नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले आहे. पीएम मोदी शुक्रवारी अल्मोडाहून पटियालीला पोहोचले तेव्हा त्यांच्या ताफ्यातील आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिकेत तैनात असलेले डॉक्टर अनुपस्थित होते. एसपीजी कमांडोंना रुग्णवाहिकेत डॉक्टर आढळून आले नाहीत तेव्हा त्यांनी प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर अनुपस्थित असणा-या डॉक्टरांचा शोध घेण्यात आला.
पीएम मोदींच्या सुरक्षा प्रोटोकॉलनुसार, सहा रुग्णवाहिका कार्यक्रमस्थळी तैनात करण्यात आल्या होत्या. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी शेजारच्या एटा जिल्ह्यातून एक रुग्णवाहिका आणि डॉक्टरांची टीमही मागवण्यात आली होती. पंतप्रधानांच्या ताफ्यात एटा येथील डॉक्टरांच्या चमूचा समावेश होता. या टीममध्ये सर्जन डॉ. अभिनव झा, पॅथॉलॉजिस्ट मधुप कौशल आणि भूलतज्ज्ञ डॉ. आरके दयाल यांची नियुक्ती करण्यात आली होती.
हवाई दलाच्या तीन हेलिकॉप्टरच्या ताफ्यासह पंतप्रधान रॅलीच्या ठिकाणी पोहोचले. ज्यातील पहिले हेलिकॉप्टर २ वाजून ५८ मिनिटांनी लँड झाले. त्यानंतर दोन ते तीन मिनिटांच्या अंतराने इतर दोन हेलिकॉप्टर लँड झाली. पीएम मोदींचे हेलिकॉप्टर येताच ताफ्याला अलर्ट करण्यात आले. ताफ्याला इशारा देताच, एसपीजी कमांडोंना डॉक्टर रुग्णवाहिकेत अनुपस्थित असल्याचे आढळले. याबाबत इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. बेपत्ता डॉक्टरांचा शोध घेतला असता ते ताफ्यातल्या रुग्णवाहिकेऐवजी इतर रुग्णवाहिकांमध्ये बसलेले आढळून आले. एसपीजीने ही चूक गांभीर्याने घेतली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आगमनावेळी पीएम मोदींच्या ताफ्यात समाविष्ट असलेल्या रुग्णवाहिकेतील डॉक्टर उपस्थित नव्हते, ते गैरहजर होते. एसपीजीने यासंदर्भात माहिती देत अहवाल मागवला आहे. सीएमओ कासगंज आणि रुग्णवाहिकेत तैनात असलेल्या तीन डॉक्टरांविरोधात सरकारला अहवाल पाठवण्यात आला आहे. अशी माहिती पोलिस अधिक्षक रोहन प्रमोद बोत्रे यांनी दिली आहे.
कासगंजचे सीएमओ डॉ. अनिल कुमार यांनी सांगितले की, एटा येथील तीन तज्ज्ञ डॉक्टरांची टीम पीएम मोदींच्या ताफ्यात तैनात करण्यात आली होती. पीएम आले तेव्हा ताफ्यातील रुग्णवाहिकेचे डॉक्टर दुसऱ्या रुग्णवाहिकेमध्ये बसलेले आढळले. कार्यक्रमादरम्यान सर्व डॉक्टर्स उपस्थित होते, ते कार्यक्रम संपल्यानंतरच गेले.