पुणे, पुढारी वृत्तसेवा: आळंदी यात्रेनिमित्त पीएमपीकडून 300 बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. कार्तिकी एकादशी व श्री. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त क्षेत्र आळंदी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. त्यामुळे वारकरी भाविकांच्या सोयीसाठी पीमपीकडून हे ज्यादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
आळंदी यात्रेसाठी १७ ते २३ नोव्हेंबर २०२२ या कालावधी करिता मार्गावरील नियमित ९७ व जादा २०३ अशा मिळून ३०० बस आळंदीसाठी शहराच्या विविध भागातून सेवा पुरवतील. तसेच १९ ते २२ नोव्हेंबर २०२२ या चार दिवस गरजेनुसार रात्री सुद्धा बस सेवा पुरवण्यात येईल. यासोबतच पीएमपीने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत केले आहे. त्यामुळे या बस काटेवस्ती येथून संचलन करतील, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले
आळंदी यात्रेसाठी पीएमपीची रात्री बससेवा गरजेनुसार देण्यात येणार आहे. यात्रेसाठी देण्यात येणाऱ्या जादा बस सेवेसाठीचे तिकीट (नेहमीची बससेवा संपल्यानंतर) सध्याच्या तिकिट दरापेक्षा ५ रुपयांनी जास्त असेल. तसेच, पीएमपीकडून देण्यात येणाऱ्या एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, जेष्ठ नागरिक व इतर पासधारकाला यात्राकालावधीत रात्रीच्या प्रवासासाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही, असे पीएमपी प्रशासनाने सांगितले.
या मार्गांवर धावणार ज्यादा गाड्या…
1) स्वारगेट ते आळंदी
2) हडपसर ते आळंदी
3) पुणे स्टेशन ते आळंदी
4) मनपा भवन ते आळंदी
5) निगडी ते आळंदी
6) पिंपरी ते आळंदी
7) चिंचवड ते आळंदी
8) देहूगाव ते आळंदी
9) भोसरी ते आळंदी
10) रहाटणी ते आळंदी