मुंबई, पुढारी ऑनलाईन : २०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमीष दाखवून वारंवार बलात्कार (POCSO act) करणाऱ्या आरोपीचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केलेला आहे. सुनावणी करीत असताना न्यायाधिशांनी म्हटलं आहे की, "ज्या पीडितेवर बलात्कार झाला तेव्हा पीडितेचे वय १६ वर्षे होते, त्यामुळे दोघांच्यात होणाऱ्या लैंगिक संबंधांच्या परिणामांची जाणीव पीडितेला होती. तसेच आरोपीने लैंगिक संबंध ठेवताना कंडोमचा वापर केलेला होता."
९ सप्टेंबर २०१९ साली घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केलेली होती. तेव्हापासून आरोपी कोठडीतच आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग आरोपीचा जामीन मंजूर केला.
या प्रकरणावर सुनावणी करत असताना न्यायमूर्ती सी. व्ही. भडंग म्हणाले की, "या प्रकरणातील पीडिता ही १८ वर्षाखालील असल्याने तिला लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यानुसार (POCSO act) अल्पवयीन ठरविण्यात आले. मात्र, पीडितेचं वय १६.५ वर्षे होते. तसेच तिला या कृत्याच्या परिणामांची जाणीव होती. त्यामुळे या प्रकरणात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, पीडितेचं वय १६ वर्षे ६ महिने पूर्ण झालेले होते. त्यामुळे तिच्यासोबत होणाऱ्या कृत्याचे स्वरूप आणि परिणामांची जाणीव असणे आवश्यकच होते."
आरोपीने पीडितेशी ठेवलेल्या शारीरिक संबंधात कुठेही जबरदस्ती किंवा बळजबरी केलेली दिसत नाही. कारण, त्याने कंडोमचा वापर केलेला होता, असे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट दिसून येते, असे मत न्यायालयाने नमूद केरत आरोपीचा जामीन मंजूर केलेला आहे. संबंधित आरोपी हा २ वर्षांपेक्षा जास्त काळ कोठडीत होतो. २५ हजारांवर जामीन मिळावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. पीडितेच्या वडिलांना दाखल केलेल्या तक्रारीनुसार पीडितेचे वय हे १६ वर्षे ६ महिने होते. आणि संबंधित आरोपी हा मित्राचा भाऊ होता, त्यामुळे दोघेही एकमेकांना ओळखत होते.
सविस्तर प्रकरण असे की, ही घटना मे २०१९ मध्ये घडली होती. पीडितेने सांगितल्याप्रमाणे आरोपीने घराच्या मागे बोलावून "मी तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्याशी लग्न करू इच्छितो", असे सांगून पीडितेवर लैंगिक संबंध प्रस्थापित केला. नंतर काही महिने दोघांंमध्ये संबंध ठेवणे सुरू राहिले. अखेर पीडितेच्या वडिलांना ही माहिती कळली, त्यांनी संबंधित आरोपीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली.
आरोपीचे वकील पारस यादव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा संबंधित पीडिता अल्पवयीन असली तरी तिचे वय पूर्ण झालेले होते. आरोपी आणि पीडिता यांच्या होत असलेल्या कृत्याचे परिणाम पीडितेला माहीत होते. वकिलांनी वैद्यकीय अहवाल न्यायालयासमोर दाखल केला आणि सिद्ध केले की, दोघांच्यातील शरीर संबंध सहमतीने होत होते.
पीडितेच्या सरकारी वकिलांनी युक्तीवाद करताना सांगितले की, लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यानुसार पीडिता अल्पवयीन आहे. असे असताना आरोपीने वारंवार तिचे लैंगिक शोषण केले आहे. दोन्ही पक्षाकडील बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने शेवटी आरोपीच्या बाजुने कौल देत आरोपीचा जामीन मंजूर केला.