मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त राहिलेल्या सुजाता पाटील (Sujata Patil) यांचा आपल्याला खोट्या प्रकरणात गोवल्याचा आणि सूडबुद्धीने कारवाई केल्याचे म्हणणे मांडणारा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. या व्हिडीओमधून त्यांनी काही गंभीर आरोपसुद्धा करत कारवाई आणि न्यायाची मागणी केली आहे. तर, सुजाता पाटील यांच्या व्हिडिओमुळे पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
मेघवाडी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना सुजाता पाटील (Sujata Patil) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ८ ऑक्टोबर रोजी कारवाई केली आहे. एसीबीने सुजाता पाटील यांच्या कार्यालयात सापळा रचून त्यांना ४० हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती.
तक्रारदाराकडे १ लाख रुपयांची मागणी सुजाता पाटील यांनी केल्याचा आरोप एसीबीने त्यांच्यावर ठेवला आहे. सुजाता पाटील यांची न्यायालयाने जामीनावर सुटका केली होती. मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेत, शासनाने सुजाता पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्याशिवाय पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सुजाता पाटील यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत संबंधित विभाग आणि वरिष्ठांकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यांची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी या महिन्याच्या सुरुवातीला पोलीस महासंचालकांना पत्र लिहून आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता सुजाता पाटील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यावर झालेला अन्याय, सूडबुद्धीने करण्यात आलेली कारवाई, कुटुंबावर झालेला अन्याय आणि अत्याचार याला वाचा फोडली आहे.
दरम्यान, याआधीही सुजाता पाटील विविध कारणांमुळे चर्चेत आल्या होत्या. यात हिंगोलीत बदली न झाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र लिहून आत्महत्या आणि राजीनामा हे दोनच पर्याय असल्याची खंत पाटील व्यक्त केली होती. त्यामुळे राज्यातील पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती