अन्यथा पोलिसांविरोधातच निदर्शने करण्यात येतील. त्यानंतरही न्याय मिळाला नाही तर सर्व जनता सत्याग्रह करेल. डंबाळे म्हणाले, पोलिसांच्या ही सर्व कृत्य संशयास्पद असून संबंधितांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करणे अपेक्षित होते. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना यासंदर्भात मंगळवार दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता निवेदन देण्यात येणार असून त्यानंतरच निदर्शनाची दिशा ठरविण्यात येईल.
गांधी भवनामध्ये पोलिस आयुक्तांनी चर्चा करावी
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना माझी भेट घ्यायची आहे. त्यांनी माझ्या घरी न येता गांधी भवन येथे येऊन माझ्यासोबत चर्चा करावी. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची गुप्त चर्चा न होता सर्वांसमोर ही चर्चा होईल. तसेच उपस्थितांमध्ये काही शंका असल्यास त्याचे ही निरसन आयुक्तांना करावे लागले, असे डॉ. कुमार सप्तर्षी यांनी यावेळी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news